सूत्र-सूत्र म्हणजे कोण असतात, संपादक-पत्रकारांना विचारलं त्यांनी अखेर सांगितलं.. 

कोणताही राजकीय ड्रामा सुरू झाला की धडाधड ब्रेकिंग न्यूज आदळायला सुरवात होते. बर बातम्या येण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नसतो पण या सगळ्या बातम्या असतात सुत्रांच्या हवाल्याने. सुरवातीला एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या सगळ्या बातम्या धडाधड बाहेर येत होत्या तेव्हा देखील पुढं सुत्रांच्या हवाल्याने असं चिटकवून दिल्या जात होत्या. मात्र सूत्रांचा खरा गेम तिथं झाला जेव्हा सगळ्या सूत्रांचे अंदाज चुकवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अशी घोषणा झाली.

त्यामुळं बघावं म्हटलं हे सुत्र असतात कोण? खरच सुत्र असतात की अशा बातम्या अंदाजपंचे ठोकून दिलेल्या असतात.

बर हे सूत्र माध्यमांनी पेरलेले असतात की कसं.. 

या प्रश्नांच उत्तर माध्यमात काम करणाऱ्या लोकांशिवाय दूसरं कोण देणार. मग आम्ही काय केलं तर एकएक करुन संपादक, रिपोर्टर राहिलेल्या लोकांना फोन करुन सुत्र म्हणजे कोण? सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देतात म्हणजे नेमकं काय हे विचारायला सुरवात केली..

1) पहिला फोन लावला तो ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना. त्यांनी बोलभिडूसोबत बोलताना सांगितलं की, 

“आता सूत्र म्हणजे काय? तर ती कोणी एक व्यक्ती नसते. जेव्हा एखाद्या विषयातील माहिती समोर यावी अस एखाद्याला वाटतय पण ते त्याच्या नावाने समोर येऊ नये असही वाटत असेल तर ती व्यक्ती पत्रकारांसाठी सूत्र म्हणून काम करते.

थोडक्यात पत्रकारितेत जे कोट करणं असत ते त्या संबंधित व्यक्तीला नको असतं, अशी माहिती मग सूत्रांच्या हवाल्याने चालवली जाते.

पण एका सूत्राकडून माहिती मिळाली तरी ती दोन २-३ ठिकांणाहून कन्फर्म करून द्यावी अशी अपेक्षा असते. सूत्र की संकल्पना वर्तामानपत्रात खूप वर्षांपासून चालत आलीये पण टिव्ही पत्रकारितेत हे अगदी गेल्या काही काळात आलय. पत्रकारितेत काम करणाऱ्या व्यक्तिला सूत्र म्हणजे कोण ते माहिती असतं पण ज्याची पत्रकारिता झाली नाहीये त्याला वाटतं की सूत्र म्हणजे कोणीतरी एक agency आहे, एखादा ठराविक व्यक्ती आहे.पण तस मुळीचं नसतं.

आता बातमी शिवसेनेबाबत असेल तर तो शिवसेनेचा सूत्र असतो. बातमी कॉंग्रेसबाबत असेल तर तो कॉंग्रेसचा सूत्र असतो.

एबीपी माझाबाबत बोलायचं तर अशा खूप बातम्या आहेत ज्या एबीपी वर सूत्रांच्या माहितीने ब्रेक झाल्या आहेत…

माझ्या संस्मरणात राहिलेली बातमी म्हणजे अजमल कसाबच्या फाशीबाबतची.

अजमल कसाबची जी फाशी होणार होती त्याची बातमी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा दिलेली..आज त्याला फाशी दिली जातीये ही माहिती ब्रेक केली होती, पुढचे २ तास कोणालाही ती बातमी माहिती नव्हती. आमच्या सूत्राने आम्हांला ती बातमी आधी दिल्याने आम्ही पुण्यातील येरवडा जेलच्या बाहेर आमचे रिपोर्टर्स पाठवले, ओबी व्हॅन पाठवली आणि आत फाशी चालू असताना बाहेर रिपोर्टींग सुरू होत. राजकीय बातम्या सूत्रांच्या हवाल्याने एबीपीने खूप ब्रेक केल्या आहेत. पण ही बातमी माझ्या आठवणीतली महत्वाची बातमी आहे.

