वि.स.पागेंची वीस कलमी योजना इंदिरा गांधींनी स्वत:च्या नावाने जाहीर केली.

इंदिरा गांधीजींच्या नावाने जी वीस कलमे सांगितली जातात ती देखील वि.स.पागे यांचीच होती. इंदिराबाईंनी पागे यांच्याकडून शब्द घेतला होता की ही गोष्ट बाहेर सांगू नये.

वि.स. पागे हे नाव सांगितल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट आठवते. MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांना वि.स.पागे हे नाव ऐकल्यानंतर रोजगार हमी योजनेचे जनक ही गोष्ट आठवेल. महाराष्ट्रातील तासगाव तालुक्यात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. काही काळानंतर ती राज्याने आणि त्यानंतर देशाने ती स्वीकारली.

विरोधी विचारसणीचे सरकार आले आणि गेले मात्र रोजगार हमी योजना बंद करण्याचं धाडस कोणीच करु शकलं नाही. याच कारण या योजनेच्या उद्देशात होतं.

वि.स. पागे यांच्या विचारातून या योजनेची सुरवात झाली. वि.स. पागे हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बागणीचे. त्यांच प्राथमिक शिक्षण तासगावला झाले. ते सातवीच्या परिक्षेत पहिले आले होते.

पुढे संस्कृतमधून बी.ए. झाले. १९२९ साली देशात यूथ लीगची चळवळ सुरू होती त्या चळवळीत ते विद्यार्थी नेते होते. त्यांनीच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयावर तिरंगा फडकवला होता.

१९३० सालचा जंगल सत्याग्रह, ३१ चा मिठाचा सत्याग्रहात त्यांनी महत्वाची जबाबदारी संभाळली होती. पुढे ते वकिल झाले व कराडमध्ये वकिली करू लागले.

भारताच्या स्वातंत्रचळवळीचे ते खंदे कार्यकर्ते झाले. स्वातंत्र्यानंतर १९५२ पासून ते विधानपरिषदेचे सदस्य झाले तर महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर १९६० ते १९७८ पर्यन्त ते विधानपरिषदेचे सभापती होते. नंतरच्या काळात १९७९ ते ९० दरम्यान ते रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष राहिले.

अशा या माणसाला सत्तेपेक्षा गरिब माणसांच दुख: दूर करण्यात जास्त इंटरेस्ट होता.  

त्यांनी आपल्या मुळ गावातील, बागणीतील २१ एकर जमीन कसणाऱ्या कुळांच्या नावे केली. एक रुपया मानधनावर ते कार्यरत राहिले. राहते घर त्यांनी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून दिले.

याच माणसाने गरिबी नष्ट करण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली.

मात्र इंदिरा गांधीजींच्या नावाने जी वीस कलमे सांगितली जातात ती देखील वि.स.पागे यांचीच होती. इंदिराबाईंनी पागे यांच्याकडून शब्द घेतला होता की ही गोष्ट बाहेर सांगू नये.

मात्र यशवंतराव चव्हाणांचे सहकारी व वि.स. पागे यांचे भाच्चे वसंतराव वराडकर यांना वि.स.पागे यांनी हा किस्सा सांगितला होता. वसंतराव वराडकर यांनी आपल्या एका लेखात हा किस्सा सांगितला आहे,

ते सांगतात,

पागेसाहेब जात्याचं बुद्धीमान. विकासाच्या अनेक नवनवीन योजना ते तयार करायचे. एक दिवस इंदिराबाईंनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव  नाईक या सगळ्यांना विचारलं की, महाराष्ट्राच्या या विकासाच्या योजना कोण तयार करत?

सर्वांनी पागेसाहेबांच नाव घेतलं. बाई म्हणाल्या,

मला पागेसाहेबांना भेटायचं आहे.

पी.एन. हक्सर हे बाईंचे सेक्रेटरी होते. त्यांचा पागेसाहेबांना फोन आला. इंदिरा गांधींनी तुम्हाला ताबडतोब दिल्लीला बोलावलं आहे. ते ज्या जोशात बोलले ते पागेसाहेबांना आवडलं नाही. तेव्हा पागेसाहेब म्हणाले, मला यायला सवड नाही.

निरोप ऐकून इंदिरा गांधी थोड्या चपापल्या. मग त्यांनी स्वत: फोन केला. पागेसाहेब तुम्ही माझ्या त्रिमुर्ती बंगल्यावर उद्या दुपारी तीन वाजता येवू शकाल का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.

ठरल्याप्रमाणे पागेसाहेब दिल्लीला गेले. दारात इंदिराजी स्वागताला उभ्या होत्या. पागेसाहेबांना लाजल्यासारखं झालं. इंदिरा गांधी पुढे आल्या आणि म्हणाल्या, मी पंतप्रधान आहे हे विसरा, आत्ता तुम्ही माझे गुरू आहात.

इंदिरा गांधी पागे साहेबांना म्हणाल्या,

मी तुम्हाला एवढ्यासाठी करता बोलावलं आहे की, महाराष्ट्राच्या योजना मुला तुमच्याकडून समजून घ्यायच्या आहेत. मी तुमच्यासमोर बसून सर्व योजना कागदावर उतरून घेणार आहे.

ठरल्याप्रमाणे पागेसाहेब योजना सांगू लागले आणि इंदिरा गांधी त्या योजना कागदावर उतरून घेवू लागल्या. अडीच तास पागे साहेब बोलत होते आणि इंदिरा गांधी स्वत: कागदावर उतरून घेत होत्या.

त्यानंतर त्या म्हणाल्या, पागेसाहेब तुम्ही जी आज वीस कलमं मला सांगितली ती मी माझ्या नावावर जाहीर करणार आहे. याबाबत तुम्ही कुठेही वाच्यता करायची नाही. हा माझा पुढचा वीस कलमी कार्यक्रम असणार आहे..

त्यावर पागेसाहेब म्हणाले,

माझ्या जीवनात याच्या इतकं भाग्य नाही.

हे ही वाच भिडू.