वयाच्या आठव्या वर्षी त्याला अटक झाली आणि गुन्हा सिद्ध झाला ‘सिरीयल किलिंग’चा

बिहारच्या बेगुसरायमधलं मुसहरी गाव. इतर गावांसारखं इथलं आयुष्यही निवांत सुरू होतं. पण प्रत्येक गावात काही ना काही कांड होत असतंच. जो तिथल्या पारावरचा चर्चेचा विषय असतो, बायकांच्या कपडे धुण्यावेळीही यावरच गप्पा रंगतात.. पण ही चर्चा हवेत विरुन जाते कारण त्याबद्दल ठोस माहिती कुणाकडेच नसते. मुसहरीमध्येही असंच एक कांड झाल्याच्या गप्पा रंगायच्या, पण लोकं फक्त दबक्या आवाजात चर्चा करायची पुढं काहीच नाही.

एक दिवस मात्र गावात पोलीस आले, त्यांनी काही लोकांची चौकशी केली आणि एका मुलाला ताब्यात घेतलं. गुन्हा होता मर्डरचा. मर्डर झाले होते तीन. दुर्दैवानं बळी पडलेल्यांचं वय बोलता येईल इतकंही नव्हतं. ज्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याच्यावर लोकांचा संशय होताच… त्यात पोलिसांच्या कारवाईनंतर लोकांच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं.

गावाबाहेरच्या लोकांना हादरवणारी गोष्ट होती, ज्याला ताब्यात घेण्यात आलं होतं त्या मुलाचं वय होतं..

फक्त आठ वर्ष.

२००७ मध्ये ही घटना घडली, तेव्हा त्याच्या नावावर तीन हत्त्यांचे आरोप आले होते. यातले दोन गुन्हे तर तो सातव्या वर्षीच करुन बसला होता, जे पाठीशी घातले होते त्याच्याच घरच्यांनी. ही बातमी बाहेर आली तेव्हा बिहारच काय, सगळा देश हादरला होता. कित्येक जण आपल्या लहान लेकरांना घराबाहेर पाठवायला तयार नव्हते.

जगातला सगळ्यात छोटा सिरीयल किलर – अमरजीत उर्फ अमरदीप सदा.

अमरजीतचे आई वडील दोघंही मजूर होते. घरची परिस्थिती चांगली होती अशातली गोष्ट नव्हती. सगळं तसं नाकासमोरच्या रेषेत सुरू होतं आणि तेवढ्यात चर्चा सुरू झाली, की अमरजीतची सक्खी लहान बहीण गायब झालीये.

पण आपली आठ महिन्यांची मुलगी गायब झाल्यानंतरही त्याच्या आई वडिलांनी कुठलीच तक्रार केली नाही किंवा कांगावा केला नाही. नंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की, अमरजीतनं आपल्याच सख्ख्या बहिणीला नाल्यात फेकून दिलं.

या घटनेभोवतीचं मोहोळ खाली बसलं नव्हतं, तेव्हाच आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे, अमरजीतनं आपल्या मामेबहिणीचाही खून केला. मात्र अमरजीतचे आई वडील या गोष्टी लोकांपासून लपवत होते. कुणी अमरजीतवर आरोप केलाच, तर ते त्याचा बचाव करायचे.

तिसऱ्या प्रकरणानंतर मात्र या सगळ्याला वाचा फुटलीच

गावातल्या अंगणवाडीमध्ये एक सहा महिन्यांची मुलगी खेळत होती. कुणाचं लक्ष नाहीये असं वाटून त्यानं त्या मुलीला उचललं आणि शेताच्या बाजूला घेऊन जाऊ लागला. नेमकं तिथंच आजूबाजूला खेळणाऱ्या काही मुला-मुलींनी त्याला पाहिलं. एक मुलगी त्याला अडवायला गेली, तर अमरजीत तिला चावला.

