बापाच्या डोळ्यातल्या अश्रुंनी त्याला सिक्सरसिंग सिद्धू बनवलं !

सिद्धूच्या वडीलांचं नाव सरदार भगवानसिंग. ते पंजाब राज्याचे अॅडव्होकेट जनरल होते. एकेकाळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाय पतियालाचे मोठे वकील म्हणून त्यांची ख्याती होती. पतियाळामध्ये त्याचं घर म्हणजे एक मोठी हवेली होती. भरपूर नोकर चाकर असायचे. राजेशाही थाट होता.

अंगापिंडाने धिप्पाड असे हे सरदारजी त्यांना क्रिकेटचा खूप शौक होता. कधीकाळी कॉलेजमध्ये असताना ते थोडफार क्रिकेट खेळले होते. त्यांची इच्छा होती आपलं अधूर राहिलेलं स्वप्न आपला मुलगा नवज्योतसिंग पूर्ण करेल.

नवज्योतसिंग सिद्धू तेव्हा तेरा चौदा वर्षाचा होता. त्याला घरात लाडान शेरी म्हटल जायचं.या शेरीला मात्र क्रिकेटची एवढी आवड नव्हती. पुस्तके वाचणे, सिनेमा बघणे याची त्याला भरपूर आवड होती. पण वडिलाना घाबरून तो क्रिकेट मैदानावर सरावाला जायचा. त्याचे वडील आपल्या काटेकोर वेळापत्रकातून वेळ काढून त्याचा खेळ बघायला ग्राउंड वर हजर असायचे.

भगवानसिंग आपल्या पोराला रोज पहाटे ४ वाजता जॉगिंगला जाण्यासाठी उठवायचे. नवज्योत उठायचा वडिलांच्या शूज वगैरे घालून तयार व्हायचा पण ते झोपी गेले की हळूच दुसऱ्या खोलीत जाऊन झोपून जायचा. त्याने आपल्या एका नोकराला दर आठवड्याला वीस रुपये देऊन सांगितले होते की वडील उठले की मला सुद्धा उठवायचं. भगवानसिंग उठले की नवज्योत अंगावर पाणी वगैरे शिंपडून घामेघूम झाल्याचं नाटक करत आज किती राउंड मारले याचे वर्णन करायचा. बिचाऱ्या भगवानसिंगना वाटायचं आपल पोरग किती मेहनत करतंय.

भारताचा सर्वश्रेष्ठ जलदगती गोलंदाज कपिल देवने त्यांचा एक किस्सा सांगितला आहे.

कपिल तेव्हा सतरा अठरा वर्षाचा होता. हरियानाकडून रणजी सामने खेळत होता. बऱ्याचदा स्थानिक सामने खेळण्यासाठी त्यांची टीम पतियाळाला जायची. त्यावेळी पतियाळामध्ये आलेल्या या टीमला सरदार भगवानसिंग घरी पाहुणचाराला बोलवायचे. तिथे गेल्यावर भगवानसिंग यांचा मोठा दरारा असल्यामुळे सगळे थोडे घाबरून असायचे.

कपिलच्या एका सिनियरनी त्यांना सिद्धूच्या घरात चांगला पाहुणचार हवा असेल तर एक सिक्रेट सांगितलं होत. तिथे गेल्यावर नवज्योतसिंग खूप कौतुक करायचं. कपिल आणि टीम हा सल्ला व्यवस्थित पाळायची.

 “सर आपका शेरी बहुत बढीया बॅटिंग करता है. उसका खेल बहुतही लाजवाब है. “

जस जस हे खेळाडू कौतुक करायचे भगवानसिंग एकदम खुलत जायचे. ते आपल्या नोकरांना ड्रिंक लाओ ,बटरचिकन लाओ वगैरे ऑर्डर द्यायचे. पूर्ण टीमची चंगळ असायची. कपिल देव म्हणतात आज इतकी बडबड करणारा नवज्योतसिंग सिद्धूचा आवाजही आम्ही कधी ऐकला नव्हता. तो थोडीफार बरी क्रिकेट खेळायचा पण कधीही बघेन तेव्हा घरातल्या एखाद्या कोपर्यात पुस्तक वाचत बसलेला दिसायचा.

तो कधीच आपल्या खेळासाठी सिरीयस नसायचा. फक्त आणि फक्त वडिलांची इच्छा होती म्हणून तो क्रिकेट खेळत होता. त्यांनी करून घेतलेल्या मेहनतीचा परिणाम म्हणजे त्याने पंजाब टीमकडून फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करायला सुरवात केली. 

