राजीव गांधींच्याही आधी भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाचा पाया त्यांनी रचला होता.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. कॉम्प्यूटर म्हणजे काय हे अजून सर्वसामान्यांना कळायचं होत. सर्वसामान्य तर सोडाच पण मोठ्या उद्योगातही कॉम्प्युटर म्हणजे एखाद भुताटकीच मशीन असल्याप्रमाणे वागवल जायचं. कोणलाही कम्प्युटर नको होते.

फक्त एकच माणूस होता ज्याने पुढच्या पन्नास वर्षानंतरच भविष्य ओळखल होतं.

जे आर डी टाटा.

जेआरडी यांचा कामाच्या निमित्ताने युरोप अमेरिकेत वावर होता. तिथे झपाट्याने येत असलेल संगणक युग त्यांना दिसत होतं. त्यांच्या बहिणीचे पती म्हणजे कर्नल लेल्सी सॉनी यांनी त्यांना संगणकावर डाटा प्रोसेसिंग करणारी एखादी कंपनी सुरु करण्याचा सल्ला दिला.

टाटा उद्योगसमूह म्हणजे अस्ताव्यस्त वाढलेला पसारा होता. बाहेरून काम मिळाल नाही तर घरच्या कंपन्याच्या डाटा साठवून ठेवायच काम केलं तरी पुष्कळ आहे अस म्हणत जेआरडी यांनी एका नव्या कंपनीची स्थापना केली. याला नाव दिल,

टाटा कंप्युटिंग सेंटर! (TCS)

ते वर्ष होत १९६८. टाटांच मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउस येथे  सामानाची हलवाहलवी करून छोट्याशा जागेत टीसीएसची सुरवात करण्यात आली. जेआरडी यांनी त्याकाळचे ५० लाख रुपये या कंपनीत गुंतवले होते.

सरकार कंपनीला स्वतःचे संगणक विकत घेण्याचीदेखील परवानगी देत नव्हती त्यामुळे भाड्याने कंप्युटर घ्यावे लागले होते. 

तो काळ लायसन्सराजचा होता. भारतात वाढत असलेल्या प्रचंड लोकसंख्येला पोसण सरकारला जमेनास झाल होत. एकामागून एक येत असलेली युद्धे, त्यामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट, दुष्काळ अशा अनेक कारणांनी सरकार बेजार झालेले होते. त्यात कंप्युटर भारतात आले तर बेरोजगारी आणखी वाढेल असाच गैरसमज त्याकाळी सर्वमान्य होता. त्यामुळे या उद्योगाला कडक बंधनांनी बांधून घातलेलं होतं.

अगदी टाटाच्या इतर कंपन्यांनाही जेआरडीनी या पांढऱ्या हत्तीवर पैसे खर्च करणे पसंत नव्हते. टीसीएसला डाटा प्रोसेसिंगला माहिती देण्याससुद्धा टाळाटाळ व्हायची. जेआरडी यांचा खूप दबाव वाढला तर अगदी जुजबी माहिती देऊन झटकण्याचा प्रयत्न व्हायचा.

टीसीएसच सुरवातीच मोठ काम म्हणजे टिस्को उर्फ टाटा स्टील या कंपनीचे पंचिंग कार्डद्वारे डाटा गोळा करणे. 

अखेर जेआरडी टाटा यांच्या लक्षात आले की मोठे बदल केल्याशिवाय ही कंपनी स्थिरस्थावर होणार नाही. टीसीएस ची जबाबदारी तरुणांच्या हातात द्यायचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी निवड केली एफ.सी.कोहली यांची.

फकीरचंद कोहली हे तेव्हा टाटा पॉवरसाठी काम करायचे. अमेरिकेच्या एमआयटी या जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचा मास्टर्स पूर्ण केला होता. तिथेच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग त्यांना शिकायला मिळाल होत.

टाटा पॉवरमध्ये काम करत असताना मुंबईच्या इलेक्ट्रिक सप्लाय संदर्भात त्यांनी एक खास सॉफ्टवेअर बनवलं ज्यामुळे तिथे वीजपुरवठा खंडित होऊ लागला तर वेगळी स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित होते. आजही मुंबईमध्ये लाईट जात नाही याच श्रेय एफ.सी.कोहली यांना दिल जात.

जेआरडी टाटा यांच्या आदेशावरून कोहली यांनी टीसीएसची जबाबदारी स्वीकारली होती. तो पर्यंत या कंपनीचे नाव बदलून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस असे झाले .

एफ.सी. कोहली हे त्याकाळी आयआयटी मुंबई येथे गेस्ट लेक्चर घेण्यासाठी जात असत. भारताच्या युवापिढी मध्ये प्रचंड उर्जा भरलेली आहे. आयआयटी सारख्या उच्च दर्जाच्या शिक्षणसंस्थामध्ये शिकणारे विद्यार्थी बाहेरच्या देशात जातात त्यापेक्षा या हुशार विद्यार्थ्यांना आपल्या देशात काम द्यायचं हे कोहली यांच्या डोक्यात खूप दिवस घोळत होतं.

टीसीएसची जबाबदारी घेतल्यावर त्यांनी सर्वप्रथम आयआयटी कानपूर येथे कम्पस मुलाखती भरवल्या. तिथून टीसीएसचे पहिले मास रिक्रुटमेंट करण्यात आले.

याच आयआयटी कानपूरच्या पहिल्या बॅचच्या मुलांनी भारतात आयटी इंडस्ट्रीची पायाभरणी केली.

