भारताचे महान जादूगार ज्यांच्या जादूला लोकं लाईव्ह मर्डर समजून बसायचे

लहान असताना गावात जादूगार आला कि, लय भारी वाटायचं. एका रुमालातून वेगवेगळ्या रंगाच्या रुमालाची डायरेक्ट माळ काढणं, एकच तुरा पण हात फिरवला कि वेगवगेळे रंग बदलणं, त्या काळ्या पिशवीमधून नाही तर त्याच्या टोपीतून इतक्या गोष्टी बाहेर यायच्या कि, टाळ्या तर व्हायच्याच पण आपल्याकडे  सुद्धा तशी जादू का नाही म्हणून घरच्यांच्या समोर बोंबलत बसायचो.

पण एकदा ना आमच्या गावात सर्कस आलेली. त्यात बाकीचे खेळ तर होतोच, पण जादू सुद्धा होती. ते पोस्टर बघूनचं डोळे आणि तोंड मोठे झालेले.  म्हणून घरच्यांच्या मागं दोन दिवस रडगाणं लावून त्यांना कसतरी तयार केलं. सर्कसला गेलो बाकीचे खेळ तर भारी होतेच पण जेव्हा जादूची वेळ आली, तेव्हा डोळे चोळून खुर्चीवर थोडं पुढं सरकून बसले. काही गोष्टी त्याच त्याच होत्या, पण त्यादिवशी कधी नव्हे ते भलतंच पाहायला मिळालं.

म्हणजे जादूगाराने त्यांच्या सोबतच्या एका महिलेचे डायरेक्ट दोन तुकडेच केले. दोन मिनिट मला काय झालं हे कळालं नाही पण ते बघून मी जे रडायला लागले ते बघून घरचे सगळे मला घेऊन थेट सर्कसच्या बाहेर. पण नंतर हळू हळू जसं मोठं झाले तसं समजलं कि ही तर त्यांची ट्रिक असते. 

आता मी तेव्हा लहान होते म्हणून, पण भिडू तुम्हाला माहितेय आपल्या भारतातल्या एक जादूगाराची जादू बघून ब्रिटिश मंडळी सुद्धा घाबरायचे. त्यांची ती जादू म्हणजे लोक लाईव्ह मर्डर समजून बसले होते.

ते प्रसिद्ध जादूगार म्हणजे पी.सी. सोरकार. ज्यांनी देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमावलं. ते अशी काही जादूच्या ट्रिक वापरायचे कि, बघणारा तेच बघायचा जे ते दाखवायचे.

पी.सी.सोरकार हे बंगालचे रहिवासी होते. २३ फेब्रुवारी १९१३ ला साली त्यांचा जन्म राज्यातील टांगेल जिल्ह्यातील अशाेकपूर या छोट्याशा गावात झाला. प्रोतुल चंद सरकार हे त्यांचं खरं नाव, पण त्यांना पी.सी. सरकार म्हणूनचं प्रसिद्ध मिळाली. 

पहिल्यापासूनचं त्यांना जादूची आवड असल्यामुळं त्यांनी तेच करायला सुरुवात केली. आधी त्यांनी क्लब, थिएटर आणि सर्कसमध्ये आपले जादूचे खेळ दाखवायला सुरुवात केली. काही वेळातच त्यांच्या जादूचे चर्चे सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांना शोज करण्यासाठी बोलावणं यायचं. 

आता असं म्हणतात, चर्चा वाढायला लागल्यामुळं त्यांनी स्वतःला ‘जगातला सगळ्यात महान जादूगार’ अशी पदवी देऊन टाकली. खरं काय ते कोणाला माहित नाही, पण त्यांचा हा तुक्का कामाला आला. देशभरातून त्यांना मागणी तर होतीच, पण आता परदेशात सुद्धा त्यांना बोलावणं यायला लागलं. आपला जादूचा शो सगळ्या जगन बघावा अशी त्यांची इच्छा होती.  

 असाचं ब्रिटनमध्ये पॅनोरमा नावाचा चालू घडामोडींचा एक कार्यक्रम यायचा. जो बीबीसीवर लागायचा. या कार्यक्रमात एकदा पी.सी सोरकारचा शो  दाखवण्यात आला,  जो ब्रिटनच्या लोकांनी सुद्धा पाहिला.  पण त्यांना या शोमध्ये मोठी चूक असल्याचं वाटलं.

या शोमध्ये पीसी सरकार याने १७ वर्षांच्या मुलीला वश करून तिला टेबलावर बसवलं. आणि बघता बघता पीसी सरकारने मुलीच्या शरीराचे दोन भाग केले. ब्रिटनच्या लोकांना तो लाइव्ह मर्डरचं वाटला. सगळेचं जण हैराण होते.

सोरकारने मुलीचे हात घासायला सुरुवात केली, पण मुलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर मुलीवर काळा कपडा टाकण्यात आला. त्याचवेळी कार्यक्रमाच्या मधे येऊन कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणाले की, आता कार्यक्रम संपतोय.

अर्थातचं लोकं घाबरलेली, यानंतर स्टुडिओत फोनवर फोन यायला सुरुवात झाली. फोन करणार्‍यांना खात्री होती की, त्यांनी टीव्हीवर लाईव्ह मर्डर पाहिलाय. सगळाचं नुसता गोंधळ उडाला. 

पण, तसं काहीचं नव्हतं. शो अचानक संपवल्याबद्दल चॅनेलला  स्पष्टीकरण द्यावे लागले की, वेळ मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांचा शो मध्येच थांबवावा लागला. पण या शोनंतर पी. सी. सोरकार प्रसिद्धीच्या झोतात आला. त्या शोला त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात.

पण पी. सी सोरकरची जादूची कारकीर्दही तितकीशी सोपी नव्हती. त्यांना अनेक वादातूनही जावे लागले. पहिलं म्हणजे त्यांनी स्वतःला जगातील सर्वात महान जादूगार असल्याचं म्हंटलं होत. याकडे अनेकजण फसवणूक म्हणून पाहायचे. त्याच वेळी, अनेकांना त्यांच्या जादूबद्दल शंका सुद्धा होती.

पण एका अहवालानुसार, हिटलरच्या आवडता हेल्मट इवाल्ड स्क्रीवर नावाच्या जर्मन जादूगाराने सोरकारवर त्याच्या ट्रिक चोरल्याचा आरोप केला होता. मात्र, त्याचे आरोप त्याच्यावरच भारी पडले. अनेक जादूगार सोरकारच्या बाजूने उभे राहिले.

पी. सी. सोरकारला शो साठी खूप प्रवास करावा लागायला. एक वेळ अशी आली की डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला. पण, सरकारने त्यांचे ऐकले नाही आणि ते जपानला रवाना झाले. ६ जानेवारी १९७० रोजी सरकारने जपानमधील शिबेत्सु शहरात इंद्रजाल शो आयोजित केला होता. पण, बाहेर येताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. जगावर आपली जादू चालवणारे पी.सी.सोरकार यांनी जादूचा शो करूनचं जगाचा निरोप घेतला. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.