काय होती शांतीसेना ज्याची परिणीती राजीव गांधींच्या हत्येमध्ये झाली होती.

२१ मे १९९१ हा काळा दिवस..याच दिवशी राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. पण त्यासाठी जबाबदार असलेली परिस्थिती हि त्याच्या एका वर्षाच्या आधी निर्माण झाली होती.

राजीव गांधींच्या हत्येसाठी दुर्देवाने कारणीभूत ठरला तो श्रीलंकेतील शांतता करार.

हा शांतता करार काय होता ? शांतीसेना श्रीलंकेत का गेली होती? राजीव गांधींच्या हत्येसाठी शांती करार कसा काय जबाबदार होता?

 तर हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊ श्रीलंकेच्या इतिहासात.

श्रीलंकेत १९८७ च्या काळातलं वातावरण काही बरं नव्हतं. श्रीलंकेचं सैन्यदल आणि ‘लिबरेशन टायगर्स ऑफ ईलम’ अर्थात एलटीटीई यांच्यामधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेचे राष्ट्रपती जे.आर.जयवर्धने यांनी विनंती केली आणि भारत त्यांच्या मदतीला धावून गेला.

आणि जयवर्धने यांच्या विनंतीवरून, भारताचे तत्कालीन पं. राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथे शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला.

आणि त्यानुसार जुलै १९८७ मध्ये भारत सरकारने ‘इंडियन पिस कीपिंग फोर्स अर्थात आयपीकेएफच्या फौजा श्रीलंकेतील तणावग्रस्त भागात तैनात केल्या आणि हाच निर्णय पुढे वादग्रस्त ठरला. आणि याची परिणीती म्हणजे राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली.

 थोडक्यात याची पार्श्वभूमी अशी होती की,

प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली एलटीटीई ने स्वतंत्र तामिळ राष्ट्राच्या मागणीसाठी दीर्घकाळ लढा चालू ठेवला होता आणि पूर्व व उत्तर श्रीलंकेतील काही मोठ्या भागावर शास्त्रज्ञाला निश्चित नियंत्रण ठेवलं होतं.  त्यामुळे १९८७ मध्ये एलटीटीई यांची मुक्ती सेना आणि श्रीलंकेचं लष्कर यांच्यात संघर्ष वाढला होता. 

यातून मार्ग काढण्यासाठी श्रीलंकेचे जयवर्धने यांनी राजीव गांधी यांच्याशी बोलणी केली आणि सुरक्षतेसाठी एक करार केला. या करारानुसार जयवर्धने यांच्या विनंतीवरून आणि एलटीटीई सोबतही संवाद प्रस्थापित केल्यावर भारताने आयपीकेएफच्या २६ जुलै १९८७ मध्ये श्रीलंकेत तैनात केल्या गेल्या.

श्रीलंकेचा ऐक्य आणि अखंडत्व जपण्याची भूमिका भारताने या करारात स्पष्ट केली.

श्रीलंकेत सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी तामीळ बहुल असलेल्या उत्तर आणि पूर्व प्रांतांचं एकीकरण करावं, श्रीलंकेच्या शास्त्र दलाने कारवाई थांबवावी आणि दहशतवादी गटांनीही शस्त्रे खाली ठेवावीत, अशा या करारातील प्रमुख अटी होत्या. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याकरिता श्रीलंका सरकारला आवश्यकता भासल्यास भारतीय शांतिसेना पाठवण्यात येईल असा या कराराद्वारे मान्य करण्यात आलं. आणि नंतर जयवर्धने यांच्या सांगण्यावरून भारताचे शांतिसेना श्रीलंकेत दाखल झाली. 

जयवर्धने यांच्याबरोबर कराराआधी एलटीटीईने भारताच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य देण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याला अनुसरून त्यांच्याकडून शस्त्रसाठा शांतिसेनेकडे जमा करण्यास सुरुवात केली,

परंतु छुप्या मार्गाने शस्त्रास्त्रांची जमवाजमव चालू ठेवल्याचे पुढे उघड झालं.

