अत्रेंनी पुस्तकातल्या शिव्या मोजून काढल्या आणि थेट विधानसभेत राडा झाला.

नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला तेवढ्याच आपुलकीच्या नावाने संबोधने फार कमी लोकांच्या वाट्याला आले आहे. अगदी प्रचंड लोकप्रिय असणारे लेखक आणि कवी त्यांनाही हे भाग्य लाभले नाही.

पण वादग्रस्त असूनही ज्या माणसावर लोकांनी जीवापाड प्रेम केलं आणि आपुलकीने “भाऊ” म्हणून संबोधलं असा माणूस म्हणजे भाऊ पाध्ये.

त्यांचं संपूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. जन्म दादरचा, ०६ नोव्हेंबर १९२६. मुंबईची नसन्नस त्यांना आपल्या शिक्षणातच उमजून चुकली. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली पासआउट झाले . तो काळ मुंबईच्या कम्युनिस्ट वाऱ्यांचा होता. तेव्हा १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले.

त्यांच्या लेखनातून म्हणूनच राजकारण आणि कार्यकर्ते यांचे संदर्भ येत.  त्या काळच्या तरुण मनाची खदखद समजून घेणारा हा लेखक होता.

आमच्या ओळखीत मुंबईतल्या लोकांना एवढं ओळखणारा एकमेव माणूस होऊन गेला तो मंटो. सआदत हसन मंटोच्या लेखनात दिसणारी मुंबई ही फक्त गरीब माणसाला दिसायची. त्या मुंबईशी साध्या माणसांचा रोजचा झगडा सुरु असायचा. फक्त समुद्र आणि इमारती यांच्यापलीकडील वस्त्या, चोरबाजार, मोहल्ले, पक्षांची कार्यालये, तरुणांचे अड्डे, नाक्यावरच्या गप्पा यापलीकडची मुंबई लोकांना ठाऊक नव्हती. लिहिणाऱ्या माणसांनी कायम तिला झाकूनच ठेवलं. नेमकं त्याचंच वर्णन भाऊ पाध्येंनी आपल्या लेखनात केलं.

मंटोला फाळणीनंतर मुंबई सोडून जावं लागलं. घराच्या भिंतीवरचं तुकारामांचं चित्रही त्याला पाकिस्तानात नेता आलं नाही. पण त्याचा सगळा वारसा भाऊ पाध्येंकडे होता असं वाटतं. उर्दूचं नुकसान व्हायचं ते झालंच, पण भाऊंमुळे किमान मराठी माणसाला ती मुंबई हमेशा भेटत राहिली.

पाध्येंनी आपल्या लेखनाचं मोल ठाऊक असावं. किमान लिहिण्यामागची प्रचंड मेहनत करणारे ते लेख होते. आपल्या कादंबरी लेखनाला ते “एक ब्लडी हार्ड वर्क!” म्हणून संबोधतात. याच लेखनामुळं ते अडचणीत मात्र आले होते.

नपेक्षा या पुस्तकात अशोक शहाणे यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. तेव्हा ते मनातली सगळी अस्वस्थता ओतून लिहीत असत. त्यामुळं त्यात सत्तारूढ लोक आणि पोलीस यांच्याविषयी उल्लेख येत. वासूनाक्यातील काही गोष्टी छापताना एका जागी “पोलिसांचे लफडे मागे लागले की समजेल” असं छापून आलं होतं. खरं म्हणजे ही मुद्रण करणाऱ्यांची चूक होती असं शहाणे म्हणतात. कदाचित भाऊंची प्रुफे वाचणाऱ्या कुणीतरी कमेंट म्हणून ते लिहिलं होतं आणि छापणाऱ्याने त्यालाच लेखाचा भाग म्हणून छापून टाकलं!

१९६५ साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. नुकत्याच झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून अनेक नेते सभागृहात आले होते. त्यांचा काँग्रेसला कायम विरोध होता. त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. त्यांना कचाट्यात धरायला विरोधी पक्षाने भाऊ पाध्येंची कादंबरी वापरायचं ठरवलं.

आचार्य अत्रे यांनी कादंबरीचा संदर्भ देत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. “सरकारचे कुठं लक्ष नाही” असा सूर आळवत आरोप केले गेले. भाऊंच्या लेखनावर नेहमीप्रमाणे अश्लीलतेचा आरोप केला गेला.

महाराष्ट्रात वातावरण पेटलं. भाऊंच्या बाजूनेही काही लोक वादात उतरले. विजय तेंडुलकर वसंत शिरवाडकर आणि दुर्गा भागवत अशा दिग्गज लोकांनी भाऊंची बाजू घेतली. पण मागे सरतील तर अत्रे कसले!

