जिथं फिरकू दिलं जातं नव्हतं त्याच जिल्हा बँकेत बाळासाहेब पाटलांनी आपला झेंडा गाडला

राजकारण…. 

ज्याची सुरुवातच एका कारणानं होते. शेवट होतो एकतर विजय किंवा पराजयाने. मग यासाठी विरोधात जावं लागलं तरी बेहत्तर. पण लढणारच. पण काही गोष्टी या सगळ्यालाच छेद देणाऱ्या असतात. आजची गोष्ट एका अशाच नेत्याची आहे ज्याने जिल्हा बँकेतल्या एका जागेसाठी बराच काळ वाट पाहिली. अजिबात विरोध केला नाही. आणि शेवट काय तर… त्यांचा विजय झालाय.

बाळासाहेब पाटील.

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील….सहकारमंत्री बाळासाहेब पाटील. इथलं राजकारण वेगळं आहे…कारण हे सातारा आहे.

Welcome To Satara…

सातारा म्हंटल की डोळ्यासमोर पाहिले राजकारणी यावेत ते म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. कृष्णाकाठ नेहमीच सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. जिल्ह्यावर एकहाती पकड हीच त्यांची खासियत.

यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर आबांनी सातारा जिल्ह्याच राजकारण एक हाती ठेवलं. सत्तेची वाटणी करताना असं ठरलं की चव्हाणांनी महाराष्ट्र आणि दिल्ली बघायची तर आबांनी सातारा जिल्ह्यात त्यांचं नेटवर्क सांभाळायचं.

याच जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच व्यासपीठ होती.

सहकार हा सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा पाया असल्याने सगळी सूत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेतून हलवायचा पायंडा तेव्हापासूनच पडलेला. हा शिरस्ता पुढं विलासराव पाटील-उंडाळकर अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी हिमतीने सुरू ठेवला. राजकीय मुत्सद्देगिरीत या मंडळींनी बँक नेहमीच आपल्या आणि आपल्या समर्थकांच्या हातात कशी राहील हेच पाहिलं.

एक काळ असा होता की अजितदादांना पण ही एकदा बँक ताब्यात घेण्याचा मोह आवरता आला नव्हता. मात्र पक्षविरहित आघाडीचं गोंडस नाव पुढं करत सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी अजित दादांची डाळ काय शिजू दिली नव्हती.

साधारण दहा वर्षांपूर्वीचा काळ असेल जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची हुकुमत वाढतच होती. त्यावेळी पक्षविरहित पॅनेल गुंडाळून राष्ट्रवादी विरोधात अन्य अशा सरळ सरळ लढती व्हायला लागल्या. जस जसं राष्ट्रवादीचा प्राबल्य वाढत होतं तसा प्रत्येक राजकीय नेता आपल्या वारसाची अथवा समर्थकांची सोय जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि अन्य ठिकाणी लावण्यात मश्गुल होता.

या सगळ्या राजकारणात कराड उत्तर मधून सलग दोन वेळा निवडून आलेले, प्रतिकूल परिस्थितीत शरद पवारांचे निष्ठावंत राहिलेले आणि पी. डी. पाटील यांचा वारसा चालवणारे एक नेते म्हणजे

बाळासाहेब पाटील

त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत फिरकूच दिलं जातं नव्हतं. राष्ट्रवादीचा दबदबा असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या वर्तुळात पक्षाचा निर्णय घेणारे काही नेते होते. हे नेते बाळासाहेबांना त्यांच्या गिणतीत धरतच नव्हते.

बाळासाहेब पाटील त्यांच्या वडिलांनंतर कराड उत्तरच नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून करत होते. १९९९ आणि नंतर २००४ ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवरच निवडून आले.

पण २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेबांचे तिकीटही कापलं होतं. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकही नेता बाळासाहेबांच्या मागे उभा राहिला नाही. तरीही बाळासाहेबांच्या कपबशीने बाजी मारलीच. तिसऱ्यांदा ते विधानसभेत पोहचले. एवढं करूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेत बाळासाहेबांना इंट्री मिळतच नव्हती.

पुढं २००९ साली बाळासाहेबांनी स्वतः हून ठरवलं की गृहनिर्माण मतदारसंघात उभं राहायचं. बाळासाहेबांना त्यावेळी मोठा धोका दिला गेला. बरच काही रामायण-महाभारत त्यावेळी घडलं.

या राजकारणात विलास काका पाटील उंडाळकरांचा पण एक गट होता.

उंडाळकर गटाने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा यांच्या मार्गदर्शनाखाली १९६७ साली कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून विलासराव उंडाळकर यांच्या रूपानं जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग ११ वेळा याच मतदारसंघातून विलास काका बँकेत संचालक राहिले.

२००९ मध्ये जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक झाली तेव्हा काॅंग्रेसचे जेष्ठ नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पॅनलमधून उदयनराजेंनी गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पॅनलचे बाळासाहेब पाटील विरुध्द उदयनराजे अशी ती निवडणूक झाली.

त्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद असूनही बाळासाहेब पाटील यांच्यासारखा मातब्बर विरोधात असतानाही उदयनराजेंनी एकतर्फी विजय मिळविला होता. बाळासाहेब पाटील पराभूत झाले होते. 

पुढं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषी प्रक्रिया मतदार संघातून बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर चौथ्यांदा आमदार झाले होते. मात्र ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकर यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बाळासाहेबांना माघार घ्यायला लागली. त्यांनी माघार घेतली नाही. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली होती. शेवटी तडजोड होऊन बाळासाहेबांना पाठिंबा द्यायला भाग पाडलं गेलं.

निवडणुकीच्या बॅलेट पेपर वर उमेदवार म्हणून नाव असलेल्या बाळासाहेबांना स्वतःचे हक्काचे मत ही दादाराजेंना द्यायला लागलं होत. कालांतराने राष्ट्रवादीने बाळासाहेबांना स्वीकृत संचालक केलं.

यानंतर पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं. राज्यात महाविकास आघाडीच सरकार आलं. या सरकारमध्ये बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले. आता सहकार मंत्री म्हंटल्यावर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या, कारखान्यांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लावण्याचे अधिकार त्यांच्याच हातात.

पण तरी रस्ता काही सोप्पा नव्हता.

यावेळी निवडणूक प्रक्रिया ही त्यांच्याच आदेशाने सुरू झाली होती. कराड सोसायटी गटातुन बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची जोरदार मोर्चेबांधणी केली.

त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपासुन फिल्डींग लावली होती. दरम्यान जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी अॅड. उदयसिंह पाटील यांनी कराड सोसायटी गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला.

उदयसिंह पाटील हे विलास काका उंडाळकरांचे चिरंजीव. याच काकांच्या पॅनेलच्या माध्यमातून उदयनराजेंनी २००९ साली बाळासाहेब पाटलांचा जिल्हा बँकेत पराभव केला होता.

आता याच बाळासाहेब पाटलांनी काल झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदयसिंह पाटलांना पराभूत केलं.

बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची मदत घ्यावी लागली. माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांची देखील बाळासाहेब पाटलांना मदत झाली.

सत्ता आणि उंडाळकर विरोधी गटांनी सहकार मंत्र्यांना साथ केल्याने बाळासाहेब पाटील यांना विजय मिळविता आला.

ही सर्व पार्श्वभूमी नमूद करण्याचे कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुढच्या दाराने ज्या बाळासाहेब पाटलांना राजकीय धुरीणांनी इंट्री दिली नव्हती. किंबहुना बहुमत हातात असताना त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माघार घ्यायला लावली तेच बाळासाहेब पाटील आज जिंकलेत.

आणि हाच आरंभ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.