रिषभ पंत आता धोनीच्या पलीकडे गेलाय, हे त्याच्या सेंच्युरी नंतरचा राहुल द्रविडचा आनंदच सांगतो

कॅप्टन बदलणं, ही कन्सेप्ट तशी महाराष्ट्राच्या जनतेला नवीन नाही. उलट सध्या तर तेच ट्रेंडमध्ये आहे. पण कसंय क्रिकेटमध्येही कॅप्टन बदलाचं वारं जोरात वाहतंय. भारतानं विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला कॅप्टन केलं, मग तो टेस्ट मॅचसाठी उपलब्ध नसल्यानं ही जबाबदारी आली जसप्रीत बुमराहवर.

पण आपल्याकडचं सत्तांतर व्हायच्या आधी, इंग्लंडनं सगळी सिस्टीमच बदलली होती. जो रुटच्या जागी टेस्ट टीमचा कॅप्टन झाला, बेन स्टोक्स आणि कोच म्हणून त्यांनी नियुक्ती केली, ब्रेंडन मॅकलमची. आता स्टोक्स आणि मॅकलम हे दोघंही ओळखले जातात आपल्या खतरनाक बॅटिंगसाठी, आक्रमक क्रिकेटसाठी. मॅकलमनं हीच स्कीम इंग्लंडच्या टेस्ट क्रिकेटमध्ये आणली.

प्लॅन एकदम सोपा होता, आपली पहिली बॅटिंग असो किंवा दुसरी समोरच्या टीमवर तुटून पडायचं आणि खोऱ्यानं रन्स ओढायचे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स असलेल्या न्यूझीलंडचेही त्यांनी याच स्कीमच्या जोरावर हाल केले. 

कितीही मोठं टार्गेट आणि कितीही कमी ओव्हर्स हातात असल्या, तरी इंग्लिश भिडू मॅच मारायचेच. त्यांची बॅटिंग बघताना, टेस्टमध्ये टी२० बघितल्याचा फील यायचा.

मॅकलमच्या या नव्या स्कीमचं नाव होतं, ‘बॅझबॉल.’ थोडक्यात क्रिकेटमध्ये बेसबॉल खेळायचं.

या स्कीमबद्दल तुम्हाला एवढी माहिती दिली, कारण त्यांच्या या स्कीमला आपला रिषभ पंत पुरुन उरलाय.

भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजमधली राहिलेली पाचवी टेस्ट सध्या इंग्लंडमध्ये सुरू आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं टॉस गमावला आणि पहिली बॅटिंग करावी लागली.

आता इंग्लंडमधलं ढगाळ वातावरण, टेस्ट क्रिकेट आणि समोर जेम्स अँडरसनसारखा बॉलर म्हणल्यावर भारतीय बॅट्समन लेझीम डान्स करणार हे जवळपास फिक्सच होतं आणि झालंही तसंच.

शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या दोन्ही ओपनर्सची विकेट अँडरसननं घेतली, तर विराट कोहली आणि हनुमा विहारीला मॅथ्यू पॉट्सनं आऊट केलं. भारताचा स्कोअर झाला ४ आऊट ७१ आणि त्यात श्रेयस अय्यरही आऊट झाल्यानं स्कोअर ५ आऊट ९८ वर आला.

पहिल्याच दिवशी विषय ढेपाळला होता, मग क्रीझवर आला रिषभ पंत. साऊथ आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या सिरीजमध्ये पंतला कॅप्टन करण्यात आलं होतं, पण तो बॅट्समन म्हणून सपशेल गंडला. आयपीएलमध्ये कॅप्टन आणि बॅट्समन अशा दोन्ही आघाड्यांवर माती झाली.

त्यामुळं पंतला टीममध्ये तरी घ्यावा का नाही असा प्रश्न होता, पण भावानं आपली टीममधली जागा घट्ट करत, बेक्कार हाणामारी केली.

पंतनं धोनीचं रेकॉर्ड मोडत फक्त ८९ बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली, जिथं लोकांना वनडे क्रिकेटमध्ये यापेक्षा जास्त बॉल लागतात, तिथं पंतनं टेस्टमध्येच धमाका केला. सेंच्युरी झाल्यानंतरही तो थांबला नाही, १४६ रन्सपर्यंत पोहोचेपर्यंत दांडपट्टा उभा आडवा फिरत होताच, जो १९ फोर आणि ४ सिक्स मारुन शांत झाला.

पंतच्या खुंखार शतकामुळं भारत सेफ झाला ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे त्यानं बाऊंड्री मारुन सेंच्युरी पूर्ण केली आणि कॅमेरा भारताच्या ड्रेसिंग रुमकडे फिरला, तेव्हा स्वतः राहुल द्रविड आनंदानं उठून उभा राहताना दिसला.