१९८३ साली जगात एक नंबरला असलेली वेस्ट इंडीज टीम भारत दौऱ्यावर आली होती. एका सराव सामन्यात सिद्धूने त्यांच्याविरुद्ध शतक ठोकले.

त्या सामन्यातली सिद्धूची फलंदाजी बघून निवडसमितीने त्याला राष्ट्रीय संघात निवडले. कपिल देव तेव्हा भारताचे कॅप्टन होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये दिलीप वेंगसरकर जखमी झाल्यावर त्यांच्या जागी सिद्धुला संधी मिळाली. यावेळी मात्र सिद्धूला माल्कम मार्शल, होल्डिंग यांची फास्ट बॉलिंग खेळणे झेपलेच नाही. तब्बल दीड तास खेळून त्याने फक्त वीस धावा बनवल्या. तो जेव्हा आउट झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचा हुर्यो उडवला.

कपिल मुळेच त्याला आणखी एका सामन्यात संधी मिळाली पण त्यातही तो काही करू शकला नाही. त्यानंतर मात्र सिद्धूला टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

सिद्धू पतियाळाला आपल्या घरी आला. घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दिसलं की आभाळा एवढा मोठा आपला बाप रडतोय. त्याने आयुष्यात कधीही आपल्या वडिलाना रडताना पाहिलं नव्हत. त्याला कळेना नेमकं काय झालय पण त्यांना विचारायचं धाडस त्याला झालं नाही. अंघोळ वगैरे आवरून तो नाश्त्याला टेबलवर आला . तेव्हा आपल्या नोकरांना त्यान काय झालं होत ते विचारलं. त्यांनी त्याच्या हातात त्या दिवशीचा वर्तमानपत्र दिला. त्याची हेडलाईन होती,

“Sidhu: The Strokeless Wonder.”

सुप्रसिद्ध क्रिकेटस्तंभलेखक रंजन बाला यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रात लिहिलेला तो लेख होता. त्यात सिद्धूच्या बॅटिंगवर जोरदार टीका करण्यात आली होती. हा लेख वाचून नवज्योतच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. हे अश्रू आपल्याला कोणी काही म्हणल यापेक्षाही आपल्यामुळे वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागली याचं होत.

 त्या दिवशी नवज्योतसिंग सिद्धूचा क्रिकेटर म्हणून नवा जन्म झाला. 

त्याने तो लेख कापून आपल्या कपाटात लावून ठेवला. तिथून एकदिवस ही त्याने पहाटे ४ वाजताची दौड चुकवली नाही. दिवसभर तो फक्त आणि फक्त क्रिकेट खेळू लागला. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्याला झोपू देत नव्हते. सिनेमा, पार्टी, मुली हा त्याच्यासाठी इतिहास झाला होता. एकेका दिवसात त्याने तीनशे सिक्स मारले होते. यामुळेच त्याला सिक्सर सिद्धू म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे चार वर्षांनी म्हणजेच १९८७ सालच्या वर्ल्ड कप मध्ये त्याला परत भारतीय संघात बोलवण्यात आले होते. यावेळीही कपिल देव भारताचे कप्तान होते. सिद्धू आपल्या वडिलांच्या अश्रूंचा बदला घेण्यासाठी खेळला. पदार्पणातच त्याने सलग चार अर्धशतके ठोकली. पूर्ण सिरीज मध्ये त्याने २९ सिक्सर तडकवले.हा आजही एक रेकॉर्ड आहे.

दुर्दैवाने आपल्या पोराचे हे यश बघायला सरदार भगवानसिंग सिद्धू या जगात नव्हते.

वर्ल्ड कप नंतर भारतीय टीम एका सिरीजसाठी दुबईला निघाली होती. विमानात बसल्यावर अचानक रवी शास्त्री सिद्धू जवळ आला आणि त्याने त्याच्या अंगावर एक वर्तमानपत्र फेकला. सिद्धूने प्रश्नार्थक नजरेने त्याच्या कडे पहिले. रवी शास्त्री त्याला म्हणाला वाच!

राजन बालानी सिद्धू बद्दल नवीन लेख लिहिला होता. त्याचे टायटल होते.

“Sidhu: From Strokeless Wonder To A Palm-Grove Hitter’”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.