2) त्यानंतरचा फोन होता तो झी 24 तास चॅनेलचे संपादक निलेश खरे यांना. ते म्हणाले,

सूत्र ही १०० टक्के खरी असतात. परवा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद झाला अशी बातमी आम्ही रविवारी रात्री झी २४ तास वर चालवली त्यात आम्ही म्हणालो, की ती बातमी अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. मी अनेक वर्षे रिपोर्टींग करतोय त्यामुळे मला माझ्या एका खास सुत्राने हि बातमी दिली. म्हणून आम्ही ती बातमी नाराजीची चालवली पण अनेकजण त्यावेळी हसले तुमच्या सूत्रांना पोत्यात घालून हाणलं पाहिजे, त्यांना शोधलं पाहिजे वगैरे वगैरे टिकाही झाल्या..

पण दोन दिवसांनी लक्षांत आल की आपली सूत्र १०० टक्के खरी होती. त्यामुळे जर तुम्ही पत्रकार चांगले असाल तर तुम्हांला कळत की समोरचा तुम्हाला योग्य आणि खरी बातमी देतोय की चुकीची बातमी देतोय. त्यामुळे सुत्र तुम्हाला वापरून घेतात की तुम्ही सूत्रांना वापरून घेता हे पत्रकार म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं असतं.

पण सूत्र कोण असतात तर सूत्र अगदी ड्राईव्हर, शिपाई ते थेट मुख्यमंत्री सुद्धा असतो. मुख्यमंत्री सुद्धा बातमी देतात..

सूत्रांची अशी कोणती कॅटेगरी नसते. आमच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री सुद्धा ऑफ द रेकॉ़र्ड म्हणून बातमी दिल्याची उदाहरणे आहेत. गृहमंत्रीही बातम्या देतात. आता कसाबला फाशीवर लटकवलं तेव्हा मला गृहमंत्र्यांनी ही बातमी दिली होती. पण त्यांनी मला सांगितल होत की माझ नाव नाही घ्यायचं तू सुत्र म्हणून चालवं. त्यावेळी आर. आर. पाटलांना स्वत: च नाव घ्यायच नव्हत त्यामुळे ते म्हटले सुत्र म्हणून चालव हव तर एखाद्या तासाने आपण बोलू..

सो बरेच वेळा नेत्यांना मंत्र्यांना बातम्या त्यांच्या नावाने चालवायच्या नसतात तेव्हा त्या सूत्र म्हणून चालवल्या जातात.

3) नंतरचा फोन होता तो  लोकशाही न्यूजचे माजी संपादक दिपक भातूसे यांना. त्यांनी सांगितलं की, 

कसय, पत्रकारांना सगळ्याच बातम्या ऑन रेकॉर्ड मिळत नाहीत. समजा एखाद्या पक्षाची बैठक असेल तर त्याची बातमी ऑन रेकॉर्ड कोण देत नाही किंवा ऑन रेकॉर्ड दिलेली माहिती ही बैठकीतल्या माहिती पैक्षा वेगळी असते. कारण काही माहिती पक्षाला अधिकृतपणे समोर आणायची नसते अशावेळी पक्षातलेच काही नेते, कार्यकर्ते ती बातमी पत्रकारांकडे लिक करतात. ती बातमी लिक करणं म्हणजे त्या पत्रकाराचे किती चांगले रिलेशन त्या व्यक्तीसोबत आहेत याच्यावर अवलंबुन असतं.. 

माझा अनुभव म्हणजे जेव्हा कॉंग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अजित पवारांच्या  घरी बैठक झाली होती. तर त्या बैठकीच्या पूर्वीचं एका मंत्र्यांने मला ती बातमी लिक केली होती. त्याने सांगितलं की अशी-अशी बैठक आहे आणि त्या बैठकीत आम्ही सगळे राजीनामा देणार आहोत. 

पण बातमी आत्ता करू नका आम्ही राजीनामे दिल्यावर कळवतो… 

नंतर निर्णय झाला, राजीनामे झाले, मला ती बातमी कळाली त्यावेळी मी ती बातमी दिली. त्यावेळी बऱ्याच जणांकडे ती बातमी नव्हती. पक्षाला बातमी लिक करायची असते पण ती ऑन रेकॉर्ड सांगायची नसते तर ती बातमी अशा सूत्रांच्या हवाल्याने द्यावी लागते.

