ज्या गोष्टीमुळे थट्टा झाली, त्याचं गोष्टीने ‘त्यांना’ हिटलरच्या छळछावणीतून जीवनदान मिळालं !!

आजघडीला जगभरात वैद्यकीय संशोधनासाठी प्राण्यांचा वापर करावा की नाही याची मानवतावादी दृष्टीकोनातून चर्चा होते, पण एकेकाळी हिटलरच्या जर्मनीने क्रूरतेचं कळस गाठत जिवंत माणसांनाच वैद्यकीय प्रयोगासाठी  वापरलं होतं.

आर्य वंश हा सर्वश्रेष्ठ वंश असून त्यांनी जगावर राज्य केलं पाहिजे, असं हिटलरचं स्पष्ट मत होतं. कृष्णवर्णीय लोक, जन्मजात व्यंग असणारे, मानसिक रुग्ण आणि समलिंगी लोकांमुळे मानवजातीच नुकसान होतं असं तो म्हणायचा. त्याचा सर्वाधिक राग ज्यूंवर होता.

ज्यूंच्या नाशासाठी त्याने कंबर कसली होती. त्याने जे जे देश जिंकले त्या देशातल्या ज्यूंची रवानगी त्याने छळ छावण्यामध्ये केली. गॅसचेंबरमध्ये घालून लाखो ज्यू स्त्री-पुरुष आणि बालकांचा संहार केला. तो कट्टर वंशवादी होता. अशुद्ध,आजारी, अशक्त लोकांना संपवणं हे त्यांचं सरंक्षण करण्यापेक्षा जास्त मानवतावादी आहे, असं तो म्हणायचा.

असल्या टोकाच्या कट्टर वंशवादी विचारसरणीतून  त्याने आपल्या छळछावण्यामधून काही प्रयोग केले होते. तिथे येणाऱ्या ज्यूमधून जुळी मुलं, मानसिक रोगी किंवा कोणतही व्यंग असलेले लोक वेगळे काढले जायचे आणि त्यांना मेडिकल केअरमध्ये डॉक्टरांच्या हवाली केलं जायचं. डॉ. जोसेफ मेंगेल नावाचा मानववंश शास्त्रज्ञ यांत आघाडीवर होता. त्याला असं वाटायचं की आपण हे प्रयोग विज्ञानाच्या भल्यासाठी करतोय.

megele
डॉ. जोसेफ मेंगेल

आपल्या याच समजातून मानवजातीला काळीमा फासणारे अनेक क्रूर प्रयोग त्याने केले. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा माणूस किती कमी तापमानापर्यंत जगु शकतो हे तपासण्यासाठी त्याने अनेक ज्यूंना थंड पाण्याच्या टबात ठेवलं आणि हळूहळू तापमान कमी करत ज्या तापमानाला माणूस मरतो त्याची नोंद घेतली. त्याच्या या असल्या अघोरी प्रयोगांमुळेच तो ‘एंजल ऑफ डेथ’ अर्थात ‘मृत्यूदूत’ म्हणून ओळखला जायचा.

जोसेफ मेंगेलच्या या प्रयोगाचा भाग असलेले ७ बहिणभाऊ मात्र सहीसलामत वाचले. जगातल्या सगळ्यात मोठ्या बुटक्या कुटुंबाचा ते भाग होते. ‘ट्रान्सलविनिया’ देशात हे ‘ओवीट्झ’ कुटुंब राहायचं. स्वतः  ठेंगू असणाऱ्या शिमसोन ओवीट्झ यांना  १०  मुलं होती. त्यापैकी ७ बुटके होते. त्यांचं बुटक असणं हे लोकांना त्यांची थट्टा करण्यासाठीचा विषय होता. पण पुढे जाऊन हीच गोष्ट त्यांना जीवनदान देणार होती.

शिंमसोनच्या अकाली मृत्यूमुळे ओवीट्झ कुटुंब उघड्यावर आलं. ही सर्व मुले गाणी छान म्हणायची. मग त्यांनी ‘लिलीपुट’ नावाने आपला एक ट्रूप बनवला आणि देशोदेशी गाण्याचे कार्यक्रम ते करू लागले. बुटकी भावंडं स्टेजवर तर सामान्य उंची असणारी भावंडं स्टेजच्या  पाठीमागे काम करायचे.

अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ही भावंडं नाझी सैनिकांच्या ताब्यात  सापडली. ज्यू असल्यामुळं त्यांना पोलंडच्या ‘औश्विट्झ’ या छळ छावणीमध्ये हलवण्यात आलं. तेथे एकाच कुटुंबातले एवढे सगळे बुटके पाहून त्यांना डॉ. मेंगेलच्या हवाली करण्यात आलं. मेंगेलने त्यांना ठेऊन घेतलं.

काही दिवसातच त्याने त्यांच्यावर आपले प्रयोग करायला सुरुवात केली.  दररोज त्यांचे कानामागून  रक्ताचे नमुने काढले जाऊ लागले, केस कापले जाऊ लागले. कानात गरम पाणी ओतलं जायचं. डोळ्यात केमिकल घातलं जायचं. एक दिवस त्यांचे दात काढून घेण्यात आले. त्यांना नग्न करून अधिकाऱ्यांसमोर करमणुकीचे खेळ करायला लावलं जायचं.

hitler
क्रूरकर्मा हिटलर

हे सगळे प्रयोग कमी अमानवी होते म्हणून की काय पण हे सगळं हिटलरला दाखवून त्याला खुश करता येईल म्हणून मेंगेलने या प्रयोगांची फिल्म बनवली. ओवीट्झ कुटुंबासोबत ठेवलेल्या दोन बुटक्यांचा प्रयोगदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांना उकळत्या पाण्यात टाकून त्यांचे सांगाडे म्युझियमसाठी ठेवण्यात आले.

ओवीट्झ कुटुंबीय मात्र मरणप्राय यतना सहन करून देखील जिवंत राहिलं. काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की हे कुटुंबीय मेंगेलच्या  लाडक्या प्रयोगाचा भाग होते आणि मेंगेलचे देखील लाडके होते. त्यामुळे मेंगेलनेच ते मरणार नाहीत याची काळजी घेतली.

पुढे रशियन सैन्याने ही छळ छावणी मुक्त केली. अविश्वसनीयरित्या ओवीट्झ बुटके स्वतःच्या पायावर चालत तिथून बाहेर पडले. मेंगेल मात्र रशियन सैन्याच्या तावडीतून सहीसलामत पळाला. पुढे त्यानं आपलं उर्वरित आयुष्य ब्राझीलमध्ये सुतारकी करत व्यतीत केलं. ओवीट्झ बुटक्यांनी त्यांचा लिलीपुट ट्रूप परत सुरू केला. स्वतः भोगलेलं दुःख लपवून पुढे अनेक वर्षं ते लोकांची करमणूक करत राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.