खरी अडचण तर किरीट सोमय्यांची झालीये…

महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा काळ सुखानं जाऊ न देण्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो किरीट सोमय्यांचा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतल्या कित्येक आमदारांवर आरोप केले. कित्येक आमदारांच्या विरोधात कागदपत्रं दाखल केली आणि कित्येक आमदारांच्या मागं चौकशीचा ससेमिराही लागला.

पुढं एकनाथ शिंदेंनी बंड केलं, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सोमय्यांनी आरोप केलेले काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात सत्तेत सहभागी झाले. साहजिकच सोमय्यांची या नेत्यांवर होणारी टीका थांबली…

मग त्यांनी लक्ष्य केलं, हसन मुश्रीफ, अजित पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांना. पण या नेत्यांनी आता भाजपसोबत मंत्रीपदाची शपथ घेतलीये. सोमय्यांनी आरोप केलेले कुठले नेते आता त्यांच्याच सोबत सत्तेत आहेत ? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

सुरुवात करु नव्यानं शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांपासून.

यात पहिलं नाव येतं – नव्यानं शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार

जरंडेश्वर कारखाना खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका सोमय्यांनी अजित पवारांवर ठेवला होता. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना आर्थर रोड तुरुंगाची हवा खायला लागेल, असं वक्तव्यही सोमय्यांनी केलेलं. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली, तर जरंडेश्वर कारखान्यावर ईडीनं टाच आणल्याची बातमी जुलै २०२१ मध्ये आली होती. तर ऑक्टोबर २०२१ ईडीनं अजित पवारांच्या निकटवर्तियांवर छापे मारल्याची बातमीही आली होती. मात्र आता याच अजित पवारांच्या नेतृत्वात सोमय्यांना काम करावं लागणार आहे.  

दुसरं नाव येतं – छगन भुजबळ

 मुंबईच्या सांताक्रूझ भागात ९ मजल्यांची इमारत आहे, तिथं सगळं भुजबळ कुटुंब राहतं, त्यांचा या बिल्डिंगशी काय संबंध ? असे आरोप सोमय्यांनी केले होते. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातही सोमय्यांनीच भुजबळांवर आरोप केले होते. सोमय्यांनी आरोप केलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळ यांना अटक झाली होती, त्यानंतर दोन वर्ष ते अटकेत होते, मात्र न्यायालयानं या प्रकरणात भुजबळ निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर भुजबळ महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले आणि आता अजित पवारांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्येही मंत्री आहेत.

तिसरं नाव येतं – हसन मुश्रीफ

मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबानं १२७ कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केले, अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे ? असं सोमय्या आपल्या आरोपांमध्ये म्हणाले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरावर ईडीचे छापे पडले. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. पण मुश्रीफांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

शपथ घेतली नसली तरी आणखी एक नाव चर्चेत येतं – प्रफुल्ल पटेल

सोमय्यांनी प्रफुल्ल पटेलांवर ऊर्जा घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यानंतर पटेलांची ईडी चौकशी तर झालीच पण सोबतच त्यांच्या राहत्या घरावरच ईडीनं जप्तीची कारवाई केली. मात्र आता तेही अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.    

यानंतर बघू एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत आणि पर्यायानं सत्तेत असलेल्या नेत्यांपैकी कुणा कुणावर सोमय्या यांनी आरोप केले होते ?                           

यात पहिलं नाव येतं – प्रताप सरनाईक

 सोमय्यांनी सरनाईक यांच्यावर २५० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची चौकशीही झाली होती आणि छापेमारीही. पण प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानं सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला.

दुसरं नाव येतं – यामिनी जाधव आणि यशवंत जाधव 

यामिनी जाधव या एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदार, तर त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष. सोमय्या यांनी आरोप केले होते, की जाधव दाम्पत्याच्या संपत्तीत अपारदर्शक आवक, हवाला व्यवहार आणि परदेशी कंपन्यांसोबत संशयास्पद व्यवहार आहेत. त्यानंतर  यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांची प्राप्तिकर विभागानं चौकशी केल्याची अखेरची बातमी मार्च २०२२ आली होती, तर ईडीनं यशवंत जाधव यांना समन्स पाठवल्याची बातमी मे २०२२ मध्ये माध्यमांनी दिली होती.

तिसरं नाव येतं – खासदार भावना गवळी 

गवळी यांनी आपल्या खासदारकीच्या काळात १०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप करत सोमय्यांनी भावना गवळी यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागात तक्रारही दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर भावना गवळी यांना ईडीनं तीनदा समन्स पाठवलं होतं, त्यांचा निकटवर्तिय सईद खानला ईडीकडून अटकही करण्यात आली होती, मात्र जुलै २०२२ मध्ये सईद खान यांना जामीन मिळाल्यानंतर भावना गवळींना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरु झाली. 

चौथं नाव – आनंदराव अडसूळ

अडसूळ यांनी सिटी सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा आरोप करत ईडी आणि आरबीआयकडे त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. आनंदराव अडसूळ यांच्या घर आणि कार्यालयावर छापा पडल्याची शेवटची बातमी सप्टेंबर २०२१ मध्ये आली होती.

पाचवं नाव – अर्जुन खोतकर 

खोतकर यांनी १०० कोटींचा घोटाळा करत, हजार कोटींची जमीन बळकावल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. नोव्हेंबर २०२१ आणि जून २०२२ मध्ये ईडीनं त्यांच्या मालमत्तेवर छापे मारत कारवाई केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात शिंदे गटात प्रवेश केल्यावर. प्रवेशामागचं कारण ईडीच्या चौकशीचा तणाव आहे का ? या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं होतं. 

हे झालं अजित पवार गट आणि शिंदे गटाचं, पण नारायण राणे, बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित आणि कृपाशंकर सिंग हे चार नेते असे आहेत, ज्यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले होते, पण हे नेते आता भाजपमध्येआहेत. यातले विजयकुमार गावित राज्यात मंत्री आहेत, तर नारायण राणे केंद्रात.

त्यामुळं अजित पवार गटातले ४, शिंदे गटातले ५ आणि भाजपमधले ४ अशा एकूण १३ जणांच्या सोबत सोमय्यांना काम करावं लागणार आहे. अजित पवार गटातल्या नेत्यांशी सोमय्या कसं जुळवून घेतात, आरोपांच्या फैरी झाडणार की दोस्तीचा हात पुढे करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.