पूर्व विदर्भात लाखो एकर जमिनीवरील पिकाचे नुकसान झालेय.. पण सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल का?
पूर्व विदर्भात आलेला पूर ओसरला असला तरी अजूनही काही भाग पुराच्या पाण्याखालीच आहे. पुराच्या भागात शेतीची कामे खोळंबली आहेतच परंतु पूर ओसरलेल्या भागातही शेतीच्या कामांना सुरुवात होत नाहीये. बहुतांश कास्तकारांच्या सारख्याच प्रतिक्रिया आहेत..
कोटचा खांडी बांदतेस बाप्पा.. पाऊस नाही पायलास का? रायते रायते न झोडपूनच काढते. खांडी खुल्या आहेत तरी बांद्याहातून पानी नाही निगला. अर्ध्यापेक्षा जास्त परा त कुजूनच गेला आये. रोवशील त काच्यान रोवशील म्हणतो..
अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात आहे. काहींचे परे गेले, काहींचा रोवना गेला, काहींची सोयाबीन गेली तर अनेकांच्या भाताच्या पाळीवर उगवलेल्या तुरी वाहून गेल्या आहेत.
मात्र मागणी करूनही ओला दुष्काळ घोषित होण्याचा आणि सरकारच्या मदतीचा काही थांगपत्ता नाही..
पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीने आणि आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पूर्व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नेत्यांकडून राज्य सरकारला केली जात आहे.
काही गावांमध्ये झालेल्या नुकसानीचा सर्व्हे चालू झाला आहे. मात्र याची नुकसान भरपाई मिळेल कि नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.
पण हा ओला दुष्काळ कसा असतो आणि पावसामुळे दुष्काळ कसं काय पडतो बरं?
दुष्काळ म्हटला कि आपल्या डोळ्यासमोर कोरड्या जमिनी आणि पाण्यासाठी वणवण फिरणारे लोकं दिसतात. पण दुष्काळ म्हणजे असाच नसतो. अति जास्त पाऊस पडला तरी दुष्काळ पडतो. तो म्हणजे ओला दुष्काळ..
पावसामुळे भाताचे पऱ्हे पाण्याखाली बुडून कुजतात, शेतात घातलेलं खात वाहून जातं, पाळीवर लावलेल्या तुरी मुळासकट निघून जातात, पाण्याची धार लागते त्या जागी सुपीक माती वाहून जाते.
सोयाबीन, कापूस आणि मिरची तर पूर्णपणे सोडून जाते आणि परत लागवड करायची तर जमीन सुकायला १५ ते २० दिवस लागतात. या सगळ्यात शेतकऱ्यांचा पैसे, कष्ट आणि वेळ सगळं वाया जातं. असाच ओला दुष्काळ सध्या पूर्व विदर्भात पडला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
याबाबत जाणून घेण्यासाठी बोल भिडूने गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी सातपुते बंधूंशी संपर्क साधला..
बोल भिडूशी बोलतांना वसंत सातपुते आणि किरण सातपुते असं सांगतात..
“सलग आलेल्या पावसामुळे आम्हा दोन्ही भावंडांच्या एकूण ३१ एकर शेतीपैकी जवळपास १२ एकर जमिनीचे भाताचे पळे पूर्णपणे कुजले आहे. तर ६ एकराचे पळे पिवळे पडले आहे आणि सात-आठ एकर जमिनीवरच्या आवत्या पूर्णपणे सडून गेल्या आहेत.” असे सातपुते बंधूंनी सांगितले.
पुढे बोलतांना सातपुते बंधू सांगतात कि, “आमचेच नाही तर आमच्या गावातील जवळपास अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाले आहे. सगळ्यांच्या आवत्या आणि पळे कुजून गेले तर पाळीवरच्या तुरी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे परत महागडे बियाणे परवडणार नाही. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे.” असं सातपुते बंधूंनी म्हटलं आहे.
सव्वा तीन लाख एकराहुन अधिक जमिनीवर नुकसान झालंय..