काही माहिती पक्षांना बाहेर सोडायची असते पण ती अधिकृतरित्या सांगायची नसते कारण नंतर त्याला नकारही देता येतो. ती पक्षांच्या फायद्यासाठी असते पण ती अधिकृतरित्या सांगायची नसते. अशा वेळी सूत्र हे अस्त्र पक्ष आणि पत्रकार यांच्याकडून वापरलं जातं..

4) इंडियन एक्सप्रेस ग्रुपसाठी दिल्लीतून अनेक वर्ष रिपोर्टिंग केलेले व ज्यांनी सुत्राच्या हवाल्याने नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या भेटीची बातमी ब्रेक केली होती अशा टेकचंद सोनावणे यांना सुत्रांबाबत माहिती विचारली तेव्हा ते म्हणाले, 

सूत्र असतात का तर हो सूत्र १०० % असतात. जशी पत्रकारांना सूत्रांची गरज असते तशी राजकारण्यांना पत्रकारांची गरज असते. सूत्रांकडून मिळालेली बातमी ही खोटी नसते ती खरीचं असते फक्त ती खरी कितपत आहे हे तपासणं पत्रकाराचं काम असतं.

आता एक उदाहरण घ्यायंच झालं तर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा ज्याने देशभरात प्रचंड गदारोळ माजवला तो बाहेर कसा आला..? तर त्याची लीड एका सरकारमधल्या दुखावलेल्या अधिकाऱ्याकडून मिळाली होती. त्या अधिकाऱ्याने ती लीड एक जवळच्या पत्रकाराला दिली. त्यानंतर बातम्या बाहेर आल्या.

थोडक्यात काय तुमचा सूत्र कोणीही होऊ शकतो परंतु तो किती रिलायबल आहे हे तुम्ही क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. राजकीय पत्रकारितेत अनेकदा मिस लीड वाली बातमी येते, ती वेरिफाय करायला अजून एखादा वरचा सोर्स तुमच्याकडे असायला हवा.

आता तुमच्याकडे येणारी माहिती ३ प्रकारची असते , Miss Information, Disinformation आणि ill information ..त्यातून खऱ्या बातम्या बाहेर आणनं हे पत्रकाराचं खरं कसब आहे.

राजकारण्यांविषयी बोलायचं तर ते खोटचं बोलतात अस आम्हांला शिकवल गेलयं.. काही खरे बोलणारे असतीलही पण ते बऱ्याचदा अर्धवट माहिती देतात. जेव्हा विषय येतो संवादाचा तेव्हा राजकारणी आणि पत्रकार यांच्यात संवाद होत असेल तर ते जे बोलतायत ते तपासूनच घ्याव, सजगपणेचं करावं.

प्रत्येक राजकीय नेत्यांच वर्तुळ असतं ते सर्कल १ , सर्कल २, सर्कल ३, सर्कल ४, सर्कल ५ . पत्रकार त्याच्या अनुभवावर , कौशल्यावर एकएका सर्कल मध्ये जातो. या प्रत्येक सर्कल मध्ये घुसणं तितकं सोप्प नाहीये. त्यासाठी तुमचं नेटवर्क मजबूत असायला लागतं. या सर्कलवरही अनेक गोष्टींचा परिणाम होतो.

उदाहरणार्थ दिल्लीत ऑपरेशन दुर्योधन झालेलं. खासदारांना लाच घेताना पकडलेलं पण त्यानंतर पत्रकार आणि खासदार यांच्यात दरी आली. पत्रकार आणि राजकारण्यांमधले दिल्लीत सौहार्द कमी झाला.पत्रकारांचं राजकारण्यांच्या घरी जाण बंद झालं.. त्यामुळे असाही फरक पडतो.

मी ब्रेक केलेली मोठी बातमी म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची सिक्रेट भेट

त्यावेळी बहुतेक कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये उद्धव ठाकरेंची सभा चालु होती. ठाकरे भाषणात म्हणाले की आम्हांला ५ पांडव पुरेसे आहेत आम्हांला कौरव नकोत. मी विचार करायला लागलो ठाकरे अस का म्हणतायेत.

