‘ताज’ मध्ये गरिबी हटाव कार्यक्रम घेण्यात आला अन अध्यक्षांनी सगळ्यांनाच झापलं होतं

एका हुशार अभ्यासू तरुणाने कलकत्ता युनिव्हर्सिटीतून स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केल्यावर, लंडन युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्समध्येच पीएचडी करण्याचे ठरवले आणि लंडनला जाणाऱ्या आगबोटीत चढले…पण तिथे त्यांना वेगळंच चित्र दिसलं… बोटीत असलेल्या भारतीय तरुणांना बोटीच्या वाहतूक कंपनीकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचे पाहून, निषेध म्हणून तो तरुण बोटीतून खाली उतरला ते पुन्हा शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याच्या फंदात न पडण्यासाठीच !!

हा तरुण म्हणजे भारतातले एक ‘अग्रणी अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ’ म्हणून ओळखले जाणारे वि. म. दांडेकर. आकडेशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय.  ‘महाराष्ट्राची ग्रामीण रचना’, ‘गावरहाटी’, ‘गाईचे अर्थशास्त्र’ इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांचं पूर्ण नाव विनायक महादेव दांडेकर, त्यांचा जन्म ६ जुलै १९२० चा. तर ३० जुलै १९९५ रोजी त्यांचं निधन झालं. 

पठाणी पायजमा, नेहरू शर्ट नि जाकीट हा त्यांचा नेहमीचा वेष. सर्व कपडे नेहमीच खादीचे. काळी-पांढरी दाढी व डोक्यावरील थोडेसे अस्ताव्यस्त केस. दांडेकर हे स्वतः गांधीवादी नसूनही त्यांनी आयुष्यभर खादी वापरणे पसंत केले हे विशेष!!

प्रा. दांडेकर हे एक अत्यंत निर्भीड, व्यावहारिक भूमिकेतून अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे, तीक्ष्ण बुद्धीचे समाजहिताची कळकळ बाळगणारे नि विशेष महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्रपणे विचार करून सिद्धांत मांडणारे असे एकमेव अर्थशास्त्रज्ञ असावेत.

अर्थशास्त्राचे संशोधक म्हणून दांडेकर यांचे नाव मशहूर आहे. अर्थशास्त्राच्या व आकडेशास्त्राच्या अनेक संशोधन संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे व त्यांच्या कार्याच्या दिशा ठरवून दिल्या आहेत. गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्था, भारत अर्थ विज्ञानवर्धिनी या संस्थांचे तर ते संचालक होते. नॅशनल सँपल सर्व्हेचेही ते अनेक वर्षे चेअरमन होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था नि सरकारच्या अनेक समित्या यांचे ते सदस्य होते.

अनेक वर्षे त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध आर्थिक मंडळांवर अध्यक्ष म्हणून काम केले आहे.  याशिवाय ते सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते, खादी बोर्डाचे डायरेक्टर होते, फूड कॉर्पोरेशनचे डायरेक्टर होते पण त्या सर्व पदांचा त्यांनी स्वखुषीने त्याग केला. गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून त्यांना नेमल्यावर प्रोबेशनरी पिरीयड विश्वस्तांनी घातल्यावर त्याच्याही संचालकपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

त्या दरम्यान त्यांनी आणि प्रा. नीळकंठ रथ या दोघांनी मिळून लिहिलेले “भारतातील गरिबी” हे संशोधनात्मक पुस्तक खूप गाजले होते. भारतातील गरिबीची व्याख्या करता येईल का, ती गरिबी मोजता येईल का, या दृष्टीने एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी या पुस्तकात मांडला होता. हे पुस्तक वाचायला तसे अवघड आहे. पण अनेक प्रकारची नवीन माहिती, माहीत असलेल्या गोष्टींवर नवा प्रकाश, त्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याखेरीज राहणार नाही….

असो एक महत्वाचा किस्सा मात्र सांगायचाच राहून गेला, जो आम्हाला डॉ.भा.र. साबरे यांच्या ‘मोठी माणसे’ या पुस्तकात मिळाला. 