श्रीलंका सरकारने करारानुसार उत्तर आणि पूर्व  एकीकरण करून एपीआरएलएफ चे वरदराज पेरूमल यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला मात्र श्रीलंकेच्या सशस्त्र दल आणि कारवाई थांबवण्याच्या अटीची पूर्तता केली नाही त्यामुळे एलटीटीई आणि श्रीलंकेच्या सशस्त्र दलांमध्ये संघर्ष चालूच राहिला.

परिणामी ऑक्टोबर १९८७ पासून भारतीय शांती सेना आणि एलटीटी यांच्यामध्येही संघर्ष सुरू झाला. 

ईशान्य प्रांतातल्या दाट जंगलांमध्ये आश्रय घेतलेले तामिळ टायगर्स शांतीसेनेवर गनिमी हल्ले करू लागले. हा प्रदेश म्हणजे तामिळ टायगर्सचा सरावाचा प्रदेश होता. पण भारतीय शांती सेना साठी हा इलाका अनोळखी होता. त्यावर उपाय म्हणून तामिळ टायगर्सच्या अड्ड्यांचा आणि शस्त्रसाठ्यांचा कसून शोध घेण्याची मोहीम शांतीसेनेने सुरू केली.

मात्र एलटीटीईचे हल्ले आणि सुरुंगाच्या स्फ़ोटात अनेक भारतीय जवान हुतात्मा झाले तर अनेक जायबंदी झाले.

एलटीटीईचे जाफना येथील मुख्य केंद्र उद्ध्वस्त करून ताब्यात घेण्यात शांती सेनेला यश मिळालं पण  एलटीटीई ला संपवण्यात सेनेला अपयश आलं. एका आकडेवारीनुसार ऑक्टोबर १९८७ पासुन भारतीय शांती सेनेने राबवलेल्या मोहिमेत एकूण ९४५ जवानांचे बळी गेले तर एलटीटीईचे त्या मानाने खूप कमी म्हणजे ४५४ कार्यकर्ते मारले गेले.

एकंदरीतच श्रीलंकेत शांती सेना पाठवण्याचं पाऊल भारताला सर्व बाजूंनी अडचणीचं ठरलं. परकीय सैनिक म्हणून आपल्या भूमीवरील शांती सैन्याचं अस्तित्व श्रीलंकेतील सिंहली भाषकांना मान्य नव्हतं तर एलटीटीईच्या विरोधात संघर्ष करत असल्यामुळे श्रीलंकेतील तमीलांसाठी शांतिसेना अप्रिय ठरली.

आणि इकडे भारतातही त्याचे परिणाम दिसू लागले.

भारतीय लष्कर श्रीलंकेतल्या संघर्षात विनाकारण गुंतल्यामुळे अनेक भारतीय जवानांचे हकनाक बळी जात असल्याची भावना भारतात निर्माण झाली आणि शांतिसेने ला भारतात तात्काळ परत बोलवावे  अशा विरोधी पक्षांच्या मागणीने जोर धरला.

विशेषतः हा तामिळनाडूमध्ये या मागणीसाठी निदर्शने आणि आंदोलनही झाली. दुसरीकडे १९८९ मध्ये श्रीलंकेत निवडणूक होऊन सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रेमदास यांनी शांती सेनेला तत्काळ श्रीलंका सोडण्याचा फर्मान काढलं.

त्यातून प्रेमदास आणि राजीव गांधी यांच्यामध्ये वाद निर्माण झाले.

अखेर शांतिसेना टप्प्याटप्प्याने का होईना मागे घेण्याचं राजीव गांधी यांनी मान्य केलं.

साधारण सप्टेंबर १९८९ पासून शांतिसेना माघारी परतण्याची सुरुवात झाली. आणि ही प्रक्रिया १९९० मध्ये पूर्ण झाली.

मात्र या सर्व घडामोडींचा अत्यंत दुःखद परिणाम असा झाला की शांती सेनेने केलेल्या कारवाईचा सूड म्हणून एलटीटीई ने त्याच्या एका वर्षांनी म्हणजेच २१ मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेराम्बदूर येथे भीषण हत्या केली.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.