MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकास आघाडीचा घटक होऊ शकते का ?

“भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. एकदाचं हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? 

अशी युतीची थेट ऑफर औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडी सरकारला दिली आहे. युतीचा हा मेसेज शरद पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. मग काय युतीच्या या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करतांना असं वक्तव्य केलं कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी शिवसेनेने आता जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं दिसतय, म्हणून ते MIM सोबत आघाडी करतायत”

तितक्यात MIM च्या युतीच्या ऑफरनंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.  “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही

थोडक्यात शिवसेनेने तर स्पष्ट हि ऑफर नाकारली पण MIM ला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं उत्तर राजेश टोपे यांनी दिलं. 

एकंदर महाविकास आघाडीत MIMला घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, राष्ट्रवादीचा सॉफ्ट कॉर्नर असल्याचंही बोललं जात आहे.

आता या सगळ्या राजकीय चर्चा आणि विधानं बाजूला ठेवलीत तर MIM हा पक्ष कसा जन्मला , इतिहास काय हे बघायला लागेल,

एमआयएमची सुरवात हैद्राबादच्या निझामाच्या छत्रेछायेखाली वाढणारी संघटना म्हणून झाली. पुढे या संघटनेत कासीम रिझवी आला, त्यानेच वातावरण विखारी बनवलं. दंगली घडवून आणल्या, रझाकांरांच्याबरोबर हि संघटनादेखील बदनाम झाली. नंतर  हैदराबाद संस्थान जेव्हा विलीन झाले तेव्हा कासीम रिझवी पाकिस्तानला पळून गेला, जाताना तो हि संघटना लातूर जिल्ह्यातील औसा गावच्या अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे सोपवून गेला. 

अब्दुल वाहिद ओवेसी म्हणजे असदुद्दिन ओवेसी यांचे आजोबा. औवेसी यांचं मुळ गाव लातूरजवळच औसा.  तर मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन या नावाला पुढं ऑल इंडिया लागलं. अन त्याचा शॉटफॉर्म A.I.M.I.M पण लोकांसाठी उल्लेख करताना आजही ती नुसती MIM आहे.

आता हा सगळा इतिहास पाहता, MIM महाविकासआघाडीचा घटक का होऊ शकते आणि का होऊ शकत नाहीत यांची ३-३  कारणे असणारेत.

त्यातलं पहिलं म्हणजे, MIM ची आत्तापर्यंतची कामगिरी. 

थोडक्यात या पक्षाचं व्होट शेअरिंग. पाच राज्यात झालेल्या निवडणूकांमध्ये जरी MIM ला मोठ्य प्रमाणात यश मिळालं नसलं तरी समाजवादी पक्षाकडे असेलेली मुस्लिम आणि दलित मत वळवण्यात आलेल यश पाहता MIM मत खाऊ शकत हे सगळ्यांना कळालय.

महाराष्ट्रात देखील MIM ने राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांचे मतं वळवली असं म्हणता येईल. २०१४ च्या  इंडियन एक्सप्रेसच्या एका आकडेवारीनुसार, २००९ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुस्लीम उमेदवारांना मुस्लीम समाजाची ७०% मतं होती. तेच २०१४ मध्ये मतांची टक्केवारी ५० टक्यांवर घसरली. या २०१९ च्या विधानसभेत MIM ने २ जागा जिंकल्या पण MIM ने खाल्लेल्या मतांमुळे किमान नऊ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलेल, त्यामुळे एमआयमचा या दोन पक्षांना उपयोग होईल.

आता दुसरं कारण म्हणजे, अलीकडेच शरद पवार यांनी, “घाबरू नका, काहीही करून मी राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही” असं आश्वासक विधान केलेलं. 

ज्याप्रमाणे त्यांनी  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला तसाच प्रयोग ते MIM ला सोबत घेऊन करणार का हे पाहाव लागेल. आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबवला त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं या आवाहनावर  राजकारणातले चाणक्य समजले जाणारे पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

तिसरं कारण होऊ शकते ते म्हणजे, पारंपरिक मुस्लिम किंव्हा दलित मतदार.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दुरावलेला पारंपरिक मुस्लिम किंव्हा दलित मतदार. काँग्रेसचा पूर्वीपासूनच पारंपरिक मतदार हा दलित आणि मुस्लिम समाज राहिलेला आहे. पण महाविकास आघाडीची स्थापना झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा हे मतदार डिव्हाइड झाले आणि बऱ्यापैकी ते MIM आणि वंचित कडे वळाले. त्यांना पुन्हा खेचून आणायचं असेल तर आघाडीला MIM ला बरोबर घ्यायला लागेल. त्यामुळे युतीचा प्रस्ताव आघाडी स्वीकारु शकते.

आता याची दुसरी बाजू.. ते म्हणजे एमआयएमचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही तर त्यामागची हि ३ कारणे असणारेत.

त्यातील पहिलं म्हणजे, शिवसेना आणि MIM या पक्षांची कट्टर धार्मिकता. 

दोन्हीही पक्ष आपआपल्या धार्मिक कट्टरतेसाठी ओळखले जातात व ही विचारसरणी सुरवातीपासूनच एकमेकांसाठी विरोधाची राहिली आहे, अशा वेळी विचारसरणीच्या पातळीवर दोन्ही पक्षांना स्थानिक पातळ्यांवर आघाडी करणं अशक्य असल्याचं बोललं जातय.

दुसरं कारण म्हणजे जर राष्ट्रवादीला किंव्हा काँग्रेरवर सततची होणारी मुस्लिम धार्जीणे अशी टीका. हे दोन्ही पक्ष मुस्लीम संतुष्टीकरणाचे राजकारण करतात अशी टिका विरोधी करत असतात. MIM चा प्रस्ताव स्वीकारून या टिकेत भरच पडणार असल्याचे हे पक्ष MIM पासून सुरक्षित अंतर ठेवूनच राहतील, अस दिसतं.

तिसरं म्हणजे, MIM वर ‘भाजपची बी टीम’ म्हणून होणारी टिका. 

MIM वर भाजपची बी टीम अशी टिका भाजपविरोधी गटातून नेहमीच होतं असल्याने MIM च्या युतीचा प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकत नाही. आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये MIM बद्दल विश्वास निर्माण होणार नाही. त्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली कि, “MIM भाजपची ‘बी’ टीम नाही, हे आधी सिद्ध करावे. त्यांच्या भडकाऊ विधानांवर आणि भाषणांवर ताबा मिळवायला हवा त्यानंतरच पुढचा विचार केला जाईल. थोडक्यात धार्मिक तेढ निर्मण करणारा पक्ष तसेच भाजप पूरक भूमिका घेत आलेल्या पक्षाला आम्ही सोबत घेऊ शकत नाही असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतलेला आहे.

याबाबत बोल भिडून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया घेतली, 

“MIM हि कुणाची बी टीम आहे हे सर्वाना माहितीये, त्यामुळे MIM वर किती विश्वास ठेवायचा यावर प्रश्नचिन्ह आहे. लोकशाही मध्ये कोणताही पक्ष इतर कोणत्या पक्षासोबत जाण्याची इच्छा बोलून दाखवू शकतो पण MIM चा आजवरचा प्रवास पाहता राष्ट्रवादीने MIM सोबत युती करू नये असं माझं वैयक्तित मत आहे. तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्टी घेतील. असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं.

आता या सर्व राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकासआघाडीचा घटक होऊ शकते का ? खरंच राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळणार  का ? येत्या काळातच कळेल.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.