राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण आहेत ?

सुरत डिस्ट्रिक्ट कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आज २४ तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता राहुल गांधींची खासदारकी तर गेलीच आहे पण हा त्यांना ८ वर्षे संसदेत पाय देखील ठेवता येणार नसल्याचं म्हटलं जातंय. देशभर काँग्रेस पक्षाचे नेते ठिकठिकाणी भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत.

चर्चांमध्ये प्रश्न विचारला जातोय कि राहुल गांधींवर मानहानीचा खटला चालवणारे याचिकाकर्ते पूर्णेश मोदी कोण आहेत ? त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया. 

त्याआधी हे प्रकरण नक्की काय आहे ते बघायला लागेल ?

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकाच्या कोलारमध्ये प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत राहुल यांनी “सर्व चोरांची आडनावं मोदीच कशी असतात ?नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी ? असा सवाल वजा टीका केली होती.

तर हे प्रकरण सुरु झालं २०१९ मध्ये, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील प्रचार रॅलीत राहुल यांनी आपल्या भाषणात चोरांचे आडनाव मोदी असल्याचे म्हटले होते. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते, मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी.

मग गुजरातचे भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींनी मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल गांधींविरोधात तक्रार दाखल केली, आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये हे प्रकरण सुरत डिस्ट्रिक्ट कोर्टात खेचलं. 

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात “राहुल गांधींनी आमच्या समाजाला चोर म्हंटलंय, निवडणूक सभेत आमच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप पूर्वेश मोदींनी राहुल गांधींवर केला”. त्यामुळे मोदी आडनावाच्या लोकांचा अपमान झाला असं या याचिकेत म्हटलं होतं.

यावर, राहुल गांधीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, पूर्णेश मोदी या प्रकरणात पीडित पक्षकार म्हणून तक्रारदार असूच शकत नाहीत. कारण राहुल गांधींच्या बहुतेक भाषणांमध्ये पूर्णेश मोदींना नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं गेलं होतं. या प्रकरणाच्या ४ वेळा सुनावण्या सुरत डिस्ट्रिक्ट कोर्टात पार पडल्या. 

आणि काळ निकाल लागला. काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.

पण राहुल यांच्यावरील या कारवाईनंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे पूर्णेश मोदी हे देशभरात चर्चेत आले आहेत.

कोण आहेत पूर्णेश मोदी ?

तर त्यांचं पूर्ण नाव पूर्णेश कुमार ईश्वरलाल मोदी असं आहे. पूर्णेश मोदी हे गुजरातमधील सुरत पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे आमदार असून गुजरात सरकारमधील ते माजी कॅबिनेट मंत्री आहेत. 

पूर्णेश मोदी यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६५ रोजी सुरत येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव बीना बेन आहे. पूर्णेश यांनी बी.कॉम केलं आहे तसेच त्यांच्याकडे साऊथ गुजरातमधील सूरत येथील सर चौवासी लॉ कॉलेजची एलएलबीची डिग्री आहे. त्यांनी १९९२ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.

त्यांची राजकीय कारकीर्द पाहायची तर,

पूर्णेश मोदी २००० ते २००५ पर्यंत सुरत महापालिकेत नगरसेवक होते. याशिवाय त्यांनी २००९ ते २०१२ आणि २०१३ ते २०१६ मध्ये सुरत शहर भाजप अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. २०१३ मध्ये अडाजन विधानसभा पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदा आमदार बनले होते. 

२०१३ मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई व्यंकवाला यांचे आजारपणामुळे निधन झाले. या जागेवर  पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने पूर्णेश मोदी यांना तिकीट दिले होते. तेव्हा पूर्णेश मोदी प्रचंड मतांनी विजयी झाले होते. २०१६ ते २०१७ दरम्यान गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून काम केले.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्णेश मोदींना उमेदवारी दिली होती. मात्र त्या दरम्यान पूर्णेश मोदी त्यांच्या संपत्तीमुळे बरेच चर्चेत आले होते. 

२०१७ च्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरताना त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांचा पेशा दाखवला होता. तर त्यांची पत्नी गृहिणी असून उद्योगही सांभाळते असं नमूद करण्यात आलं होतं.असं असताना त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एक कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं सांगितलेलं. ज्यात १३ लाखांचं सोनं आणि चांदीचा समावेश होता. 

या निवडणुकीत पूर्णेश मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार इक्बाल दौद पटेल यांचा पराभव करत आमदारकी जिंकून आणली आणि सत्ता स्थापनेनंतर गुजरात सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते त्यांनी परिवहन, नगरविकास, पर्यटन आणि तीर्थ यात्रा विकास विभागाची जबाबदारी सांभाळलेली आहे. थोडक्यात हेच पूर्णेश मोदी आज राहुल गांधींची खासदारकी जाण्यास कारणीभूत ठरलेत. त्यामुळे भाजपसाठी पूर्णेश मोदी हिरो ठरलेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.