कधी जावई, कधी सासू तर कधी मुलीमुळे महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली

रोजच्या ईडीच्या कारवाया आता मुख्यमंत्र्यांच्या अगदी घराजवळ येऊन ठेपल्यात. त्याचे निमित्त ठरलेत  मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे….मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्याचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद त्यांच्या मेव्हण्यांमुळे जाते कि काय अशी चर्चा सुरू झाली आहे….आता अजून तरी मुख्यमंत्र्यांवर हि वेळ आली नसली तरी त्याला कुठं तरी जबाबदार त्यांचे मेव्हणे आहेत. 

पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हे काय पहिल्यांदा घडत नाहीये…आपल्या कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची परंपराच जणू महाराष्ट्राला मिळालीये. 

या चर्चेला आधार म्हणजे महाराष्ट्रातले आत्तापर्यंतचे असे ४ मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांना निकटवर्तियांमुळे मुख्यमंत्री पदाचे राजीनामे द्यावे लागले होते. एका मुख्यमंत्र्यांचं पद जावयामुळे गेलं तर दुसऱ्या एका मुख्यमंत्र्यांचं पद सासूमुळे गेलं तर कुणाचं मुलामुळे, मुलीमुळे गेलं.

यात पहिला नंबर लागतो ते म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचा. 

१९८६ मधली गोष्ट आहे. शिवाजीराव निलंगेकर यांच्या मुलीला मिडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवण्यासाठी तिच्या मार्कशीटमधील मार्क्स वाढवण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तत्कालीन विरोधी पक्षात असलेले शरद पवार यात आघाडीवर होते. राज्यभर हे प्रकरण गाजले. मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. 

या आरोपांमुळे व्यथित झालेल्या, अपमानित झालेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

मुलीच्या मार्कशीट मधील मार्क्स वाढवल्याप्रकरणी राजीनामा द्यावे लागणारे निलंगेकर हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. संपूर्ण देशभरातून निलंगेकर यांच्यावर टीका झाली. खिल्ली उडवण्यात आली.  या राजीनाम्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर राजकारणातून काहीसे बाजूला पडले होते.

दुसरा नंबर लागला तो मनोहर जोशी यांचा. 

मनोहर जोशी यांना त्यांच्या जावयामुळे राजीनामा द्यावा लागला होता.  राजीनाम्याचं साल होतं १९९९. त्याआधी १९९५ मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपदाची माळ अनुभवी मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली. 

युतीतल्या आणि सेनेतेल्या अंतर्गत कुरबुरी सोडल्या तर जोशींचा कार्यकाळ तसा सुरळीत सुरू होता. मात्र त्यांच्याभोवती संशयाचे ढग जमू लागले आणि त्यामागचं कारण होते त्यांचे जावई, गिरीश व्यास.

मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पुण्यातल्या प्रभात रोडवर असलेला ३० हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आपल्या जावयाला दिला. विशेष म्हणजे या प्लॉटवर शाळेचं आरक्षण होतं, असं असूनही ते आरक्षण हटवून तिथं अकरा मजली इमारत बांधण्यात आली. 

हे प्रकरण चांगलंच गाजलं, पुण्यातल्या भूखंड प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

कोर्टानं निर्णय दिला कि, ‘मनोहर जोशींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पालिका शाळेसाठी असलेलं आरक्षण बदललं आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं, असं देखील कोर्टाने म्हंटलं होतं….त्यातच मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या काही निर्णयांना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. 

अशातच तडकाफडकी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं. 

त्यानंतर तिसरे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. 

ज्यांना आपल्या मुलामुळे राजीनामा द्यावा लागला होता. हि २००८ ची घटना आहे. मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यात हॉटेल ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले होते. या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आपल्या मुलाला म्हणजेच अभिनेते रितेश देशमुखला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी करायला गेले होते. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत फेमस डायरेक्टर राम गोपाल वर्मा हे ही होते. 

रामगोपाल वर्मा यांना २६/११ हल्ल्याच्या घटनेवर पिक्चर काढायचा होता. म्हणून ते सीएम सोबत त्या घटनास्थळी गेले. ही घटना उघड झाली. “परिस्थिती काय आणि तुम्ही करताय” काय असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका झाली. शेवटी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

 आता चौथे मुख्यमंत्री म्हणजे, अशोक चव्हाण. 

अशोक चव्हाण यांना त्यांच्या सासूमुळे राजीनामा द्यावा लागला असं म्हणतात. २०१० ची गोष्ट आहे. दरम्यान आदर्श घोटाळा उघडकीस आला होता. 

थोडक्यात हा घोटाळा असा होता कि, मुंबईत कोलाबा इथला एक भूखंड कारगील युद्धातील शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या कल्याणकारी कामासाठी राखीव ठेवलेला होता. पण तो भूखंड आदर्श नावाच्या एका गृहनिर्माण सहकारी संस्थेला देण्यात आला आणि याच आदर्श नावाच्या इमारतीत अशोक चव्हाण यांनी सासूच्या नावाने फ्लॅट घेतला होता. 

पण या आदर्श घोटाळ्याची माहीती २०१० मधे उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठलं. त्यामध्ये शेवटी अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री बनले होते. 

आता हे सगळं पाहता, कुटुंबियांमुळे मुख्यमंत्रीपद जाण्याची महाराष्ट्रात जी परंपरा आहे त्यात आता उध्दव ठाकरे यांचे काय होणार? उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मेव्हण्यामुळे राजीनामा द्यावा लागणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.