पवारांना घेऊन निघालेलं राजीव गांधी यांचं विमान अचानक गायब झालं..

१९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेण्याचा धडाका लावला होता. पण त्यावर्षी वातावरण त्यांच्या बाजूने नव्हते. बोफोर्स तोफांवरून उठलेल वादळ, शाहबानो प्रकरण, रामजन्मभूमी आंदोलन या गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या होत्या.

अशातच त्यांची एक सभा सोलापूरला होती.

सभेसाठी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार सुद्धा उपस्थित होते. राजीव गांधींच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पवारांच्या सोबतीनेच झाल्या होत्या. सोलापूरची सभा ही शेवटची सभा होती.

ही सभा संपली आणि राजीव गांधी यांनी पवारांना म्हणाले,

“माझ्याबरोबर चला.” 

पवारांना काही कळाल नाही. त्यांनी कुठे असा प्रश्न विचारला.

राजीव गांधी म्हणाले, महू ला जाऊ.

महू म्हणजे मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील गाव. येथेच बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यामुळे पुढे या गावाचं नाव आंबेडकरनगर असे करण्यात आले होते. राजीव गांधी यांची पुढची सभा महू येथे होणार होती.

पण पवारांचे तिकडे काहीच काम नव्हते. राजीव गांधी यांना त्यांच्याशी गोपनीय चर्चा करायची होती म्हणून ते पवारांना चला म्हणत होते. इतक्या लांब  मध्यप्रदेशला जायचं म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमावर पाणी फेरल जाणार म्हणून शरद पवार थोडी टाळाटाळ करत होते.

ते पंतप्रधानांना म्हणाले,

” माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. तुमच्या सोबत आलो तर ते कार्यक्रम रद्द करावे लागतील. शिवाय परत कस येणार हा प्रश्न उरतोच. “

यावर राजीव गांधी म्हणाले,

“काही तरी व्यवस्था करू. मला तुमच्याशी बोलायचं आहे. चला.”

राजीव गांधी तेव्हा प्रचारासाठी एका छोट्या विमानातून फिरत होते.

ते स्वतः वैमानिक असल्यामुळे ते विमान स्वतःच चालवायचे. मुख्यमंत्री शरद पवारांना घेऊन पंतप्रधान राजीव गांधी यांचं विमान सोलापूरहून निघालं.

जाता जाता आकाशातून राजीव गांधी पवारांना आपण कोणत्या मार्गावरून निघालो आहे, आता पुण्यावर आलो आहे, इथून विशिष्ट ठिकाण दिसत आहे याची कॉमेंट्री सांगत होते.

मुंबईच्या विमाननियंत्रण कक्षाची त्यांच्या उड्डाणाकडे लक्ष होते. 

काही वेळाने रडारवर जाणवलं की राजीव गांधी यांना नेणारे विमान वेगळ्याच मार्गाने निघाले आहे.  विमान संपर्ककक्षेतून गायब झाले. अचानक  झालेल्या या घटनेमुळे विमाननियंत्रक कक्षात खळबळ उडाली. कारण पंतप्रधान, मुख्यमंत्री असे दोन व्हीव्हीआयपी व्यक्ती विमानात आहेत.

हा नेमका प्रकार काय? घातपाती कारवाई आहे कोणालाही कळेना. विमानाशी संपर्क होत नव्हता. पण थोड्याच वेळात विमान सुरक्षितपणे महू ला लँड झाले आणि सर्वांच्या जीवात जीव आला.

खर तर विमानात असतानाच शरद पवारांना जाणवल की आता आपण जातोय तो मार्ग नेहमीचा नाही आहे.

त्यांनी राजीव गांधी यांना या बद्दल विचारलं देखील तर ते हसून म्हणाले की

मला एक शॉर्टकट माहित आहे. तिथून गेलो तर आपण लवकर पोहचू.

राजीव गांधी यांनी यापूर्वी एअर इंडिया मध्ये पायलट म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्यांना भारताच्या हवाई मार्गाचा कानाकोपरा ठाऊक होता. त्यामुळेच त्यांनी हे धाडस केलं होतं. शरद पवार त्यांना म्हणाले,

“राजीवजी, नियंत्रण कक्षाशी न बोलता असा हवाई मार्ग बदलता येतो का? “

तर राजीव गांधी म्हणाले,

“नाही. पण आपणच परवानगी न घेता जायचं.”

यावर शरद पवार म्हणाले,

“अहो पण हे अनाठायी धाडस नाही का होणार? अन्य विमानाच्या मार्गाआड आपण आलो व काही अनिष्ठ घडलं तर?”

राजीव गांधी म्हणाले,

“जे व्हायचं ते होईल.”

यावर शरद पवार खट्याळपणे म्हणाले,

“तुमचं ठीक आहे पण मला बऱ्याच जबाबदाऱ्या पार पडायच्या आहेत.”

राजीव गांधी यावर दिलखुलास हसले. पण त्यांनी रस्ता बदलला नाही व वेळेच्या आधीच महू ला विमान पोहचवल.

राजीव गांधी यांचा स्वभाव असाच धाडसी होता. त्यांच्या सख्ख्या धाकट्या भावाचं विमान अपघातात निधन झाल होत, त्यांच्या आईला अतिरेक्यांनी मारलं होतं, ते स्वतः अनेक अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर होते तरीही तारुण्यसुलभ साहस करण्याची खुमखुमी कमी होत नव्हती.

शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितलेला आहे. त्यात ते म्हणतात,

“त्यांच्यातल्या एका काहीशा अवखळ मुलाचं व कुशल वैमानिकाच दर्शन या घटनेमुळे मला झालं.”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.