राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेना कायम धक्कातंत्र वापरते, मात्र त्यातून साध्य काय करते ?
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे.
याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
“एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे”, अशी भावना खासदारांनी व्यक्त केली आणि याच भावनेचा सन्मान करत शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाचं बंड, उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि शिवसेनेत पडलेली फूट या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाजपच्या उमेदवाराच्या मागे उभा राहतील असे संकेत मिळत होते आणि तसंच झालं.
पण हे पहिल्यांदा घडतय ? का तर नाही.
शिवसेना जेव्हा NDA चा घटकपक्ष होती तेव्हा शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी UPA च्या उमेदवाराला पाठींबा दिला होता, अन् आत्ता जेव्हा शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे तेव्हा शिवसेना NDA च्या उमेदवाराला पाठींबा देत आहे.
सेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत नेहमीच धक्कातंत्राचा वापर कसा केला आहे? राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकांमधून कोणत्या गोष्टी साध्य केल्या आहेत..?
पहिलं उदाहरण म्हणजे प्रतिभाताई पाटील.
२००७ मधील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित UPA कडून प्रतिभा पाटील या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या. तर भैरोसिंह शेखावत या निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते, परंतु त्यांना एनडीएचा पाठिंबा होता. सेनेने शेखावत यांनाच पाठींबा द्यावा याबाबत NDA आग्रही होती.
भाजपचे उमेदवार भैरोसिंह शेखावत यांना पाठिंबा द्यायचा की महाराष्ट्रीयन मराठी उमेदवार प्रतिभाताई पाटीलांना पाठिंबा द्यायचा असा प्रश्न सेनेसमोर निर्माण झाला होता.
शेखावत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते, कारण भाजप उमेदवार म्हणून त्यांना इतर पक्षांची मते मिळतील कि नाही नाही याची भाजपाला साशंकता होती. “पण आम्ही अशा प्रकारच्या सौदेबाजीशी सहमत नाही”, असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं.
शेवटी शिवसेनेनं प्रतिभा पाटील यांना पाठिंबा जाहीर कल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
कारण शिवसेना त्यादरम्यान भाजपप्रणित NDA चा घटक होती. तसे एनडीएकडून बाळासाहेबांच्या मनधरणीसाठी बरेच प्रयत्नही झालेले.
पण तरीही बाळासाहेबांनी “प्रतिभा पाटील या राष्ट्रपती होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे”, असं म्हणत पाठिंबा जाहिर केला आणि मराठी बाणा तर जपलाच सोबतच नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले होते.
युतीत असतानाही शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यामुळे दोन दशकापासून असलेली भाजप-सेना युती संकटात आली होती तरीही बाळासाहेबांनी मराठी अस्मिता आणि मराठी बाणा जपला होता.
त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठी व्यक्ती राष्ट्रपती झालेली नाही..प्रतिभाताई या देशाच्या पहिल्या महाराष्ट्रीयन आणि एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मराठी स्त्रीला मिळतोय, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे” असं मत त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेलं.
तर दुसरं उदाहरण म्हणजे प्रणव मुखर्जी.
२०१२ मधील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी NDA ला धक्का देत प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेला..आणि हे समीकरण कुणी जुळवून आणलं होतं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खुद्द प्रणव मुखर्जीं यांनी.
UPA ने प्रणव मुखर्जी यांचे नाव घोषित केलं. प्रणव मुखर्जी यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात कुणाला उतरावायचं हा प्रश्न NDA समोर होता. त्यांच्यासमोर २ ऑप्शन होते एक माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम आणि दुसरे माजी लोकसभाध्यक्ष पी. ए. संगमा. हे तेच पी. ए. संगमा ज्यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तर संगमा यांचं नाव फायनल झालं.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. दोन्ही बाजूंकडून शक्ति- प्रदर्शन वगैरे करण्याचा जोरदार प्रकार घडला होता. मुळात दोन्हींकडून एकाही उमेदवाराकडे स्वबळावर निवडून येण्याची क्षमता नव्हती. या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं निर्णायक ठरणार होती.
