दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारा मराठवाड्यातील ‘ उजनीचा ‘ हा गोड पदार्थ
उजनी, लातूर – उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरती तेरणा नदी काठी वसलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ या रत्नागिरी – नागपूर मार्गावरील औसा तालुक्यातील सांप्रदायिक गाव म्हणून ओळखले जाणारे उजनी हे गाव. या गावची ओळख तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक अशी आहे. ग्रामदैवत शिवकालीन श्री संत गणेशनाथ महाराज यांचा वारसा लाभलेला असल्यामुळे या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
या गावची लोकसंख्या १२ ते १५ हजार इतकी आहे.
मोठी बाजारपेठ, तसेच राजकीय, व्यावसायिक, सांप्रदायिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या समृद्ध असे हे गाव आणखी एका वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. ते म्हणजे येथील गावरान दुधापासून बनवला जाणारा गोड आणि चविष्ट अशी बासुंदी.
हा पदार्थ ‘ उजनीची सुप्रसिद्ध बासुंदी ‘ म्हणून सर्वदूर परिचित आहे. या बासुंदीची चव चाखण्यासाठी महामार्गावरील प्रत्येक प्रवाशी आवर्जून येथेे थांबा घेतो. या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळााच्या सर्व गाड्या १५ ते २० मिनिटे चहा- पाणी, नाष्ट्यासाठी हमखास येथे थांबतात.
या बासुंदीची प्रसिध्दी करण्यामध्ये या बसेसचा सिंहाचा वाटा असल्याचे येथील व्यावसायीक सांगतात. शासकीय बस असो की खाजगी वाहन, प्रत्येक प्रवासी आपल्या कुटुंबासोबत असेल किंवा एकटा येथील बासुंदीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही.
जाताना आपल्या कुटुंब किंवा मित्र परीवारासाठी पार्सल घेऊन जायला ही तो विसरत नाही. बासुंदी खाऊन झाल्यानंतरही हाताची बोटे चाखतच प्रवाशी आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करत असल्याचे अनेकवेळा दिसून येते.
जवळपास ८० वर्षापूर्वी गावातील जाधव, ढवण , बर्दापुरे, जोशी आदी मंडळीनी गावातच दुधापासून बासुंदी बनविण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला होता.
तद्नंतर येथील द्वारकादास जोशी यांनी सोलापूर- लातूर महामार्गावर हा व्यवसाय सुरू केला. आणि तिथून खऱ्या अर्थाने येथील बासुंदी व्यवसायाला गती मिळाली. ही बासुंदी बनवण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिक गाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून गाईचे व म्हशीचे गावरान दूध संकलन करू लागले. दररोज शेकडो लिटर दूध विक्रीतुन शेतकऱ्यांना देखील चार पैसे मिळायला सुरुवात झाली. आणि बघता बघता जसजसा बासुंदीच्या लोकप्रियतेचा गोडवा पसरत गेला तसतसा येथील बासुंदी व्यवसायाचे स्वरूप वाढू लागले.
हा व्यवसाय दोन ते तीन हॉटेल पासून भल्यामोठ्या ३० हॉटेल पर्यंत येऊन पोहचला. यामुळे गावातील शेकडो लोकांना रोजगार मिळाले. त्यासोबतच हळूहळू इतर व्यवसाय देखील सुरू झाले आणि एकप्रकारे येथील अर्थकारणाला चालना मिळाली. त्यामुळे रोजची येथील फक्त बासुंदीसाठी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंतची भलीमोठी उलाढाल होते.
उजनीतील बासुंदी सम्राट म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक दिनेश जोशी यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित महापर्यटन – पर्यटनातून रोजगाराच्या संधी या डी डी सह्याद्री वरील प्रसारित १३ भागांच्या विशेष मालिकेत महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि रोजगाराच्या संधी या विषयावरील परिचर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
तसेच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या महाफुड फेस्टिवल मध्ये मराठवाड्यातून एकमेव उजनीच्या बासुंदीचा समावेश होता. त्यावेळी असंख्य मुंबईकरांनी उजनीच्या या बासुंदीची चव चाखली.