आधी सांगितल्याप्रमाणे भारतात संगणक क्षेत्रासाठी पोषक वातावरण नव्हते. टाटाच्या कंपन्या व इस्रो,हिंदुस्थान एरोनॉटीक्स अशा सरकारी कंपन्याची थोडीफार कामे यावर टीसीएसचा गुजारा सुरु होता. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशनमुळे आयातनिर्यातीवर बंधने घातली होती. संगणक उद्योगावर तर १३५% इतकी अन्यायकारक कर आकारणी होत होती.

एकदा तर संगणकाला यंत्र म्हणावे हे सांगण्यासाठी टीसीएसला न्यायालयात जावे लागले होते.

इंदिरा गांधींच्या आणीबाणीला हरवून आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारात तर हे नियम आणखी प्रचंड कडक झाले होते. तेव्हाचे उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी आयबीएम या जगातल्या सर्वात मोठ्या संगणक कंपनीला भारतातून पळवून लावले. एकूणच अंधकारमय वातावरण होते. पण याच अंधकारात कोहली यांनी टीसीएस साठी प्रकाशाचा किरण शोधला.

आयबीएम भारतातून जाणे हे एका अर्थे टीसीएसच्या पथ्यावर पडल. अनेक कंपन्याची कामे टीसीएसकडे येत होती. सरकारच्या आयुर्विमा महामंडळ या कंपनीने त्याकाळात प्रचंड मोठी गुंतवणूक करून संगणक विकत घेतले होते पण डाव्या कामगार संघटनाच्या दबावामुळे ते धूळ खात पडले होते.

पण धूर्त कोहली यांनी जनता सरकारला समजावून सांगून हे संगणक अगदी मूळ किंमतीत विकत घेतले. लायसन्स राज सुरु असतानाही टीसीएसकडे स्वतःचे संगणक आले.

सॉफ्टवेअरचा बिझनेस करायचा असेल तर फक्त भारतीय मार्केटवर अवलंबून राहून चालणार नाही हे कोहली यांनी ओळखल होतं. भारताबाहेर अमेरिकेत टीसीएसची शाखा उघडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी निवड केली रामदोराई यांची.

एकेकाळी १२ हजार डॉलर पगाराची अमेरिकेतली नोकरी सोडून महिना हजार रुपये पगार देणाऱ्या टीसीएसमध्ये काम करणाऱ्या रामदोराई यांना कोहली यांनी परत अमेरिकेला पाठवल. 

तेव्हा त्यांच्यावर टीका झाली की टीसीएसने अमेरिकेत सॉफ्टवेअर विकण्याचे ऑफिस सुरु करणे म्हणजे बनारस मध्ये गंगाजल विकण्यासरख आहे. हा न चालणारा धंदा आहे. पण कोहली आणि रामदोराई यांनी हे आव्हान स्वीकारले.

अगदी खेडवळ दिसणारे रामदोराई अमेरिकेत प्रत्येक कंपनीच्या दारोदारी जाऊन सॉफ्टवेअर विकण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अनेकदा अपमान सहन करावा लागला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्यांच्या कष्टामुळे हळूहळू अमेरिकेतली छोटी मोठी कामे त्यांना मिळू लागली. आयजीआयसी या बँकिंग क्षेत्रातील कंपनीला प्रोग्रामर्स हवे होते. टीसीएसने त्यांना आपल्या जवळील २ प्रोग्रामर्स दिले. काही दिवसातच त्यांचं काम पाहून प्रभावित झालेल्या आयजीएमसीने ही संख्या ३००  नेली.

ज्या साठी आपण प्रसिद्ध आहे त्या भारताच्या आउटसोर्सिंग इंडस्ट्रीचा पाया रचला गेला होता.

अमेरिकेत फक्त एका कर्मचाऱ्याच्या म्हणजेच रामदोराई यांच्या जीवावर टीसीएसने दोन वर्षात ७ लाख डॉलर इतकी कमाई केली होती. अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतीयांवर विश्वास ठेवण्यास सुरवात केली. टीसीएस पाठोपाठ इतर भारतीय कंपन्यांना मोप्ठी कामे मिळू लागली.

अगदी याच काळात भारतात राजीव गांधी यांनी संगणक क्रांती घडवून आणली. सॉफ्टवेअर उद्योगावरील कडक निर्बंध हटवले गेले. टाटा उद्योगसमुहात नव्याने उदयास येत असलेल्या रतन टाटा यांनी नव्या सरकारी धोरणांचा टीसीएसला फायदा करून दिला.

पुढे नव्वदच्या दशकात मनमोहनसिंग यांनी आणलेले जागतिकीकरण, नव्या शतकात y2k नंतर आलेल कंप्युटरच बूम याचा वेळोवेळी कल्पकतेने टीसीएसने फायदा करून घेतला.

फकीरचंद कोहली आणि त्यांच्या हातखाली तयार झालेले व त्यांच्यानंतर टीसीएसची धुरा सांभाळणारे रामदोराई यांनी करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारी अख्ख्या देशाचा अभिमान बनलेली कंपनी आशियात सर्वोत्तम बनवली.

आजही टीसीएस जगातल्या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीपैकी एक आहे. फकीरचंद कोहली यांना आजही भारताच्या संगणक क्षेत्राचे जनक असे संबोधले जाते.

अस म्हणतात की अख्ख्या पाकिस्तानच शेअर मार्केट विकत घेईल एवढी ताकद एका टीसीएस मध्ये आहे. पंचिंग कार्ड बनवणारी कंपनी या ठिकाणी पोहचू शकते हे जगात एक आश्चर्य मानल गेलं आहे.

टीसीएसला या स्थानापर्यंत पोहचवणारे एफ.सी. कोहली यांचे आज दुःखद निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.

संदर्भ- टाटायन लेखक गिरीश कुबेर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.