जो प्लेअर राहुल द्रविडला भर मैदानात आपल्या भावनांचं प्रदर्शन करायला लाऊ शकतो, त्यानं लय मोठी अचिव्हमेंट मिळवलेली असतीये.

पण दरवेळी टीम संकटात असताना वेगानं रन्स करणं, पंतला जमतं कसं?

१) त्याचा बॅटिंग ऍप्रोच –

पुजारा असो किंवा कोहली, हे तंत्रशुद्ध बॅट्समन्स आधी पीचचा, बॉलर्सचा अंदाज घेऊन मग खेळतात. त्यासाठी ते भरपूर वेळही घेतात, पण पंत हा वेळ घेण्याच्या फंदात फारसा पडत नाही, त्याला पहिलाच बॉल जरी टप्प्यात दिला, तरी तो उचलून मारणार हे फिक्स असतंय. टीमचा स्कोअर किंवा कुठली इनिंग आहे, याचा त्याच्या बॅटिंगवर फरक पडत नाही. त्यामुळं मॅकलमनं सांगायच्या आधीपासूनच पंतचं ‘बॅझबॉल’ हिट होतंय.

२) एक टार्गेट धरुन हाणणं –

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच होती, तेव्हा नॅथन लायनला फटके पडले. जेव्हा इंग्लंड विरुद्ध मॅच होती, तेव्हा जॅक लीच तर तडाख्यात घावलाच, पण त्याही पेक्षा भरडी झाला तो जेम्स अँडरसन. 

जेम्स अँडरसन सध्याच्या क्रिकेटमधला सगळ्यात सिनियर बॉलर. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि शुभमन गिल, भारतीय क्रिकेटच्या तीन पिढ्यांना अँडरसननं पछाडलंय. त्याच्या हातात नवा बॉल असला की, भलेभले त्याला टरकतात. मात्र रिषभ पंत काय करतो, तर अँडरसन सारख्या फास्ट बॉलरला उभ्या उभ्या रिव्हर्स स्वीप मारतो.

ही त्याची नेहमीची स्कीम ए. समोरच्या टीमचा बेस्ट बॉलर पकडायचा आणि त्याला ठरवून झोडायचा. यामुळं त्या बॉलरचं खच्चीकरण तर होतंच पण सोबतच बाकीचे बॉलरही बिथरतात. आणि साहजिकच चुकाही करतात. क्रिकेटमध्ये बॉलिंग पार्टनरशिप नावाचा एक प्रकार असतो, जिथं एका बाजूचा बॉलर प्रेशर तयार करतो आणि दुसऱ्या बाजूचा विकेट घेऊन जातो. 

फॉर्मातला रिषभ पंत क्रीझवर असला की, दोन्हीकडच्या बॉलर्सवर फिक्स प्रेशर असतंय.

३) जितकी महत्त्वाची मॅच तितकी भारी बॅटिंग –

या आधी सिडनी, ओव्हल, केपटाऊन इथल्या टेस्टमध्येही पंतनं महत्त्वाच्या वेळी टीमला संकटातून बाहेर काढलंय. जिथं टॉप ऑर्डर फेल जाते, तिथं पंत ठाण मांडून उभा राहतो. गॅबा टेस्टवेळी त्यानं झुंजार बॅटिंग केली नसती, तर भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवताच आला नसता. त्याचा हाच प्रेशरमध्ये आणखी भारी खेळण्याचा गुण त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.

४) रिषभ पंतचं रिषभ पंत असणं –

पंत भारतीय संघात आला धोनीच्या जागेवर, आता धोनी म्हणजे आदर्श गुणांचा पुतळा. त्याचं मैदानाबाहेरचं वागणं जितकं परफेक्ट आहे, त्यापेक्षा जास्त त्याचा मैदानावरचा खेळ. जेव्हा पंत अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये चुका करायचा, तेव्हा सगळं मैदान धोनी धोनीचा गजर करायचं. 

कित्येकांनी अपेक्षाही व्यक्त केलेली की पंतनं धोनीसारखं खेळावं. पण पंत आपल्या बेसिक्सवर कायम राहिला. त्यानं अनेकदा अपयश येऊनही आपली बॅटिंग स्टाईल किंवा वागणं बदललं नाही आणि त्याचं फळ त्याला आणि पर्यायानं भारताला मिळालं.

पण काहीही म्हणा, त्यानं भारताला जिंकून दिलेल्या मॅचेस एका बाजूला आणि पंतच्या शतकामुळं राहुल द्रविडला आनंदानं ओरडताना बघण्याचं सुख एका बाजूला.

 हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.