धनराज पिल्लेला राजकारणानं संपवलं, नाही तर भारतीय हॉकीचा तो सचिन होता

आपल्याला लहानपणी हॉकी म्हटल की एकच चित्र डोळ्यासमोर राहत. गळ्यात सोन्याची साखळी घातलेला लांब केसाचा सावळा मुलगा हॉकी स्टिकला बॉल चिकटलेला घेऊन तुफान स्पीडने धावतोय आणि त्याच्या मागे विरोधी टीमचे जवळपास अर्धे प्लेअर्स धावतायत पण तो कोणालाच सापडत नाहीय.

धनराज पिल्ले. भारतीय हॉकीचा शेवटचा हिरो.

एक काळ होता जेव्हा भारत हॉकीचा महासत्ता होता. ऑलिंपिकमध्ये तर आपल्याला आठ वेळा सुवर्णपदक मिळाले होते. हिटलरसारखा हुकुमशहा सुद्धा मेजर ध्यानचंदच्या खेळाचा फॅन होता. याशिवाय मोहम्मद शाहीद, केडी सिंग बाबू, उधम सिंग असे अनेक जबरदस्त खेळाडू होऊन गेले. या परंपरेला भारतीय हॉकी स्टाईल म्हणून ओळखलं जायचं.

पण साधारण सत्तरच्या दशकात भारताच्या हॉकी साम्राज्याला घरघर लागली. युरोपियन वेगवान हॉकीने भारताला दमवायला सुरवात केली.  भारत मागे पडत गेला. याच काळात कपिलने क्रिकेटवर्ल्ड कप जिंकला. अख्खी स्पोर्ट्स पिढी हॉकीसोडून क्रिकेटच्या मागे गेली. भारताचा राष्ट्रीय खेळ बेवारस झाला.

अशातच आगमन झालं होत धनराज पिल्लेचं.

धनराज पिल्ले पुण्याच्या खडकी कॅम्पमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याच कुटुंब मूळच तमिळ. वडील खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचं हॉकी मैदान सांभाळायचे. धनराजचे दोन्ही मोठे भाऊ हॉकी खेळायचे. त्यांचा खेळ बघून धनराजला सुद्धा हॉकीची आवड निर्माण झाली. पण घरची परिस्थिती गरीबीची. प्रत्येकाला खेळायला वेगळी हॉकी स्टिक कुठून आणायची. सगळ्यांच्यात मिळून एक हॉकी स्टिक.

मग धनराज मैदानाच्या बाहेर भावांच खेळून आपल्याला चान्स मिळेपर्यंत वाट पहात बसायचा. कधी कधी कंटाळून गल्लीतल्या मित्रांबरोबर मोडकी स्टिक, काठी घेऊन खेळायचा. अशातच त्याचा एक भाऊ मुंबईला हॉकीकॅम्प साठी सिलेक्ट झाला आणि धनराजला स्वतःची हॉकी स्टिक मिळाली.

तो एक्स्ट्रा टॅलेण्टेड आहे हे शाळेपासूनच सगळ्यांना ठाऊक होतं. त्याच्या भावांनी धनराजला चांगलाच तयार केला. तो झटझट करत असलेली प्रगती बघून तेही आवाक झाले होते. 

वयाच्या अठराव्या वर्षी धनराज भारताच्या राष्ट्रीय टीममध्ये सिलेक्ट झाला. साल होत १९८९. या वर्षाच वैशिष्ट्य म्हणजे तेव्हाच भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा खेळाडू आला होता. सचिन तेंडूलकर.

सचिनचं पदार्पण अगदी गाजत वाजत झालं. सोळाव्या वर्षी पाकिस्तानमध्ये वासिम अक्रम, इम्रान खानसारख्यांना तोंड देणे सोपे नव्हते. त्याची चर्चा जगभर झाली. पुढे जाऊन तो क्रिकेटचे रेकॉर्ड मोडणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. पण तेव्हाचं आपली हॉकी मधली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु करणारा धनराज पिल्ले सुद्धा त्याच तोडीचा खेळाडू होणार आहे हे कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हत.

धनराजच्या नशिबात अशी ग्रँड सुरवात नव्हती पण त्याच्या स्कीलमुळे हळूहळू त्याच नाव होऊ लागलं. फोरवर्ड पोजिशनला खेळणाऱ्या धनराजला हमखास गोल करणारा प्लेअर म्हणून जगभर ओळखू लागले. त्याला रोखण्यासाठी खास प्लॅनिंग करण्यात येऊ लागलं. आपला एक प्लेअर युरोपच्या टीमच्या नाकावर टिच्चून गोल करण्याचे रतीब घालतोय हे बघून लोक परत हॉकी बघू लागले.

सचिनचं जे स्थान भारतीय क्रिकेटमध्ये आहे तेच स्थान हॉकीमध्ये धनराजचे आझे. दोघेही समकालीन होते. नव्वदच्या दशकात दोघांनीही टीममधून इतर खेळाडूंचा विशेष सपोर्ट नसताना अशक्यप्राय खेळी करून दाखवली. दोघानाही इंग्लिश क्लबकडून खेळण्याचा मान मिळाला.

