बाकी सगळं विसरलं तरी, संकटातल्या श्रीलंकन लोकांच्या आठवणीत हे दोन जयसूर्या कायम राहतील

श्रीलंका हे नाव घेतल्यावर आपल्याला सगळ्यात आधी तिकडं सुरू असलेला राडा आठवेल. तिकडचे आंदोलक थेट राष्ट्रपतींच्या घरात घुसले, राष्ट्रपती पळून बाहेरच्या देशात गेले, राष्ट्रपतींचा भाऊ पळून जायला लागला तर लोकांनी त्याला एअरपोर्टवर अडवलं.

श्रीलंकेतली लोकं राष्ट्रपतींच्या घरातल्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय मारतायत, टीव्ही बघतायत. पण हे सगळं त्यांना करावं लागतंय, कारण लंकेतल्या लोकांचे खायचे वांदे आहेत, पेट्रोल नाही की जीवनावश्यक वस्तू नाहीत.

बरं हे सगळं काय आज सुरू झालेलं नाही, तर गेले कित्येक महिने श्रीलंका याच सगळ्याचा सामना करतंय. कदाचित आज ना उद्या बदल घडतील, कदाचित श्रीलंका पुन्हा रुळावर येईल. त्यांच्या आत्ताच्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना या दिवसांबाबत सांगतील.

हे सगळं सांगताना दोन लोकांची नावं मात्र नक्की निघतील,
ती म्हणजे सनथ जयसूर्या आणि प्रबथ जयसूर्या. 

दोघंही क्रिकेटर्स, एक माजी आणि दुसरा आजी. या दोघांनी काय आपल्या तिजोरीची दारं जनतेसाठी उघडली नाहीत किंवा काही हिंसकही केलं नाही. मग या दोघांनी नेमकं काय केलं..?

पहिला येतो सनथ जयसूर्या…

एक काळ होता, जेव्हा जयसूर्या बॅटिंग करतोय हे नुसतं ऐकलं तरी टेन्शन यायचं. ओपनिंगला येऊन पहिल्या १५-२० ओव्हर्समध्ये तोडफोड करायची आणि तेवढ्यातच मॅचचा निकाल लावून टाकायचा ही जयसूर्याची खासियत होती. जयसूर्याला क्रिझवर बघून भारतातल्या लोकांना एकदाच आनंद झाला असेल, तो मुंबई इंडियन्सकडून खेळला तेव्हा.

फक्त बॅटिंगमधला राक्षस म्हणूनच नाही, तर बॉलिंगमध्येही कर्दनकाळ म्हणून जयसूर्या फेमस होता. आधीच चामिंडा वास, मुरलीधरन यांच्या तावडीतून सुटणं कठीण असायचं, तिथं जयसूर्या मानगुटीवर येऊन बसायचा. बाकीच्या टीम्सला गडी हाणायचाच, पण विशेष लोभ होता तो सक्खे शेजारी भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर.

निवृत्तीनंतर जयसूर्या राजकारणात काहीतरी मोठं करेल अशा चर्चा होत्या, त्यात त्याचं स्कँडल गाजलं आणि या चर्चाही मागं पडल्या. मात्र जेव्हा श्रीलंकेतल्या लोकांनी देशातल्या परिस्थिती विरोधात आंदोलन करायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या साथीनं रस्त्यावर उतरण्यात जयसूर्याचं नाव आघाडीवर होतं. त्यानं सरकारच्या कामकाजाविरोधात आवाज उठवला, लोकांना जमेल तशी आर्थिक आणि अन्नसामुग्रीची मदत केली.

आंदोलनाला नवं वळण लागलं आणि लोकांनी सरकारी इमारतींवर कब्जा करायला सुरुवात केली. काही लोकं राष्ट्रपतींच्या घरात तर घुसलेच, पण दुसऱ्या बाजूला काही लोक श्रीलंकेच्या गॅले क्रिकेट स्टेडियममध्ये घुसले. 

आता लंकन क्रिकेटसाठी गॅलेचं महत्त्व सांगायचं झालं, तर त्यांचं वानखेडे किंवा ईडन गार्डन्स. लोक आंदोलनासाठी स्टेडियममध्ये घुसली, तेव्हा तिथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका मॅच सुरू होती. 

सगळं जग मैदानावरची आणि मैदानाबाहेरची कसोटी बघत होतं. यावेळी जयसूर्या या स्टेडियमला घेराव घालणाऱ्या आंदोलकांमध्ये होता. ज्या क्रिकेटच्या मैदानानं त्याला ओळख दिली होती, त्याच क्रिकेटच्या मैदानाची पार्श्वभूमी घेऊन त्यानं आपल्या लोकांसाठी आवाज बुलंद केला. सत्ताधाऱ्यांवर टीका करायलाही त्यानं पुढं मागं पाहिलं नाही.

अनेक क्रिकेटर्स आपलं करिअर पार पडल्यानंतर कुठलाही वाद टाळायला बघतात, आंदोलनं किंवा राड्यात सहभागी होत नाहीत. 

