क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला जातं.

ज्याने पडद्यामागे राहून आपल्या  प्रशासकीय कौशल्यामुळं भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आणले. तो माणूस म्हणजे जगमोहन दालमिया.

जगमोहन दालमिया यांचा जन्म कोलकात्यातल्या एका मारवाडी कुटुंबात झाला होता. शालेय जीवनापासून त्यांना क्रिकेटमध्ये भारी इंटरेस्ट. त्यावेळी ते कोलकात्याच्या क्लबमध्ये विकेटकीपर आणि ओपनर बॅटसमन म्हणून खेळायचे. वडिलांच्या अकाली निधनाने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांच्यावर घराची जबबदारी येऊन पडली. त्यामुळे क्रिकेट सुटलं ते सुटलचं.

कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी जगमोहन दालमियांनी आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायामध्ये लक्ष्य घालायला सुरुवात केली, अन अल्पावधीतच  ते आपल्या व्यवसायाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन गेले. अनोख्या स्थापत्य शैलीसाठी नावजलं गेलेलं कोलकात्याचं बिर्ला प्लॅनेटोरीयम त्यांच्याच कंपनीने  बांधलय.

पहिलं प्रेम कोणाला विसरता येतं? नाहीच येत विसरता !

दालमिया यांचंही तसंच झालं. धंद्यात बरकत आली होती मात्र त्यांचं मन क्रिकेटकडे ओढ घेत होतं. खेळायचं वय तर तसंच उलटून गेलेलं. म्हणून मग त्यांनी बंगाल क्रिकेटच्या  प्रशासनात लक्ष घालायला सुरवात केली. तेथील त्यांच्या कामाचा झपाटा बघून त्यांना अवघ्या ३९ व्या वर्षी बीसीसीआयमध्ये पाठवण्यात आलं.

१९८७ सालचा विश्वचषक भारतात आणला. 

सत्तरच्या दशकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी गणतीतंच धरायचं नाही. जिथं क्रिकेट टीमलाच लिंबू टिंबू समजलं जायचं तिथं बीसीसीआयची काय कथा? १९८३ च्या भारताच्या विश्वकप विजयाने मात्र हे चित्र बदललं. याच वर्ल्ड कपच्या वेळी एक किस्सा घडला होता.

तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन.के.पी.साळवे यांना लॉर्डसच्या फायनल मॅचचे अवघे दोन पासेस देऊन एमसीसीने त्यांचा अपमान केला होता. त्याचाच बदला भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून घेतला. मात्र साळवी यांनी त्या दिवशी चंग बांधला की भारताला क्रिकेटचा बादशाह बनवायचं. पुढच्या विश्वचषकाचं आयोजन भारतात करून याची सुरवात करायची.

साळवे यांनी आव्हान स्वीकारलं आणि १९८७ सालच्या विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी आपले तरुण सहकारी जगमोहन दालमिया आणि इंद्रजीत बिंद्रा यांच्यावर टाकली. त्यांनी वर्ल्डकप आयोजनाची बोली जिंकत ही स्पर्धा भारतात आणली. आयोजनासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका या शेजारी देशांना सुद्धा सोबतीला घेतलं. प्रायोजक म्हणून धीरूभाई अंबानींना पकडलं. शेवटी भारताने विश्वचषकाचं यशस्वी आयोजन करून दाखवलं.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने दालमिया यांना आत्मविश्वास दिला आणि ते आयसीसीच्या प्रशासनात सुद्धा सक्रिय झाले. दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर क्रिकेट खेळण्याची बंदी होती. १९९१ साली तब्बल २१ वर्षांनी ही बंदी उठविण्यात आली. त्याचं श्रेय देखील दालमिया यांनाच जातं.

भारतीय क्रिकेटमध्ये पैसा आणण्याचं श्रेय दालमियांचंच.

१९९१ साल उजाडलं. भारताने लायसन्सराज संपवून जागतिकीकरण स्वीकारलं. केबल टीव्हीवरच्या जाहिरातीमुळे स्टार क्रिकेटपटू पैसे कमाऊ लागले. बनियाचं डोकं असलेल्या दालमियांनी भारतीय क्रिकेटमध्ये प्रायोजकांमार्फत पैसा आणला आणि पुन्हा एकदा १९९६ सालच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात यशस्वीरीत्या करून दाखवलं.

१९९६ सालचा विश्वचषक ‘विल्स’ या सिगरेटच्या  ब्रँन्डने प्रायोजित केला होता. त्यामुळेच त्या विश्वचषकात भारतीय टीमच्या शर्टवर विल्सचं नांव झळकलं होतं. प्रचंड क्रिकेटवेड्या लोकांच्या या देशात क्रिकेट प्रचंड पैसा कमऊन देऊ शकते हे सगळ्यात आधी दालमिया यांनीच हेरलं होतं. त्यामुळेच दालमियांना चेष्टेने लोक ‘डॉलरमिया’ म्हणू लागले होते.