समाजातील ढोंगीपणाची दांडेकरांना मनस्वी चीड होती, मग ते कितीही मोठे लोकं का असेनात दांडेकर फिरकी घेत असायचे….

मुंबईतील एका व्यापारी संघटनेने ‘महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ‘बेकारी’ या विषयावर दिवसभराची चर्चा ठेवली होती….ऐकून वाचून जरा विचित्र अन हसायाला येईल कारण बेकारीवर बोलायला स्थळ निवडलं ताजमहाल हॉटेल…..ताजमहाल हॉटेलमधील क्रिस्टल रूममध्ये हि लोकं जमली होती.  चर्चा करणारी सर्व मंडळी मुंबईतील नामवंत उद्योगपती, व्यावसायिक होते.

 या चर्चेचे प्रमुख वक्ते प्रा. दांडेकर होते !!!

सकाळच्या चर्चासत्राला ते यायचे होते. ते काही आले नाहीत व दुपारी जेवायलाही नाही. जेवणा नंतरच्या चर्चेला मात्र ते आले. संयोजकांनी यांना बोलायला सांगितले. या विषयावर ते बोलले, विषय मांडला नि शेवटी मात्र बाँब टाकला. “हे सगळे मी सांगतो आहे. पण कुणापुढे? तुम्ही सगळे या विषयाची गंभीरतेने चर्चा करू शकता का? ग्रामीण भागातले दारिद्र्य नि बेकारी याबद्दल तुम्हाला खरेच काही आच आहे का? तर नाही असे माझे उत्तर आहे. खरे म्हणजे या विषयावर ताजसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा करणेच मुळात चुकीचे. ही जागा चुकीची नि चुकीच्या लोकांपुढे मी बोलतो आहे याची मला जाणीव होती. म्हणूनच मी सकाळी तुमच्या सत्राला आलो नाही नि नंतरच्या जेवणाला आलो नाही,” असे सांगून ते स्टेजवरून खाली उतरले. नि तडक हॉलच्या बाहेर पडले. 

या संघटनेचे सचिव हातात गुच्छ घेऊन त्यांच्यामागे धावले. प्रा. दांडेकर ताजच्या कॉरिडॉरमधून तरातरा चाललेले आहेत नि हे सचिव हातात गुच्छ घेऊन त्यांच्यामागे धावताहेत असे दृश्य सर्वांच्या समोर घडले होते…

‘गरिबी हटाव’ या विषयावरील एका परिसंवादासाठी जमलेले काही बुद्धिनिष्ठ समाजवादी एका मोठ्या हॉटेलमध्ये उतरले होते नि त्यांची तशी व्यवस्था एका समाजवादी संघटनेने केली होती. त्या परिसंवादात बोलताना दांडेकरांनी या बुद्धिनिष्ठांचे व समाजवाद्यांचे वाभाडे काढले नि त्यांच्या वर्तणुकीतील विसंगती दाखवून दिली होती.

कोणत्याही सभेत अशी स्पष्ट, न रूचणारी भूमिका घेतल्यावर अनेक वेळा अडचणी येतात. कुणालाच अप्रिय गोष्ट ऐकायला नको असते. “याचा परिणाम म्हणजे व्याख्यानाला बोलाविण्यासाठी अनेक माणसे आलेली असतात, पण व्याख्यान संपल्यावर पोचवायला अनेक वेळा कोणीही येत नाही,” असे दांडेकर एकदा हसत हसत म्हणाले.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांबद्दल, असंघटित वर्गाबद्दल दांडेकरांना अपार अनुकंपा आहे. मग ते शेतमजूर असोत, कोरडवाहू शेतकरी असोत. दुष्काळग्रस्त असोत, धरणग्रस्त असोत की हमाल असोत. त्यामुळे ग्रामीण भागातील भूमीहीन व शेतमजूर यांचे मेळावे, दुष्काळग्रस्त शेतकायांच्या सभा, हमाल पंचायतीच्या सभा यांना ते आवर्जून हजर असतात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.