यावेळी महोत्सवाचे उद्घाटक व तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बासुंदीची चव घेत विशेष कौतुक केले होते. त्यांच्यासोबत उपस्थित सेलिब्रिटीनीही बासुंदीचा आस्वाद घेतला होता. या माध्यमातून बासुंदीच्या चवीची लोकप्रियता एवढी वाढली की ती महाराष्ट्र पूरती मर्यादित न राहता राजधानी दिल्ली तसेच विदेशातील लंडन पर्यंत पोहोचली.
आजही महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून बासुंदीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. यासाठी येथील बासुंदी व्यवसायिक दिनेश समुद्रजोशी, नटराज समुद्रजोशी, रवी जोशी, सुभाष जाधव, सोमनाथ बरदापुरे, लिंबराज ढवण, नारायण ढोबळे, रामदास वळके, वाजिद शेख आदी व्यवसायिक पुढाकार घेतात.
या गावात येणाऱ्या नातेवाईकांना येथील बासुंदी खाऊ घालून विशिष्ट पद्धतीने खास पाहुणचार करण्याची रूढ आहे किंवा गावातील कोणी बाहेरगावी पाहुण्यांकडे जात असेल तर आवर्जून बासुंदी घेऊन जाण्याची येथे अनोखी परंपरा आहे. तसेच लग्न समारंभ, वाढदिवस, छोटेखानी कार्यक्रम आदींसाठी बासुंदीची मोठ्या प्रमाणावर ऑर्डर दिली जाते.
अशा या चविष्ट, चवदार व दर्जेदार बासुंदीची चव चाखण्यासाठी प्रत्येकानी एकदातरी उजनीला अवश्य भेट द्यावी.
अशी बनते स्वादिष्ट बासुंदी!
हॉटेल मधील कारागिरांकडून भट्टीवर लोखंडी कढई मध्ये दूध गोठवन्यात येते. यासाठी घेतलेल्या अखंड मेहनतीमुळेच ही बासुंदी एवढी चविष्ट होते यात काही शंका नाही. भट्टी वर जवळपास सहा तास उभे राहून दूध गोठवन्यासाठी त्यांना अक्षरश: घाम गाळावा लागतो. दूध गोठवून त्यात साखर मिसळून लालसर रंग येईपर्यंत एकसंधपणे मिश्रण हलविण्यासाठी अगदी बारकाईने त्याचे निरीक्षण केले जाते.
चव येण्यासाठी या मध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेवर मिसळले जात नाही. अगदी गावरान पद्धतीने गावरान दुधाची दर्जेदार बासुंदी तयार केली जात असल्याने ती अधिक प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. यावरून बासुंदी बनविण्याची प्रक्रिया किती कठीण असते याचा अंदाज येतो.
बासुंदीच्या गोडी प्रमाणे गावातील ग्रामस्थांमध्ये गोडवा
बासुंदीच्या गोडी प्रमाणेच गावातही लोकामध्ये गोडवा टिकुन असल्याचे पाहायला मिळते. गावात खेळी मेळीचे वातावरण असून येथील क्वचितच एखाद्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत जाते. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये पराभूत पॅनेलच्या उमेदवारांनी विजयी पॅनल मधील उमेदवारांचा सत्कार केला. या पद्धतीचे सकारात्मक वातावरण इतर कुठल्याही गावांमध्ये पाहायला मिळत नाही.
उजनीला कसे जायचे?
भारतातील शक्तीदेवताच्या पीठापैकी साडेतीन पिठे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या साडेतीन पिठापैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुर या एतिहासिक शहरापासून लातूर शहराच्या दिशेने अगदी २० किलोमीटर अंतरावर उजनी हे गाव तेरणा नदीच्या काठी वसलेले आहे. लातूरहून सोलापूरच्या दिशेने ४६ किलोमिटर अंतरावर हे गाव आहे. विदर्भात जाण्यासाठी तुळजापूरहून उजनी मार्गे हा सोयीस्कर मार्ग असल्याचे सांगितले जाते.
- शिवशंकर बोपचंडे
मो:- 9834484743 - विशेष सहकार्य :- केतन ढवण
हे ही वाच भिडू.
- गोरसपाक परदेशातूनही मागणी असणारं वर्ध्याचं बिस्कीट
- एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.
- कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!
- गरीबाला परवडणारा आणि श्रीमंताना आवडणारा निलंगा राईस