दाभोलकरांशी जोरदार वाद सुरु होते तरीही त्यांनी साधनाला कोटींचा निधी मिळवून दिला

कै. विलासराव देशमुख यांची ओळख म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणी. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. गावच्या सरपंचपदापासून सुरु करून ते मुख्यमंत्री बनण्यापर्यंत त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. अशा पदांवर काम करताना अनेक कसोटीचे प्रसंग नेहमी येत असतात. पण विलासराव त्यांना हसतमुखाने सामोरे जायचे,

म्हणूनच कधीही त्यांचं नाव कोणत्या चुकीच्या गोष्टीत अडकलं नाही. राजकारण म्हटलं कि वाद हे आलेच. त्यांचा वाद थेट नरेंद्र दाभोलकर यांच्याशी गाजला होता.

झालं असं होतं कि विलासराव सत्य साईबाबांचे परमभक्त होते. बाबांच्या चमत्कारावर त्यांची श्रद्धा होती. सत्य साईबाबा लातूर जिल्ह्यात येणार होते, त्या विरोधात लातूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी चळवळ उभारली होती. ताण निर्माण झाला होता.

सत्य साईबाबा येण्याच्या आधी दोन दिवस लातूर नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांतील समितीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विलासरावांच्या उपस्थितीत बाबांचा कार्यक्रम झोकात पार पडला. मोकळ्या हातातून (हवेतून) सोन्याची साखळी काढून त्यांनी विलासरावांना व त्यांचे बंधू दिलीपराव यांना दिली.

यानंतर काही दिवसांची गोष्ट. महाराष्ट्र शासनाचे नरेंद्र दाभोलकर यांना पत्र आले की, तुमच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकाला शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार लाभला आहे, तो मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी त्यांनी मुंबईला यावे. याबाबत दाभोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.  त्यात त्यांनी लिहिलेलं, 

“विधानसभेचे अधिवेशन चालू असताना आपले सत्य साईबाबांच्या भेटीला जाणे, त्यांच्या पाया पडणे, रिकामा हात हवेत फिरवून त्यांनी आपल्याला दिलेल्या सोन्याच्या साखळीला जादूच्या चिल्लर चमत्काराऐवजी दैवी कृपाप्रसादाचा आविष्कार मानणे, आणि याबाबत शांततापूर्ण विरोध नोंदवण्याची इच्छा असलेल्या लातूर जिल्ह्यातील माझ्या सहकाऱ्यांना व आपल्या मतदारांना आधीच अटक करणे, या सर्व बाबी उघडपणे अंधश्रद्धेचे समर्थन करणाऱ्या आहेत.

अशा वेळी आपल्या हातून पुरस्कार स्वीकारणे म्हणजे पुस्तकात व्यक्त केलेल्या विचारासोबत प्रतारणा ठरेल असे मला वाटते. या नकारामुळे माझा पुरस्कार रद्द करण्यात आल्यास त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. मात्र बुवाबाजी व चमत्कार विरोधी स्पष्ट भूमिका आपण घेतल्यास त्यानंतर आपल्या हातून पुरस्कार स्वीकारण्यास मला आनंदच होईल.

स्पष्ट लिहिल्याबद्दल माफ करावे,

आपला

नरेंद्र दाभोलकर”

इतकं खरमरीत पत्र लिहिल्यावर विलासराव देशमुख यांची आपल्यावर मोठी नाराजी ओढवेल हे दाभोलकरांना ठाऊक होतं. अशातच विलासरावांच्या समवेत वाद वाढावयास आणखी एक कारण घडले. १९९९ साली ते मुख्यमंत्री असतानाच शासनाने किमानसमान कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात एक कलम होते-

एक वर्षाच्या आत, शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात कायदा करण्याचे.

मात्र १३ मार्च २००५ रोजी त्याचे विधेयक विधानसभेत मांडण्यासाठी त्या वेळचे सामाजिक न्यायमंत्री ना.चंद्रकांत हांडोरे उभे राहिले आणि एक अभूतपूर्व गोष्ट घडली. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या आमदारांनीच कायद्याला कडाडून विरोध केला व विधानसभेत विलासराव उपस्थित असूनही त्यांनी मौन धारण केले.

या सर्व लढ्यात नरेंद्र दाभोलकर यांचे विलासरावांबरोबर असलेले संबंध ताणले जाणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत साधना साप्ताहिकाच्या हीरकमहोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपये द्यावेत या मागणीसाठी ग.प्र.प्रधान सर, सदानंद वर्दे सर, किशोर पवार व दाभोलकर यांनी विलासरावांची भेट घेतली.  दाभोलकरांना अपेक्षा नव्हती पण विलासराव देशमुखांनी दिलखुलास आश्वासन दिले की 

‘साधनासारख्या साप्ताहिकाला मदत करायची नाही तर माझे शासन काय कामाचे!’ 

साधना च्या वतीने आणलेल्या विनंती पत्रावर त्यांनी ताबडतोब लेखी शेरा मारला. पुढे हा निधी मिळायला मंत्रालयातील लालफीतशाही मुले बराच उशीर झाला. दाभोलकरांनी केलेल्या अनेक प्रयत्नामुळे पहिल्यांदा ५१ लाखांचा निधी तोही दोन टप्प्यात मिळाला.

साधनाच्या हीरकमहोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुणे येथे आल्या होत्या. स्वाभाविकच त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री होते. दाभोलकरांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी , मुख्यमंत्र्यांना हीरकमहोत्सवासाठी आम्ही एक कोटी रुपये मागितले होते पण फक्त ५१ लाखचं मिळाले असल्याची आठवण केली. 

त्यांच्यानंतर लगेचच मुख्यमंत्री विलासराव बोलले. ते म्हणाले,

 ‘दाभोलकर म्हणाले ते बरोबर आहे, तुम्हा लोकांना मागायचे कसे हे माहीत नाही हे खरे आहे. पण नियमाला अपवाद असतात आणि साधना हा अपवाद आहे. साधनाला मिळालेली रक्कम पहिल्या टप्प्यातील आहे, दुसरा टप्पा येणे अद्याप बाकी आहे.

त्या कार्यक्रमानंतर अवघ्या दीड महिन्यातच विलासरावांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. परंतु त्यांनी मूळ पत्रावर केलेली एक कोटीची शिफारस आणि राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमातील वरील संवादाचे वृत्तपत्रीय कात्रण या आधारे दाभोलकरांनी किल्ला लढवला आणि पुन्हा वर्ष-सव्वावर्षानंतर उरलेली रक्कम साधनाला मिळाली.

दाभोलकर म्हणतात,

विलासरावांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांची व माझी कधीही भेट झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात एक कोटी रुपये जमा झाल्याचे आभार समोरासमोर मानता आले नाहीत.

यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत राजकारणी होते. विलासराव देशमुख यांनीही हा संस्कार अंगीकारला होता. याचा अर्थ एवढाच की राजकारणाच्या रणधुमाळीत ते पक्के राजकारणीच होते, पण त्याच्या पलीकडे समाजजीवनाचा एक मोठा परीघ आहे याची त्यांना जाणीव होती. राजकीय हितसंबंधांचा थेट टकराव या क्षेत्रात नाही, ही प्रगल्भता होती. या क्षेत्रात आपल्या सत्तास्थानामुळे काही भले घडत असेल (आणि आपल्या सत्तेच्या राजकारणाला त्याचा धक्का लागणार नसेल) तर ते घडू द्यावे अशी त्यांची धारणा होती. आणि आपल्या कृतीतून त्यांनी राजकारणातील सुसंस्कृतपणाचा चांगला अनुभव दिला.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.