५ पांडव म्हटलं तर भाजप , शिवसेना, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आहेत मग कौरव कोण असेल ? कुठला विरोधक असेल का? मी माझ्या सोर्सेस ला फोन लावायला सुरूवात केली.  तेव्हा मला कळालं की UPA मध्ये विसंवाद असल्याने राष्ट्रवादीकडून भाजपशी चर्चेची तयारी असल्याची माहिती मला मिळाली ( देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची घटना या ठिकाणी आवर्जून नोंदवली जाईल ) भाजप – राष्ट्रवादीची एकत्र सत्तेत येण्याची इच्छा आहे आणि त्यासाठीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ती सिक्रेट भेट झालेली आहे अशी माहिती मिळाली.

या भेटीची सरकारी नोंद मात्र नव्हती..माझ्या सोर्रेस च्या आधारे मी ती बातमी ब्रेक केली..पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात माझ्यावर टिका व्हायला लागली , मी दिवसभर अस्वस्थ होतो..माझी नोकरी जाईल असही अनेकजण म्हणाले मला धमक्याही आल्या…

या सगळ्यात मात्र लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. मी दिलेली बातमी खरी आहे हे गिरीश कुबेरांनी टेलिव्हिजनवर जाऊन सांगितलं.आपल्या वार्ताहरामागे आणि बातमीमागे ठामपमे उभे राहण्याचे हे मराठीतील एकमेव उदाहरण आहे. त्या दिवशी आमच्या ठाणे ऑफिसला पोलिस बंदोबस्तही दिलेला..

या सगळया प्रकारानंतर जेव्हा कळालं की खरचं मोदी- पवार भेट झाली होती तेव्हा मला इंडियन एक्सप्रेस ने इनहाऊस पुरस्कार दिला. थोडक्यात काय तर सोर्स तुमचं करिअर पुर्ण संपवू ही शकतात किंवा तुमचं अख्ख करिअर घडवूही शकतात

5) त्यानंतर पुणे ब्युरो चीफ म्हणून अनेक वर्ष कार्यरत राहिलेल्या अद्वैत मेहता यांना फोन करुन सुत्र कोण असतात याची माहिती घेतली. ते म्हणाले, 

सूत्र म्हणजे काय तर नेत्यांच्या जवळची लोकं, सूत्र ही फार वेगवेगळी असू शकतात. आता राज्यस्तरावरच्या घडामोडी असतात तेव्हा महापौर, आमदार ही सूत्र असतात. साधारण पत्रकारांचे सूत्र म्हणजे एखाद्या पक्षांत पदावरचे जे लोक असतात ते सूत्र असतात. पक्षात असणारे प्रवक्ते, आमदार, खासदार, नेत्यांचे ओएसडी, पीए, मंत्री हे सुद्धा सुत्र असतात. साधारण मुंबईबद्दल आमदारांना विचारलं जात तरी दिल्ली बाबत खासदार हे सुत्र असतात.

माझ्या माहितीतले मुंबईतले अनेक पत्रकार आहेज जे नेत्यांच्या पत्नींने दिलेली माहिती देखील सुत्र म्हणूनच वापरतात. काही जण अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विचारतात काही जण फडणवीसांच्या पत्नींनाही बातम्या विचारतात.

कधीकधी नेत्यांच्या मंत्र्यांच्या घराजवळ राहणारे शेजारी, त्यांचे मित्र मंडळी हे सुद्धा सुत्र असतात. आजवर मी पवारांच्या बातम्या बऱ्याच सुत्रांच्या हवाल्याने ब्रेक केल्या आहेत ज्या खऱ्या ठरल्या. सुशिल कुमार शिंदे मुख्यमंत्री होणार अशी माहिती सुद्धा मला सुत्रांनी दिली होती जी माहिती शिंदे चुकीची आहे म्हणत होते पण नंतर तीच खरी निघाली.

सध्याच्या न्यूज चॅनेल्सवर वगैरे जे सुत्र दाखवतात ते बऱ्याचदा क्रिएटिव्ह असतात. पत्रकार सेफ खेळतात. काही वेळी जी माहिती विश्वसनीय असते ती सुद्धा सुत्रांच्या नावावर खपवली जाते. बाऊन्स बॅक आपल्यावर येईल म्हणून म्हणून खास प्रतिनिधी, खात्रीलायक सूत्र अशा बातम्या खपवण्याचे प्रकार न्यूज चॅनेल्समध्ये सर्रास घडतात.