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे पूर्व विदर्भातील अंदाजे पाच लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात भात, सोयाबीन, कापूस, तुरी, तीळ आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी जमिनी अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत तर अनेक ठिकाणी जमिनीवरची सुपीक माती वाहून गेली आहे. अनेकांनी शेतात घातलेलं खत पाण्यात वाहून गेलंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यासोबतच मोठ्या प्रमाणावर मनुष्य आणि पशूंची जीवितहानी झाली आहे. अनेक घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत जाणून घेण्यासाठी बोल भिडूने भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी तुपकर गावचे शेतकरी जगदीश मेश्राम यांच्याशी संपर्क साधला..
बोल भिडूशी बोलतांना जगदीश मेश्राम असं सांगतात..
“सलग दोन आठवडे पाऊस येत होता आणि नदीचे पाणी सुद्धा शेतात शिरले. त्यामुळे माझे दोनही एकराचे भाताचे पळे सडून गेले आहेत. पळ्यांसोबत पाळीवरच्या तुरी सुद्धा वाहून गेल्या आहेत. माझ्यासारखा सामान्य शेतकरी एवढं मोठं नुकसान सहन करू शकत नाही. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्यात यावी.”
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास किती मदत मिळेल..
ओला दुष्काळ जाहीर झाल्यास २०१५ च्या शासन निर्णयानुसार हेक्टरी ३४ हजार रुपये मदद देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार एकरी १३,६०० रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळतील.
मात्र भात, कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या लागवडीसाठी यापेक्षा जास्त खर्च येतो, रासायनिक खते आणि बियाण्यांच्या किंमती वाढलेल्या आहेत तसेच पूर ओसरल्यानांतर पुन्हा जमीन लागवडीयोग्य बनवण्यासाठी बराच खर्च येणार असल्याने मिळणारी रक्कम पूरेशी नाही.
त्यासाठी नवीन सुधारित नियम बनवून हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने ‘गडचिरोली कृषी पदवीधर संघटनेचे’ सदस्य आणि प्रगतिशील शेतकरी विनय धोडरे यांच्याशी संपर्क साधला.
शेतीसाठी येणाऱ्या खर्चाबद्दल बोल भिडूशी बोलतांना विनय धोडरे सांगतात..
“नांगरणी, वखरणी, खुरपणी, पळे टाकणे, खतं, औषधांची फवारणी आणि मजुरांना दिलेली मजुरी या सगळ्यांचे गणित जुळवले तर ओल्या दुष्काळावर मिळणारी मदत पुरेशी नाही. काही एक मोठे शेतकरी सोडले तर मुळात गरीब असलेल्या या भागातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा भार मोठा आहे.” असं ते म्हणाले.
झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे मात्र ओला दुष्काळ जाहीर केव्हा होणार?
अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील सर्व सहाही जिल्ह्यात नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. स्थानिक कृषी सहाय्यक, तलाठी आणि सरपंच यासाठी शेतीला भेट देऊन पाहणी करत आहेत.
शेतीचे झालेले नुकसान पाहून अधिकारी सुद्धा हळहळ व्यक्त करत आहेत. आम्ही फक्त पंचनामे करू शकतो. निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र आम्ही आमच्या परीने नक्की पाठपुरावा करू असे सांगून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे सांत्वन केले जात आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार नुकसानीची पाहणी करत आहेत..
राज्यात राजकीय उलथापालथ होत असली तरी, देवेंद्र फडणवीस हे पूर्व विदर्भातील नागपूरचे आहेत. तसेच त्यांची आजोळ चंद्रपूर जिल्ह्यातील मुलमध्ये असल्यामुळे फडणवीसांनी कायम पूर्व विदर्भातील समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले आहे.
फडणवीसांबरोबरच सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे मोठे नेते सुद्धा याच भागातील असल्यामुळे नुकसान भरपाई मिळेल असा अंदाज आहे.
त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची सुरुवात होताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करतील अशीही अपेक्षा सुद्धा लोकांना आहे..
हे ही वाच भिडू
- गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच पूर येतो..मात्र सांगली-कोल्हापूर सारखी याची चर्चा होत नाही..
- तुटपुंजी मदत नको तर थेट ओला दुष्काळ जाहीर करा !