रिषभ स्टार आहे हे माहिती नसतानाही ड्रायव्हर-कंडक्टरच्या जोडीने केली मदत.

भारतीय क्रिकेट टीममधला स्टार खेळाडू रिषभ पंतचा काल सकाळी दिल्ली-देहराडून हायवे वर अपघात झाला. हा अपघात अतिशय भीषण होता. म्हणजे अक्षरश: त्याची ती महागडी आणि सेफ्टी फीचर्सने भरलेली गाडी थेट जळून खाक झाली.

पण, रिषभ मात्र सुदैवानं आणि दोन देवदुतांमुळे वाचला.

ते दोघं जण कोण होते तर, त्यांची नावं सुशील कुमार आणि परमजीत अशी आहेत. हे दोघंही हरियाणा राज्याच्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजेच हरियाणा रोडवेजमध्ये काम करतात. सुशील कुमार हे ड्रायव्हर आहेत तर, परमजीत हे कंडक्टर आहेत.

हे दोघंही त्यादिवशी ड्युटीवरच होते. हरीद्वार मधून बस घेऊन  ते जात होते. त्यावेळी ही घटना घडली आणि ते दोघंही गाडीतल्या जखमीला मदत करण्यासाठी धावून गेले.

नेमकी घटना काय घडली?

बसचे ड्रायव्हर असलेले सुशील कुमार यांनी बस चालवत असताना दुसऱ्या दिशेने एक महागडी येताना पाहिली. ही गाडी अतिशय भरधाव वेगात होती आणि सुशील कुमार यांच्या लक्षात आलं की, त्या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटलाय. बघता बघता त्या गाडीने डिव्हायडरला ठोकर दिली आणि गाडी कोलांट्या खाऊ लागली.

आता ही गाडी अश्याच कोलांट्या खात खात बस खाली येईल असं सुशील कुमार यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लगेच बसचा ब्रेक दाबला आणि बस रस्त्याच्या कडेला लावली. त्या गाडीकडे बघितल्यावर गाडीतल्या ड्रायव्हरचा चेहरा हा खिडकीतून बाहेर आलेला दिसला तो ड्रायव्हर गाडीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.

क्षणार्धाचाही विचार न करता ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही त्या अपघात झालेल्या गाडीकडे धावले. त्या गाडीत बघितलं तर, खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि रक्ताने माखलेल्या ड्रायव्हरशिवाय इतर कुणीही नव्हतं. त्यांनी त्या ड्रायव्हरला खेचून बाहेर काढलं आणि गाडीपासून थोडं दूर घेऊन गेले. त्याला बाहेर काढलं आणि लगेच गाडीने पेट घेतला. त्यामुळं, तो वेळेत गाडीतून बाहेर निघाला नसता तर जे व्हायला नको ते झालं असतं. त्या माणसाला थोडं भान आलं आणि त्याने स्वत:ची ओळख करून दिली. तो म्हणाला,

“मी रिषभ पंत, क्रिकेटर आहे.”

त्यानंतर रिषभने त्या दोघांना एक फोन लावायची विनंती केली. त्याने तो फोन स्वत:च्या आईला लावायला सांगितलेला. या दोघांपैकी एकाने फोन लावला सुद्धा पण त्याच्या आईचा फोन बंद आला.

त्यानंतर मग आणखी काही स्थानिक नागरिक आले. स्थानिकांच्या मदतीनं मग अँब्युलन्स बोलवून रिषभ पंतला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

आता ही घटना अशी झाली होती. त्यानंतर मग सुशील कुमार आणि परमजीत हे दोघंही बस घेऊन त्यांच्या मार्गानं निघाले.

या घटनेनंतर पाणीपत डेपोमध्ये हे दोघं गेले त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्टिफिकेट आणि ट्रॉफी दिली. पण, खास भाग हा आहे की, सुशील कुमार यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की,

“आम्ही ज्याला मदत केली तो इतका मोठा माणूस आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही क्रिकेटही बघत नाही. त्यामुळे, त्या माणसाने आम्हाला नाव सांगितल्यावरही आम्ही त्याला ओळखलं नाही.”

दरम्यान हा अपघात कसा घडला तर, याबाबत बोलताना स्वत: रिषभ पंतने सांगितलं की, “गाडी चालवत असताना माझी डुलकी लागली होती आणि म्हणून माझा गाडीवरचा ताबा सुटला.”

आता उत्तराखंड सरकारनंही या दोघांचा सत्कार करणार असल्याचं घोषित केलंय. पंतच्या परिवाराकडूनही लेकाचे प्राण वाचवणाऱ्या या दोघांसाठी बक्षिस जाहीर करण्यात आलंय. हे दोघंही या सगळ्या बक्षिसांचे खरंच मानकरी आहे.

म्हणजे आपण ज्याला मदत करतोय तो भारताचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत आहे म्हणून त्याला कुणीही मदत केली असती. पण, अनोळखी व्यक्तीला मदत करणारी ही ड्रायव्हर कंडक्टरची नाही तर, देवदुतांची जोडी आहे असं म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.