त्यांनी आपल्या ‘नवा मराठा’ पेपरमधून २४ एप्रिल १९६६ रोजी अग्रलेख लिहिला. त्यात भाऊ पाध्येंना जोरदार लक्ष्य केलं. नेमाडे, उद्धव शेळके यांनाही यात ओढत अत्रेंनी लिहिलं- साहित्यातल्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या ‘वासूनाका’ने!

” संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक ‘वासूनाका’ लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते.”

अशा भाषेत आचार्य अत्रेंनी या पुस्तकावर टीका केली.

वास्तविक पाहता भाऊ पाध्ये अत्रेंकडे काही काळ कामाला देखील होते. आणि हि गोष्ट अत्रेंच्याही लक्षात होती. “‘वासूनाका’मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाल्याचे”त्यांनी आपल्या लेखनात म्हंटले आहे. असे पुस्तक मराठीत प्रकाशितच होऊ शकत नाही अशी भूमिका अत्रेंनी घेतली.

पुस्तकात भाऊ पाध्येंनी ‘पोक्या’ या पात्रामार्फत मुंबईतल्या सामान्य पोराची भाषा वापरली होती. त्यामुळं त्यात शिव्या असणे साहजिक होते. आचार्य अत्रेंनी त्यातल्या शिव्यांची संख्या मोजून काढली.

“‘भ्यांचोद’ ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् ‘च्यायला’ सव्वाशे वेळा.” असं त्यांनी सरळसरळ अग्रलेखातच छापून टाकलं. इतकेच नव्हते तर या कादंबरीची बाजू घेणाऱ्या लोकांचाही पाणउतारा केला.

हि बाब इंग्रजी पेपरांमध्येही पोहोचली आणि ‘फायनॅन्शल एक्सप्रेस’मधे ‘जे-वॉकर’या नावाने कुणीतरी लेख लिहून अत्रेंवर टीका केली.

वसंतराव नाईक यांना साहित्यात काही रस नव्हता. त्यामुळं त्यांनी यात लक्ष घालायचं टाळलं. पण विरोधी गट सरकारला निशाणा बनवू लागल्यावर त्यांनी याची जबादारी राज्यपाल नियुक्त आमदार ग. दि. माडगूळकर यांच्याकडे सोपवली गेली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२मध्ये राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार नियुक्ती झाली होती. त्यात गीतरामायणकार गदिमा आमदार झाले होते.

अत्रेंनी “गलिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा ‘अडाणेश्वर’ ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. ” असे म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.

तेव्हा ही साहित्याची धोंड वसंतरावांनी ग. दि. माडगूळकर यांच्याकडे सोपवली. “पुस्तक वाचून काय ते कळवा म्हणजे पुढील कारवाई करता येईल” असं त्यांनी सांगितलं.

गदिमा स्वतः एक साहित्यिक होते, म्हणून फक्त शब्दांच्या पलीकडे कादंबरी आणि लेखन काय असतं हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी या पुस्तकात काहीही अश्लील नसल्याचा निर्वाळा दिला.

त्यानंतर विरोधकांच्या मताला न जुमानता वसंतरावांनी गदिमांचा शब्द अंतिम मानून या पुस्तकावर बंदी आणली नाही. म्हणूनच भाऊंची ही कादंबरी लोकांपर्यंत पोचू शकली. मुंबई आणि महाराष्ट्रातील तरुणाईत एकेकाळी भाऊ हे एवढ्या आपुलकीचं नाव बनलं. त्याला अनेक कारणं होती. त्यांच्या कादंबरीवर अनेक वादळं उठली. पण त्यात सत्याचे एवढे मार्मिक चित्रण होते की ते आयुष्य रोज जगणाऱ्या माणसांना ते सगळं आपुलकीचं वाटत असे.

म्हणूनच तुकारामाला युरोपात नेणाऱ्या दिलीप चित्रेंनी भाऊ पाध्येंविषयी म्हणून ठेवलं आहे:

“नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन.

दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही.”

जनतेनं त्यांना न ओळखल्याबद्दल अशोक शहाणेंनी “आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत” अशा शब्दांत आपली निंदा केलीय. भाऊंसारखा कुणी लेखक होवो न होवो, किमान त्यांचे स्मरण ठेवणं एव्हढंतरी सरसाध्य माणसाने करावं ही रास्त अपेक्षा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.