पुढं ती सहा महिन्यांची मुलगी गायब झाली आणि तिच्या आईनं चौकशी करायला सुरुवात केली. साहजिकच अमरजीतचं नाव पुढं आलं. त्या महिलेनं अमरजीतला जाब विचारला, तेव्हा त्यानं थंड डोक्यानं आपण खून कसा केला आणि मृतदेह कुठं टाकला हे सगळं सांगितलं. गोष्ट पोलिसांमध्ये गेली आणि अमरजीतला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी अमरजीतला या सगळ्याबाबत प्रश्न विचारले, पण त्यानं काही उत्तर दिलं नाही. पोलिसांनी त्याच्या कलानी घेत, पुन्हा प्रयत्न केले तेव्हा अमरजीतचं उत्तर साधं होतं,

‘बिस्कुट खिलाओ, फार बताता हूँ.’

बिस्किटाच्या पुडाच्या जोरावर त्यानं सगळ्या गोष्टींची कबुली दिली, कुणाला मारलं, कसं मारलं, मारून पुढे काय केलं या सगळ्याची. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नव्हती, त्याला कसला खेद नव्हता. हे सगळं का केलंस यावर त्यानं उत्तर दिलं…

“बस मार दिया.”

पोलिसांनी अमरजीतला ताब्यात घेतलं, न्यायालयात त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला आणि त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली.

आता आपल्याला एक प्रश्न पडतो, तो म्हणजे पोरानं एवढे कांड केले, तर आई बाप काय करत होते…?

माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार, अमरजीतची आई म्हणते की, ‘तो लहानपणापासूनच रागीट होता. शाळेत गेला, तरी खिचडी खाऊन परत यायचा. अभ्यास वैगेरे करायचा नाही, त्याच्या अशा वागण्यामुळं मी त्याला तावीज बांधला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.’

दुसऱ्या बाजूला अमरजीतच्या वागण्याबद्दल अशी माहिती मिळते की. तो ज्या लहान मुलांसोबत खेळायचा त्यांच्याशीही हाणामारी करायचा, जर त्याला कुणी खेळायला घेतलं नाही, तर त्यांनाही मारहाण करायचा. त्यामुळे त्याचे मित्रही कमी झाले होते.

अमरजीतनं इतक्या कोवळ्या वयात इतके गंभीर गुन्हे करण्यामागं दोन कारणं सांगितली गेली. त्याला त्याच्या पालकांकडून मिळालेली वागणूक आणि कंडक्ट डिसॉर्डर नावाचा  मानसिक आजार.

अमरजीतचे वडील मजूर होते, मुसहरीमधले ग्रामस्थ सांगतात की, त्यांनी अमरजीत लहान असल्यापासूनच त्याला मजदुरी करायला लावली होती. त्याच्या मनाविरुद्ध आणि क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक श्रम घेण्याचा त्रास त्याला झाला आणि याचा परिणाम त्याच्या कृतीमध्ये दिसला.

कंडक्ट डिसॉर्डर नावाचा आजार काय असतो…?

तर हा एक मानसिक विकार आहे, ज्याचं निदान बाल्याव्यवस्थेत होतं. यात रुग्णाला काय चांगलं आणि काय वाईट हे समजत नाही. समाजमान्य नसलेल्या गोष्टी म्हणजे, चोरी करणं, हिंसा करणं किंवा खोटं बोलणं अशा कृतीला ते प्राधान्य देतात.  हा आजार होण्यामागचं कारण घरातून झालेलं दुर्लक्ष किंवा चुकीची वागणूक हेही असू शकतं असंही सांगण्यात येतं. योग्य वेळेस उपचार केले, तर यातून बाहेरही पडता येतं.

जर अमरजीतच्या घरच्यांनी त्याच्यावर योग्यवेळी उपचार केले असते, त्याला कामाला जुंपलं नसतं.. तर कदाचित आज त्याची ओळख जगातला सगळ्यात लहान सीरिअल किलर अशी नसती आणि तीन चिमुरडे जीवही वाचले असतील.

नियमानुसार वयाच्या अठराव्या वर्षानंतर बालसुधारगृहातून रवानगी होते, साहजिकच अमरजीतचीही झाली असेल… फक्त तो आता कुठे आहे… हे माहित नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.