पण ज्या लोकांच्या पाठिंब्यावर जयसूर्या ‘मोठा’ क्रिकेटर झाला आज त्यांचीच साथ द्यायला तो विसरला नाही, हे विशेष.

दुसरा आहे प्रबथ जयसूर्या

हा श्रीलंकेचा मैदानावरचा हिरो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये पहिली टेस्ट श्रीलंकेनं डावानं हरली. दुसऱ्या टेस्टमध्येही परिस्थिती वेगळी वाटत नव्हती. कारण स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेननं खणखणीत शतकं लावली होती. थोडक्यात गणित अवघड होतं.

पण यापेक्षा जास्त अवघड गणित श्रीलंकेचा कॅप्टन दिमुथ करुणारत्ने समोर दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी टीम निवडताना होतं. टीममधले दोन स्पिनर्स कोविडमुळं बाहेर होते, तिसरा स्पिनर फॉर्ममुळं. त्यामुळं मॅचला काही दिवस बाकी असतानाच मॅनेजमेंटनं प्रबथ जयसूर्याला बोलाऊन घेतलं. 

प्रबथ जयसूर्याचं सध्याचं वय आहे ३० वर्ष. या मॅचच्या आधी त्यानं एकही टेस्ट मॅच खेळली नव्हती, वनडे क्रिकेटचं म्हणाल तर २०१८ मध्ये पदार्पण करुन फक्त दोन मॅचमध्येच संधी मिळाली होती. आयपीएल वैगेरेमध्येही त्याचं नाव चर्चेत नव्हतं. 

फक्त डोमेस्टिक क्रिकेटमधला अनुभव आणि कोचेसनं दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर जयसूर्या टीममध्ये आला. श्रीलंकन क्रिकेटमधले स्पिनर्स आठवायचे म्हणलं की, मुथय्या मुरलीधरन, रंगना हेरथ, अजंथा मेंडिस (सेहवागचा मार खाईपर्यंत) हे तिघं आठवतात. मात्र त्यांच्यानंतर समोरच्या टीमवर दहशत बसावी असं कुणाचं नाव गाजलं नाही. त्यामुळं जयसूर्याला उशिरा मिळाली असली, तरी ही संधी महत्त्वाची होती.

पहिल्या इनिंगमध्ये त्यानं सहा विकेट्स काढल्या, त्यातली लाबुशेनची विकेट त्याची सेंच्युरी पूर्ण झाल्यावरची होती. बाकीच्या विकेट्स मिडल ऑर्डर आणि शेपटीतल्या होत्या. श्रीलंकेच्या बॅटिंगचा डोलारा दिनेश चंडिमलच्या डबल सेंच्युरीमुळं स्ट्रॉंग राहिला. 

ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या इनिंगमध्ये मोठं लीड पार करायचं होतं. साहजिकच मॅच ड्रॉ होणार असा अनेकांचा अंदाज होता.

उस्मान ख्वाजाची विकेट काढत जयसूर्यानं ऑस्ट्रेलियन डावाला गळती लावली. पण हायलाईट्स होत्या त्या लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथची विकेट. पहिल्या इनिंगमध्ये शतक मारलेले आणि जगातले बाप बॅट्समन म्हणून ओळखले जाणारे हे दोघंही जयसूर्यानं अलगद आपल्या जाळ्यात ओढले.

लाबुशेन ३२ वर आऊट झाला, तर स्मिथ आपल्या चौथ्याच बॉलवर शून्य रन्सवर. समोरच्या बाजूनं जयसूर्याला चांगली साथ मिळत गेली आणि त्यानं याही इनिंग्समध्ये सहा विकेट्स काढल्या. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन मिडलऑर्डर त्याच्या नावापुढं जमा झाली.

या मॅचमधल्या त्याच्या फिगर्स आहेत, १२/१७७.

आपल्या करिअरमधली पहिली टेस्ट मॅच. जिच्या मूळ टीममध्ये आपला समावेशही नव्हता. देशात सुरू असलेलं आंदोलन, जे मॅचवेळी स्टेडियममध्ये आलं. तरीही जयसूर्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही. सहा फूट उंचीचा फायदा घेऊन त्यानं स्पिनच्या अपेक्षेनं खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅट्समनना आपल्या सरळ बॉलच्या तालावर नाचवलं आणि बघता त्यांच्या दोन्ही इनिंग्सचा बाजार उठवला. 

श्रीलंकेनं ही मॅच एक इनिंग आणि ३९ रन्स बाकी ठेऊन जिंकली.

लोकांच्या रोजच्या जीवनाचा प्रश्न असताना, क्रिकेटकडे लक्ष जाणं कठीण असतं. पण श्रीलंकेतल्या लोकांनी जगाचं लक्ष वेधून घ्यायला क्रिकेटचीच वाट निवडली. स्वतःचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्याची पूर्ण संधी असतानाही सनथ जयसूर्या लोकांच्या साथीनं मैदानाबाहेर लढत राहिला आणि प्रबथ जयसूर्या लोकांच्या आनंदासाठी मैदानाच्या आत. 

क्रिकेट आणि क्रिकेटर्सनं श्रीलंकन लोकांना जिंकवत ठेवलंय, तेही पुन्हा एकदा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.