आयसीसीच्या अध्यक्षपद भूषवणारे पहिलेच आशियायी व्यक्ती

१९९७ साली त्यांच्या रुपात पहिल्यांदाच एखादी आशियाई व्यक्ती आयसीसीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला. यावेळी एका अर्थाने साळवेचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र  २००० साल उजाडलं आणि भारतीय क्रिकेटला एक मोठा सेटबॅक बसला. मॅच फिक्सिंगचं प्रकरण उघडकीस आलं.

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन, अजय जडेजा आणि नयन मोंगिया यांसारख्या भारतीय संघातल्या प्रमुख खेळाडूंची नावं या प्रकरणाशी जोडली गेल्याने स्पॉन्सर सुद्धा भारतीय क्रिकेटशी जोडले जायला घाबरू लागले.

dalmiya and ganguly
दालमिया आणि गांगुली

त्यानंतरच्या काळात दालमियांच्याच कोलकात्याच्या सौरव गांगुलीच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली. गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फिनिक्सप्रमाणे झेप घेतली अन मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात मलीन झालेली भारतीय क्रिकेटची प्रतिमा उजळण्यास मदत झाली.

लॉर्डसच्या गॅलरीत गांगुलीने फिरवलेल्या शर्टने अख्या जगाला इशारा दिला की आता भारतीय क्रिकेट तुमच्या ‘अरे’ला ‘कारे’नेच उत्तर देणार. हा आत्मविश्वास क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर तर आलाच होता, पण त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पैशाच्या श्रीमंतीतूनही आला होता.

कुशल आणि धूर्त प्रशासक. 

आयसीसीच्या अध्यक्ष पदावरील दालमिया २००१ साली बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून भारतात परतले. याच वर्षी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील बहुचर्चित माईक डेनेस प्रकरण घडलं. ज्यात मॅच रेफ्री माईक डेनेस यांनी सचिन तेंडुलकर आणि गांगुलीसह सहा भारतीय खेळाडूंवर बंदी आणली होती. दालमियांनी आपली चाणक्यनीती वापरून  हे प्रकरण थोडक्यात निभावून नेलं.

प्रायोजकांना आणि टीव्ही चॅनल्सला करारबद्ध करून मिळवलेला पैसा दालमियांनी जिल्हा पातळीवरच्या क्रिकेट असोशिएशनपर्यंत नेला. जसं ‘नॅशनल प्लेयर्स’सोबत कराराची पद्धत सुरु करून त्यांचा आर्थिक फायदा करून दिला, तसंच माजी खेळाडूंना पेन्शन सुरु करून शेवटच्या दिवसात त्यांची आबाळ होणार नाही, याची देखील काळजी घेतली.

dalmiya and sharad pawar
दालमिया आणि शरद पवार

दालमियांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत होते. २००४ साली कसलेले राजकारणी असलेल्या शरद पवारांच्या रुपात भारतीय क्रिकेटमध्ये त्यांना पहिल्यांदाच मोठे  चॅलेंज उभे राहिले. सुरवातीला दालमियांनी पवार यांना कसेबसे हरवले मात्र पुढच्याच वर्षी दालमियांचे खास समजल्या जाणाऱ्या रणबीरसिंग महिंद्र यांना हटवून शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष बनले आणि भारतीय क्रिकेटमधील दालमिया युगाचा अंत झाला .

दालमियांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यानंतरच त्यांना बीसीसीआयमधून काढून टाकण्यात आलं. कोर्टात केसेस झाल्या, पण त्यातून ते सहीसलामत सुटले. दालमियांनी रचलेल्या पायावर ललित मोदींनी ‘आयपीएल’रुपी कळस चढवला. जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून बीसीसीआय उदयास आली. भारताने २००७ साली  नव्यानेच  सुरु झालेला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक आणि  २०११ सालचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने भारत क्रिकेटचा निर्विवाद बादशहा बनला.

भारतीय क्रिकेटला हे ‘अच्छे दिन’ दाखवणारे दालमिया मात्र त्यावेळी विजनवासात होते. मात्र भारताच्या विश्वचषक विजयाच्या २ वर्षानंतर म्हणजेच २०१३ साली त्यांनी बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पुनरागमन केलं. पुढे २०१५ साली अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत मानाने अध्यक्षपदावर विराजमान झाले. मात्र त्यांची अध्यक्षपदाची ही इनिंग काही दीर्घकाळ टिकू शकली नाही. २० सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं आणि भारतीय क्रिकेटच्या प्रशासनातील एक अध्याय संपुष्टात आला.

भारतीय क्रिकेटचा हा सम्राट त्याच्या अखेरीस सुद्धा आपल्या सिंहासनावरच राहिला.

गोऱ्या देशांचे आयसीसीवरचे वर्चस्व मोडून काढत फक्त भारतच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियाई देशांना त्यांनी क्रिकेट जगतात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कार्याला सलामी म्हणून श्रीलंका क्रिकेटने त्यांच्यावर पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.