बऱ्याचदा सूत्र म्हणून ड्रायव्हर्स उपयोगी पडतात. कारण नेते नॉट रिचेबल झाले की ते नेमके कुठे आहेत याची माहिती ड्राईव्हर कडून मिळवली जाते. बातमीसाठी काहीही करायला तयार असणारे पत्रकार नेत्यांच्या ड्राईव्हरच्याच नाही तर बॉडिगार्डच्याही संपर्कात असतात. बातमी पेक्षा कुठे आहेत तो संबंधित नेता कुठे आहे हे सुद्धा कळत ते सुत्रांकडून..

6) चेकमेट पुस्तकाचे लेखक ज्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेसंदर्भात बऱ्याच घडामोडी समोर आणल्या अशा सुधीर सुर्यवंशी यांना बोलभिडूने विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की, 

सुत्र म्हणजे काय तर ओळखीचाच व्यक्ती जो माहिती पुरवतो. महत्वाची माहिती कोणी कोणाला अशीच देत नाही. त्या दोन व्यक्ती एकमेकांच्या किती जवळ आहेत, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास किती आहे यावर हे सगळ अवलंबून असतं. हे काही एका दिवसात घडत नाही किंवा एक वर्षातही घडत नाही. ही खुप मोठी प्रोसेस आहे. ज्यात तुमचे वर्षांनुवर्षांचे संबंध कामाला येतात. 

बऱ्याचदा त्या सुत्राला बातमी द्यायची असते पण चुकुनही नाव लिंक झाल नाही पाहिजे याची त्याला खबरदारी हवी असते अशा वेळी तो विश्वास कामी येतो.

यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळा ही सुत्र तुम्हालाही अडचणीत आणतात ती खोटी माहिती देऊन. त्यामुळे यावेळी तुमचा कस लागतो. ती बातमी कितीपत खरी आहे हे तुम्हांला शोधायला लागतं. 

माझा अनुभव म्हणजे २०१९ ला महाविकास आघाडीची बोलणी चालु होती. कॉंग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना यांची समीकरण तयार होती. सरकार स्थापन होणार होतं तेव्हा अजित पवार फुटणार ही बातमी मी ब्रेक केली होती. 

अजित पवार फुटणार हे मला सुत्रांकडून आधीच कळालं होतं. तेव्हा सगळ्यांना माझ्यावर विश्वासच नव्हतता, सगळे जण आश्चर्य व्यक्त करत होते. पण कसं असत एखादी बातमी तुम्ही ब्रेक केली तर त्याचे परिणाम लगेच दिसतील अस नाही काही बातम्या नंतर वादळ आणतात. त्यातलाचं हा प्रकार.. 

7) चंद्रकांत पाटील जेष्ठ पत्रकार 

मी गेल्या २०- २२ वर्षांत सूत्रांच्या माहितीवर कधीच बातम्या केल्या नाहीत. मी विश्वासहार्यता जपली आहे, बातमीचा खरेपणा महत्वाचा असतो.फक्त पत्रकारितेचे इथिक्स पाळायचं म्हणून सूत्राचं नाव सिक्रेट ठेवू शकता पण ऐकिव माहिती सूत्रांच्या नावावर खपवण चुकीचं आहे. आत्ता एकनाथ शिंदेंच्या पाठींब्याबाबत प्रत्येक चॅनेलचे आकडे वेगवेगळे आहेत म्हणजे कोणाची माहिती खरी मानायची ?

हल्ली सुत्रांच्या नावावर माहिती खपवण्याचा प्रयत्न असतो. आता विधीमंडळ चर्चेत आहे तर तिथला अधिकारी एखादा जो आपल्याशी कनेक्टेड असेल तर तो माहिती देतो पण त्याने दिलेली माहिती योग्य आहे का हे तपासावं लागल.

आजकाल सतत सुत्रांच्या आधारावर दिली जाते, प्रत्येकठिकाणी तेच वापरलं जात त्यामुळे पत्रतकारितेची विश्वासहार्यता धोक्यात आलीये. सोशल मिडीयावर लोक सूत्र कोण अशी खिल्ली उडवतात त्यामुळे कधीकधी एक पत्रकार म्हणून आपल्यालाही अस वाटत की आपण बातमी द्यावी की नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.