टाटांची एकच कंपनी पाकिस्तानचं संपूर्ण शेअरमार्केट विकत घेऊ शकते.
गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची.
टाटा समूहाच्या गळ्यातील ताईत असलेली ‘टाटा कंसल्टन्सी सर्विसेस’ अर्थात टीसीएस या कंपनीने ऐतिहासिक कामगिरी बजावत १०० अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला.
जगभरात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक बाजार मूल्य असणाऱ्या फक्त ६३ कंपन्या अस्तित्वात असल्याने, ही घटना भारतीय औद्योगिक जगतात मैलाचा दगड ठरली. या घटनेने टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तोरा खोवला गेला.
टीसीएसने २०१८सालच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आपला निव्वळ नफा ६९०४ कोटी नोंदवल्यापासूनच कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळाली. शेअर्सच्या वाढत्या किमतीमुळे दलाल स्ट्रीटवर या कंपनीची गाडी सुसाट सुटली.
त्याचाच परिणाम असा की शेअर बाजारात त्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने दमदार कामगिरी करत १०० अब्ज डॉलर बाजार मूल्याचा आकडा ओलांडला. १०० अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक बाजार मूल्य असणाऱ्या कंपन्यांमध्ये अँपल बामु (८४६ अब्ज डॉलर्स), गूगल (७४६ अब्ज डॉलर्स), अमेझॉन (७४० अब्ज डॉलर्स), मायक्रोसॉफ्ट (७३१ अब्ज डॉलर्स), फेसबुक (४८२ अब्ज डॉलर्स) या जागतिक उद्योग क्षेत्रातील दादा कंपन्यांचा समावेश होतो.
कंपनीचं बाजामुल्य अर्थात मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे नेमकं काय…?
एखाद्या कंपनीच बाजारमूल्य म्हणजे त्या कंपनीच्या बाजारात असलेल्या शेअर्सची एकूण किंमत होय. बाजारातील हे शेअर्स व्यक्ती, संस्थात्मक गुंतवणूकदार, कंपनीचे अधिकारी यांच्याकडे असतात. या सर्व घटकांकडील शेअर्सची एकत्रित किंमत म्हणजे त्या कंपनीचं बाजारमूल्य किंवा ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ होय.
कंपनीचं बाजामूल्य कसं ठरवलं जातं…?
कुठल्याही कंपनीचे भांडवली बाजारातील एकूण शेअर्स आणि त्या कंपनीच्या एका शेअरची भांडवली बाजारातील अर्थात शेअर मार्केट मधील चालू किंमत यांचा गुणाकार करून त्या कंपनीचं बाजारमूल्य ठरवलं जातं. उदारहरणार्थ, एखाद्या कंपनीचे १००० शेअर्स बाजारात असतील आणि कंपनीच्या एका शेअरची किंमत २००० असेल तर त्या कंपनीचे बाजामूल्य हे १०००×२०००= २०,००००० इतकं होईल.
टीसीएसने १०० अब्ज डॉलरच्या बाजारमूल्याचा टप्पा ओलांडताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यावर एक नजर-
- १०० अब्ज डॉलर बाजारमूल्याचा टप्पा ओलांडणारी जगातील ६४ वी कंपनी आणि पहिलीच भारतीय कंपनी
- सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या शेअर्स मार्केटमधील एकूण शेअर्सच्या (एकूण मूल्य ८० अब्ज डॉलर्स) मूल्यापेक्षा २५% अधिक आहे
- कंपनीचे बाजारमूल्य हे जगभरातील १२८ देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाएवढे आहे. या देशांमध्ये श्रीलंका,स्लोवाकिया, लक्झेम्बर्ग,केनिया आदी देशांचा समावेश होतो.
- भारताच्या एकूण राखीव परकीय साठ्याच्या(४२६ अब्ज डॉलर्स) एक चतुर्थांश बाजारमूल्य असणारी कंपनी म्हणून यापुढे टीसीएसकडे बघितलं जाईल.
- टीसीएसचं बाजामूल्य हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर सर्व भारतीय कंपन्यांच्या एकत्रित बाजारमुल्याहून अधिक आहे.
हे ही वाचा भिडू.
- लॅक्मे नव्हे लक्ष्मी. नेहरुंनी सांगितलं, टाटांनी बनवलं
- पोराचं जिओसाठी कौतुक करताय, पण बाप तर भारताची माती थेट अरबांना विकत होता !!!
- भारत आणि चीनच्या युद्धामुळे रतन टाटा अविवाहित राहिले !