सिद्धूचा पराभव : चवन्नी उठाने के चक्कर में, ‘बॅट्समन आऊट’….!

‘चवन्नी उठाने के लिए आगे बुला लिया, और बॅट्समन उसी चक्कर में आऊट,’

साध्या भाषेत सांगायचं झालं, तर बॅट्समन स्टम्पिंग आऊट झालाय. बॉलरनं त्याला चकवलंय. पण इतकी साधी गोष्ट थराराचा तडका मारुन एकच माणूस सांगू शकतो, तो म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू.

सिद्धूला बॅटिंग करताना न पाहिलेले कार्यकर्ते त्याच्यावर कमेंटेटर म्हणून प्रेम करतात, ज्यांनी बॅटिंग करताना पाहिलं ते सिक्सर किंग म्हणून प्रेम करतात आणि क्रिकेट न आवडणाऱ्या भिडूंना कॉमेडी शोचा जज म्हणून का होईना पण सिद्धू आवडतोच.

राजकारणी सिद्धूची गणितं मात्र वेगळीच आहेत…

आता झालंय असं, की सिद्धूच्या मनात पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत थाटात बसायची स्वप्नं होती, ती खुर्ची मिळवण्यासाठी सिद्धूनं लय गुगल्या टाकल्या आणि फिल्डिंग लावली, पण तिथं सिद्धू झाला बोल्ड. केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं पंजाब जवळपास जिंकल्यात जमा आहे, काँग्रेस आपच्या पुढं टिकली नाहीच…

पण सिक्सर किंग सिद्धू आपल्या होम ग्राऊंडवरच शून्यावर बोल्ड झाला. अमृतसर पूर्व मतदार संघामधून सिद्धू ६ हजार ७५० मतांनी पराभूत झाला. आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर यांनी तिथून विजय मिळवला.

सिद्धूच्या पराभवानंतर सगळ्यात आधी आठवण कुणाची आली असेल, तर वकार युनूसची.

नाय नाय भिडू, वकार युनूसचा पंजाबच्या राजकारणाशी काय संबंध नाही, पण वकारनं १९९० मध्ये जे सिद्धू सोबत केलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती आता राजकारणाच्या मैदानात झालीये… यावेळी बॉलर आहे स्वतः सिद्धू.

१९९० मध्ये असं काय झालं होतं?

तुम्ही कपिल शर्मा शो पाहत असाल, तर तुम्हाला हा किस्सा फिक्स माहीत असणार. कारण कपिल शर्मानं सिद्धूला या एकाच गोष्टीवरून लई सतावलंय. जरा कुठं चान्स मिळाला की, कपिल सिद्धूला १९९० च्या मॅचची आठवण करुन द्यायचा. आपल्या क्रशसमोर इज्जत निघाल्यावर पोरं जशी उचकतात, सिद्धूचं पण अगदी सेम व्हायचं. कारण किस्साच तसा होता…

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कपची मॅच आणि शारजाचं जगप्रसिद्ध मैदान. पहिली बॅटिंग करताना पाकिस्ताननं २३५ रन्स केले. भारतासाठी आव्हान अवघड होतं खरं, पण वाटलेलं जिंकतील. ओपनिंगच्या जोडीनं ६१ रन्स केलेले, तेवढ्यात मनोज प्रभाकर रनआऊट झाला आणि क्रीझवर आला नवज्योतसिंग सिद्धू. सिक्सर किंग सिद्धूकडून भारतीय चाहत्यांच्या मजबूत अपेक्षा होत्या, शारजाचं ग्राऊंड तसं हाणामारी करायला बरं असतंय त्यामुळं सिद्धू ‘वन मॅन शो’ मॅच काढून देऊ शकत होता.

बॉलिंगला होता, वकार युनूस.

पहिलाच बॉल असला भारी इनस्विंग झाला… की सिद्धूच्या बत्त्या आणि स्टम्प्सवरच्या बेल्स एकदमच गुल झाल्या. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये सिद्धू शून्यावर बोल्ड. त्याच्या त्या विकेटमुळं वकारला बूस्टर मिळाला आणि त्यानं भारताच्या आणखी तीन विकेट्स खोलल्या. भारतानं मॅच २६ रन्सनं हरली. पराभवापेक्षा जास्त लक्षात काय राहिलं असेल.. तर सिद्धूचा बोल्ड.

त्या बोल्डची आठवण कपिल शर्मा तर करुन द्यायचाच, पण आता निवडणुकीत झालेला पराभवही सिद्धूला या शून्यावर विकेटची आठवण करुन देईल. 

यामागचं कारण काय..?

तर २०१७ मध्ये सिद्धूनं भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अमृतसरमधून जिंकलाही. २०१९ मध्ये काँग्रेसनं सिद्धूला मंत्रीपदही दिलं. मात्र लोकसभा निवडणुकांच्या वेळी, सिद्धूनं तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात जाणारी वक्तव्य केली, जागावाटपातही आग्रहानं जागा मागून घेतल्या.

निवडणुकांनंतर झालेल्या मंत्रीमंडळ फेरबदलात सिद्धूला जागा मिळाली नाही. पुढं या दोघांमधले वाद वाढत गेले, सिद्धूची मर्जी राखण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं त्याला पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. पुढं अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा सिक्सर किंग सिद्धूच्या डोळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाची ट्रॉफी आली.

पण ती ट्रॉफी उंचावली, चरणजीत सिंग चन्नी यांनी.

सिद्धूनं आधी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि नंतर तो परत घेतला. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कधी केजरीवालांचं कौतुक केलं, तर कधी त्यांच्यावर टीका केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधीला लावलेली हजेरीही गाजली. काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जेव्हा चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव जाहीर झालं, तेव्हाही सिद्धूची नाराजी लपली नाही.

आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर कुरघोडीचे प्रयत्न, मुरलीधरन किंवा शेन वॉर्नची स्पिन बॉलिंग वाटावी अशी बदलती भूमिका आणि एवढ्या सगळ्या लडतरी करुन सिद्धूच्या पदरी पराभव पडला.

शारजाचं ग्राऊंड आहे, आपण दणकट स्कोअर करु असं म्हणून सिद्धू १९९० मध्ये मैदानात उतरला होता, अमृतसर पूर्वही त्याच्यासाठी होम ग्राऊंड होतं… पण तिथं वकार युनूसचा यॉर्कर आणि इथं जनतेनं मतपेटीतून दिलेला आहेर…

सिद्धूला आऊट करुन गेला. सिद्धूच्या विकेटचं झालं, तसं त्याच्या पराभवाचं ही विश्लेषण होणार आणि, ‘चवन्नी उठाने के लिए आगे बुला लिया, और बॅट्समन उसी चक्कर में आऊट’ हे वाक्य आठवल्याशिवाय राहणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.