मतांची जुळवाजुळव सुरु असतानाच बाळासाहेबांचं मन वळविण्याची जबाबदारी शरद पवारांवर आली.
शरद पवार थेट प्रणव मुखर्जींना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले.
आणि बाळासाहेब ठाकरेंनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. बाळासाहेब ठाकरे हे प्रणव मुखर्जी यांना प्रेमाने प्रणवबाबू म्हणत असत. बाळासाहेबांनी यावेळेस दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती. ती अशी कि,
“राष्ट्रपती पदासाठी चाललेला खेळखंडोबा हा देशाच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. केवळ राजकीय स्वर्थासाठी देशाची प्रतिमा चव्हाट्यावर मांडणे योग्य नव्हे. आजकाल ज्यांच्या आडात काहीच नाही तेही आपले पोहरे टाकून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहतात”, असा टोलाही बाळासाहेब ठाकरे यांनी पी. ए. संगमा यांना लगावत त्यांनी प्रणवबाबू यांना पाठिंबा जाहीर केलेला.
मात्र पाठिंबा देत बाळासाहेब हेही सांगायला विसरले नाहीत की,
“आमच्या पाठिंब्याची लक्ष्मणरेषा प्रणवबाबू यांच्या पाठिंब्यापुरतीच असल्याने त्या वरातीत सामील झालेले उंट, घोडे, बत्तीवाले यांना त्यांचे राजकारण लखलाभ ठरो. प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत जाणीवपूर्वक दूरच ठेवले गेले; कारण हायकमांडच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करणार्यांपैकी हा गडी नाही. कॉंग्रेसने दुसरा ऐरा-गैरा उभा केला असता तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच त्याने गटांगळ्या खाल्ल्या असत्या असे मतांचे गणित आहे असं परखड मत बाळासाहेबांनी तेंव्हा व्यक्त केलेलं.
आत्ता देखील द्रोपदी मुर्मूंना पाठींबा जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील व प्रणब मुखर्जींचा संदर्भ देवून आदिवासी समाजातून आलेल्या महिला असल्याचे कारण देत अधिकृतपणे पाठींबा जाहीर केला आहे.
आत्ता जाता जाता हे बघूया की, या पाठींब्यातून उद्धव ठाकरे कोणत्या गोष्टी साध्य करत आहेत ?
- एकतर आपण आपल्या पक्षात लोकभावनेचा, खासदारांच्या, आमदारांच्या मतांचा आदर करतो हे दाखवून देतील.
- दूसरी गोष्ट म्हणजे भाजपसोबत ताणलेले संबंध कुठेतरी निवळण्याचा व भाजप सेना युती पुन्हा होवू शकते याचे संकेत देण्याचा प्रयत्न करतील.
- तिसरी गोष्ट म्हणजे आपण राष्ट्रवादी पर्यायाने शरद पवार, कॉंग्रेस यां पक्षांच ऐकत नसून शिवसेना पक्ष म्हणून स्वतंत्र निर्णय घेत आहोत, महाविकास आघाडीचा घटक असलो तरी पुरेसं अंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत ठेवून आहोत हे दाखवून देतील.
पण या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रणब मुखर्जी आणि प्रतिभाताईंना कशा प्रकारे पाठींबा दिला होता याचा संदर्भ दिला गेला जो बाळासाहेबांचा निर्णय होता.
हे ही वाच भिडू :
- चिं. वि. जोशींनी पानशेतच्या पुराबद्दल जे लिहून ठेवलय तसं लिहणं कोणालाच जमणार नाही
- बाकी सगळं विसरलं तरी, संकटातल्या श्रीलंकन लोकांच्या आठवणीत हे दोन जयसूर्या कायम राहतील
- लव्ह इन टोकियोच्या शूटिंगवेळी जॉय मुखर्जीला आपल्या ताकदीवरचा आत्मविश्वास नडला होता…