‘गोरसपाक’ : परदेशातूनही मागणी असणारं वर्ध्याचं बिस्कीट

वर्ध्याची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे इथलं सेवाग्राम आश्रम. गांधीजी अखेर पर्यंतचं निवासस्थान. १९३० मध्ये ‘मिठाचा सत्याग्रह’ करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींजीनी ‘दांडी यात्रा’ काढली होती.

स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता.

पुढे मिठाचा सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना येरवडमध्ये बंदी करण्यात आलं. १९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली.

तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये कधीच परतले नाहीत.

१९३४ मध्ये वर्ध्याचे जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी ते पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला.

गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले होते, जे आजही आपल्याला पाहायला मिळते.

या आश्रमात असताना गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक छोटेमोठे निर्णय घेतले. चळवळी सुरू केल्या.

इथेच त्यांना भेटायला जगभरातून  मोठमोठे व्यक्ती येत असत. फक्त राजकीयच नाही तर भारताची सामाजिक उन्नती व्हावी म्हणून गांधीजींनी अनेक प्रयोग सेवाग्राम मध्ये केले.

यातलाच एक महत्वाचा प्रयोग म्हणजे अखिल भारतीय गो सेवा संघ.

भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या गो वंशाचे संवर्धन व्हावे म्हणून गांधीजींनी आपले शिष्य विनोबा भावेंसह या संस्थेची स्थापना केली होती. १९३६ मध्ये या चळवळीला गांधीनी सुरूवात केल्यानंतर संपूर्ण जबाबदारी जमनालाल बजाज यांच्यावर सोपविली.

पुढे जेष्ठ गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी या संस्थेचे रूपांतर सहकारात करून सन १९६१ मध्ये वर्धा तहसील गो. दुध उत्पादक सह. संघ गोरस भंडार या संघाची स्थापना केली.

महात्माजींनी सुरू केलेली चळवळ वर्ध्याच्या गावागावात पोहचली.

इथल्या छोट्यामोठ्या गावातून हजारो लिटर दुध संकलित होऊ लागलं. गोसंवर्धन गोरस भंडार या संघाची स्थापना करून संघाचे पहिले अध्यक्ष अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना मान दिला.

गोरस भांडार ही संस्था दुध उत्पादन व विक्री सेवा ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे काम करू लागली. शहरात शुद्ध दुधाचा ताजा पुरवठा तर होत होताच पण शिवाय प्रचंड प्रमाणात गोळा होत असलेल दूध शिल्लक राहत होते.

मग शुद्ध ताज्या दुधापासून पेढा, बासुंदी, श्रीखंड, पनीर, ब्रेड आदी बनवण्याची कल्पना पुढे आली.

यातच त्यांचं एक प्रॉडक्ट् होत ते म्हणजे गोरसपाक!

गोरसपाक म्हणजे नानकटाई कुकीसारखा प्रकार. पण गायीच्या अस्सल दुधापासून बनलेला, तुपाने न्हाऊ घातलेला, काजू बदामाची लयलूट असलेला गोरसपाक म्हणजे स्वर्गसुख.

खास गांधीवादी संस्थेने बनवलेलं हे बिस्कीट असल्यामुळे त्याच्या शुद्धतेची व दर्जेदार पणाची खात्री होतीच. शिवाय चव देखील अफलातून होती.

काही दिवसातच गोरसपाक संपूर्ण वर्ध्यात फेमस झालं.

एवढंच नाही तर वर्ध्याला येणारा प्रत्येक पाहुणा गावी परत जाताना ही गोरसपाकची पाकिटं घरी नेऊ लागला. आता तर परदेशातूनही गोरसपाकला मागणी असते.

आज वर्ध्याला गोरसपाक मुळे नवी ओळख मिळाली आहे.

आजही एक हजार दुध उत्पादकांकडून दैनिक तब्बल १३ हजार लिटर दुध संकलित करण्यात येते. गोरस भांडार संघाला कोणतेही शासकीय अनुदान न मिळता संस्थेचे संपूर्ण कार्य स्वबळावर ‘ना नफा ना तोटा’ या पद्धतीवर चालविले जाते.

गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली.

पण गांधीजी व विनोबा यांनी ऐंशी वर्षांपूर्वी घालून दिलेला धडा गोरस भांडार आजही पाळला जातो म्हणूनच आजही तिथली स्वच्छता, दर्जा व शुद्धतेची खात्री पटते.

यापुढे कधी वर्ध्याला जाल तेव्हा सेवाग्राम आश्रम बरोबर गोरस भांडारला भेट देऊन गांधीवादी बिस्किटाची चव चाखायला विसरू नका.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.