बॉसचा राग आला, म्हणून तिने अख्ख्या गोदामालाच आग लावली

काही महिन्यांपूर्वी एक सर्वे करण्यात आला होता. सर्वे होता नोकरी चांगली कि स्वतःचा व्यवसाय. अर्थातच व्यवसायाच्या बाजूने लोकांचा जास्त कौल होता. त्यामागचं कारण विचारलं तर स्वतःचं प्रॉफिट तर होतंच, पण दुसरं कारण म्हणजे नको असलेली बॉसगिरी.

काम अर्धवट राहील, टार्गेट पूर्ण नाही, प्रॉफिट कमी झालं, ही चूक झाली, आमुक – तमुक अश्या कित्येक कारणानं रोज बॉसच्या शिव्या खायला लागतात. त्यापेक्षा आपला बिसनेस बरा आणि आपण बरं असं या लोकांचं म्हणणं. आता यात बॉस लोकांची तरी काय चूक नसते म्हणा.

पण या बॉसगिरीला वैतागलेली मंडळी आपपल्या पद्धतीने ती भडास काढतात. आता ती पद्धत आपण काय सांगत बसणार नाही भिडू, कारण आपल्या पण रोजीरोजीचा सवाल आहे. असो..

पण तुम्ही कधी बॉसच्या रागावरून अख्ख्यच्या अख्ख गोदाम जाळून टाकलेलं  ऐकलंय. पण आता ऐकालं.

ही घटना आहे थायलंड मधली. जिथं एका महिला कर्मचाऱ्याने बॉसच्या कटकटीला कंटाळून जिथं ती काम करायची ते गोदामचं जाळून टाकलंय. तिच्या या पराक्रमामुळं साधं- सुध नाही तर करोडो  रुपयांचं नुकसान झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार अॅन श्रिया अस या ३८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. बॉसच्या सततच्या बडबडीला आणि तणावाला वैतागून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना रेकॉर्ड झालीये.

ज्यात क्लियरकट दिसतंय कि, बहुतेक बॉससोबत हुज्जत घालून ती एक कागदाचा तुकडा सोबत घेऊन आली.  लायटरच्या मदतीने तो कागद तिनं पेटवला आणि तो इंधनाच्या कंटेनरवर फेकून दिला. ज्यामुळं थायलंडच्या नाखोन पाथोम भागातील  प्रापकॉर्न ऑईलच्या गोदामाला मोठी आग लागली.

एक कागदाच्या तुकड्यामुळं लागलेल्या आगीने इतका पेट घेतला कि, थोड्या वेळातच अख्खच्या अख्ख गोदाम जाळून खाक झालं. आगीचे लोट पाहून कंपनीच्या परिसरात चेंगराचेंगरी  सुरु झाली. गोदामाला लागलेली इतकी भयंकर होती कि, अग्निशमन दलाच्या एक- दोन गाड्यांची आग काही विझेना म्हणून ४० पेक्षा जास्त गाड्या तिथं बोलवायला लागल्या. या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एवढ्या ४० गाड्या असूनही आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्कालीन सेवांना सुमारे चार तास लागले.

ज्या गोदामाला आग लागली, त्या ठिकाणी हजारो गॅलन तेल असलेले कंटेनर होते. ज्यामुळे आग भडकली. या घटनेमुळे कंपनीचं थोडथोडकं नाही तर तब्बल सुमारे ९ कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

या घटनेनंतर महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्यानंतर तिने आपणचं हीच आग लावल्याची कबुली दिली. आरोपी महिलेने म्हंटल कि, तिचा बॉस तिला कामावरून सारखा त्रास देत असायचा. सारखी कटकट करायचा. यालाच वैतागून तिनं हे पाऊल उचललं.

महत्वाचं म्हणजे या आगीत कंपनीचं गोदाम तर जळालचं पण सोबत आसपासच्या दहापेक्षा जास्त घराचं सुद्धा नुकसान झाल्याचं बोललं जातंय. पण कुठलीही जीवितहानी  झाली नाही एवढं बरं.

पोलीस याप्रकरणी कंपनीच्या मालकाचीही चौकशी करत आहेत. माहितीनुसार ही आरोपी महिला त्या कंपनीत गेल्या ९ वर्षांपासून काम करत आहे. पण ती असं पाऊल उचलेल याची त्याला कुठलीच कल्पना सुद्धा नव्हती. ती कामचुकारपना करायची म्हणून आपण तिला बोललो असं कंपनीच्या मालकानं काबुल केलं.

आता या महिला कर्मचाऱ्याने जे केलं ते चुकीचचं आहे. पण बिचाऱ्या बॉसला यामुळं चांगलाच भुर्दंड बसलाय एवढं मात्र नक्की.

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.