या भारतीय कार्यकर्त्याने पेंटियम चिपचा शोध लावला आणि कम्प्युटर्सने स्पीड पकडली

आजचा जमाना हा डिजिटल आहे. प्रत्येक जण टेक्नोसॅव्ही झाला आहे. अशात कम्प्युटर म्हणजे जगण्यातला अविभाज्य घटक झाला आहे. त्यातही अपग्रेडेड व्हर्जन्सची मागणी वाढलीये. कारण कॉम्प्युटरवर काम करत असताना प्रत्येकाला आपली सिस्टीम वेगाने चालवायची असते. पण संगणक वापरणाऱ्या बऱ्याच लोकांना हा वेग कसा ठरवला जातो किंवा संगणक कसा कार्य करतो हे देखील माहित नसते.

तर कार्यकर्त्यांनो, साधारणपणेमायक्रोप्रोसेसर चिप्स’ या संगणकाचा वेग आणि त्याचं सुरळीत चालणं निर्धारित करतात. जसे आज संगणक किंवा लॅपटॉपमध्ये i3 आणि i5 प्रोसेसर आपण बघतो तसंच पूर्वी, जुन्या तंत्रज्ञानाचे नाव पेंटियम (Pentium) होते, ही चिप जुन्या संगणकात सापडायची. ज्याची सुरुवात Pentium 1 ने झाली, त्यानंतर Pentium 5 i3 चे युग सुरू झाले.

१९९३ मध्ये, प्रसिद्ध कंपनी इंटेलने ही चिप जारी केली होती. इंटेलचं नाव कुणाला माहित नाही, असं नसणारचं पण तरी माहित नसेल तर, इंटेल ही मायक्रोप्रोसेसर बनवणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे. ज्यामुळे इंटेलचा खप लय वाढला होता, कारण होतं ते स्पीड. पण ज्या माणसाने या पेंटियम चिप मालिकेचा शोध लावला तो कोणी बाहेरील नसून भारतीय आहे.

प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ विनोद धाम यांच्या नावावर पेंटियम बनवण्याचं श्रेय जातं. त्यांना ‘पेंटियम प्रोसेसरचे जनक’ म्हणून ओळखलं जातं. 

 इंटेलचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या विनोद धाम यांचा जन्म १९५० मध्ये पुण्यात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबच्या रावळपिंडीचे होते, जे सध्या पाकिस्तानचा एक भाग आहे. धाम यांचे वडील लष्कराच्या नागरी विभागाचे सदस्य होते आणि फाळणीच्या काळात त्यांचं कुटुंब भारतात आलं होतं. १९७१ मध्ये २१ वर्षाचे असताना दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बीईची पदवी त्यांनी पूर्ण केली. 

तसं बघितलं तर त्यांना इंजिनीअरिंग करायचं नव्हतं पण त्यांच्या कुटुंबाबाने करण्यास भाग पाडलं. त्यांना भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा होता, पण अभियांत्रिकीमध्ये जास्त पैसे असल्याने त्यांच्या भावाने धाम यांना अभियांत्रिकीत शिफ्ट होण्याचा सल्ला दिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कॉन्टिनेंटल डिव्हाइसेस नावाच्या संस्थेसोबत काम करू लागले. 

कॉन्टिनेंटल डिव्हाइसेस नावाची संस्था सेमीकंडक्टरसाठी एक स्टार्टअप होती, ज्याने कॅलिफोर्नियाच्या टेलीडाइन सेमीकंडक्टरशी कोलॅबोरेशन केलं होतं. धाम यांनी अनुभव घेण्यासाठी या कंपनीसोबत काम केलं. मात्र अजून उच्च शिक्षण घ्यायचं असा निर्धार त्यांनी केलेला होता. त्यानुसार कॉन्टिनेंटल डिव्हाइसेस इथे चार वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि ते थेट अमेरिकेला गेले.

सिनसिनाटी, ओहायो (Cincinnati, Ohio) इथे असलेल्या यूएस युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीमध्ये एमएसच्या (MS) च्या अभ्यासात प्रवेश घेतला. त्यांनी सेमीकंडक्टरवर आधारित असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमएस केलं. हा निर्णय घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे त्यांना त्यांच्या मूळ प्रेमाशी, भौतिकशास्त्राशी संपर्क साधण्याची संधी मिळणार होती.

सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात त्यांना रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गणित, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर सायन्स, सर्किट डिझाइन, फ्लुइड मेकॅनिक्स याबरोबरच भौतिकशास्त्राचा अभ्यास करायला भेटला. ज्याने या  विषयांबद्दल त्यांचा इंटरेस्ट वाढला. 

एमएस पूर्ण केल्यानंतर, ते एनसीआर कॉर्पोरेशनमध्ये सामील झाले होते. एनसीआर कॉर्पोरेशनमध्ये त्यांच्या कामामुळे फ्लॅश तंत्रज्ञानाचा शोध लागला. काहीच काळात त्यांनी इंटेल (Intel) कंपनी जॉईन केली. इंटेलमध्ये इंजिनिअर म्हणून ते रुजू झाले, जिथे त्यांनी जगप्रसिद्ध पेंटियम प्रोसेसरच्या विकासाचं नेतृत्व केलं. एनसीआर कॉर्पोरेशनमध्ये फ्लॅश तंत्रज्ञानाच्या त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांना इथे झाला. 

पेंटियम प्रोसेसरच्या विकासातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना “पेंटियमचे जनक” म्हटलं जातं. इंटेलच्या पहिल्या फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानाच्या (ETOX) सह-शोधकांपैकी धाम एक आहेत. त्यांच्या कामामुळे ते इंटेलच्या मायक्रोप्रोसेसर ग्रुपच्या उपाध्यक्षपदी पोहोचले होते. तब्बल १६ वर्ष त्यांनी इंटेल सोबत काम केलं.

१९९५ मध्ये, त्यांनी इंटेल सोडली आणि नेक्सजेनमध्ये (Nexgen) सामील झाले, जी इंटेलची प्रतिस्पर्धी कंपनी होती. ही कंपनी नंतर AMD ने विकत घेतली. धाम यांनी AMD ग्रुपसाठी K6, ‘पेंटियम किलर’ प्रोसेसर लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी एप्रिल १९९८ मध्ये सिलिकॉन स्पाइस या नवीन स्टार्टअपचं नेतृत्व केलं, ज्याला त्यांनी VOIP चिप तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं.

धाम आणि त्यांच्या पत्नी साधना अमेरिका आणि भारतात अनेक कारणांसाठी देणगीदार आहेत. ते २००१ पासून अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे (AIF) विश्वस्त आहेत. इतकंच नाही तर ते AIDS बद्दल जागरूकता कारण्यासाठीही कार्यरत आहेत.

विनोद धाम यांची कहाणी प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी प्रेरणादायक आहे. प्रत्येकाला त्यांच्यावर अभिमान वाटेल अशी आहे. त्यांनी विज्ञानाच्या उद्योगावर आपला ठसा उमटवला आहे, ज्यामुळे भारताचा मोठा वाटा या क्षेत्रात सामील झाला आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.