१९९८ हे साल दोघांच्याही आयुष्यातील खूप महत्वाच ठरलं. सचिनने शारजामध्ये ऑस्ट्रेलियाला धुतले आणि त्याच वेळी धनराजने आपल्या कप्तानी मध्ये देशाला बावीस वर्षांनी हॉकीचं गोल्ड मेडल मिळवून दिल. धनराजचा तेव्हाचा खेळ हा आजही सर्वोत्कृष्ट मानला जातो. स्वतः पंतप्रधान वाजपेयीनी त्याच्या टीमचं भेटून कौतुक केलं. हे दोन्ही खेळाडू देशाला आपापल्या खेळात नंबर एकच्या स्थानाला नेतील यावर कोणालाही शंका नव्हती. १९९७ ला सचिनला तर १९९९ साली धनराज ला भारताचा खेळातला सर्वोच्च सन्मान म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला.

सचिन आणि धनराजचा प्रवास पॅरलल सुरु होता पण या दोघामध्ये एक फरक देखील होता. गरिबी आणि श्रीमंतीचा.

तेव्हा क्रिकेट हा श्रीमंत खेळ बनला होता तर हॉकी एकेकाळी श्रीमंत पण आता रस्त्यावर आलेल्या बिझनेसमेन सारखा. बडा घर पोकळ वासा. सचिनप्रमाणे धनराज सुद्धा सुपरस्टार झाला होता पण त्याला काही एक्सपोजर नव्हत. टीव्ही एंडोर्समेंट नव्हते. एवढच काय स्वतःच हक्काचं घर गाडी देखील नव्हती. सचिनला त्याकाळात शारजामध्ये मॅन ऑफ दी सिरीजची कार मिळाली होती त्याकाळात धनराज मुंबईत सगळीकडे लोकलनेचं फिरायचा. लोक त्याला बघून गर्दी करायचे. ट्रॅफिक खोळंबायचं पण पर्याय नव्हता.  टॅक्सीने फिरणे सुपरस्टार धनराज पिल्लेला परवडणार नव्हत.

अखेर १९९९ साली त्याला महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आपल्या टीमकडून खेळल्याबद्दल जीप भेट दिली. 

घराचीही अशीच बोंब होती. एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर धनराजवर अनेक आश्वासनांची बरसात झाली. पण प्रत्यक्षात एकही आले नाही. तो जेव्हा एका नेत्याकडे आपल्याला घर मिळू शकेल का याची चौकशी करायला गेला होता तेव्हा गरिबाने गरिबासारखं राहावं असा अपमान त्या नेत्याने केला. धनराज तिथून रडत बाहेर आला.

अखेर ही गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पर्यंत गेली. त्यांनी आधी माझ्याकडे का आला नाहीस म,हणून धनराजची कानउघडणी तर केलीच पण अठ्ठेचाळीस तासात पवईच्या पॉश हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट मिळवून दिला.

२००३ ला जेव्हा सचिनने भारताला वर्ल्ड कप फायनल पर्यंत पोहचवल तेव्हा धनराजच्या कप्तानीमध्ये भारताने आशिया कप जिंकला.  सचिन प्रमाणेच धनराजनेही अनेक विक्रम केले. पण दुर्दैव म्हणजे धनराजने केलेले आंतरराष्ट्रीय गोल किती हे देखील भारतीय हॉकी असोशीएशनला ठाऊक नाही.

सचिनचं स्वप्न होत की भारताला वर्ल्ड कप मिळवून द्यायचं तर धनराजचं स्वप्न होत की ऑलिंपिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणे. दोघांनीही यासाठी जीवापाड मेहनत घेतली. सचिनचं स्वप्न पूर्ण व्हायला 2011 हे वर्ष उजाडल पण चारवेळा ऑलिंपिक खेळूनही धनराजचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकल नाही.

यासाठी अनेक कारणे होती.

हे दोन्ही खेळाडू आपापल्या टीमचे मुख्य आधारस्तंभ होते. शंभर करोड लोकांच्या अपेक्षेच ओझ घेऊन त्यांना खेळायला लागायचं. सचिनला पुढे गांगुली, द्रविड, सेहवाग धोनी अशा नव्या दमाच्या खेळाडूंची साथ मिळत गेली. भारतीय टीमचा चेहरा मोहरा बदलला. सचिनवरचे प्रेशर कमी होऊन त्याला आपला नैसर्गिक खेळ करण्यास वाव मिळाला. असं धनराज बरोबर घडलं नाही.

सगळ्यात महत्वाच म्हणजे सचिनला कधी राजकारणाचा सामना करावा लागला नाही.

धनराज खेळत होता त्या काळात भारतीय हॉकी मध्ये पचंड राजकारण झालं. लहरीप्रमाणे कोच आणि कप्तान बदलणे. खेळाडूना कोणतीही सुविधा न देणे अशा गोष्टी मॅनेजमेंट कडून होत होत्या. धनराज बऱ्याचदा आपल्या हक्कासाठी भांडायचा. खेळाडूना मिळणारे मानधनही त्याने वाढवून घेतले. पण यामुळे तो कायम मॅनेजमेंटच्या डोळ्यात खुपत होता.  २००४च्या अथेन्स ऑलंपिकमध्ये जीव तोडून खेळणाऱ्या धनराजला शेवटच्या सामन्यात ९४ सेकंदातच बाहेर बोलावलं.

धनराज पिल्ले ला रडताना अनेकांनी पहिले. केपीएसगिल सारख्या हॉकीच्या सम्राटाशी घेतलेला पंगा त्याला महागात पडला. भारतीय हॉकीचे गौरवशाली दिवस परत आणु शकणारा धनराजला हॉकी मंडळाच्या राजकारणाने संपुन गेला.
धनराज आपल्या खेळाचं सारं श्रेय आपल्या आईला देतात. पण देशाला ऑलिंपिक मेडल मिळवून देण्याचं तीच स्वप्न काही त्याला पूर्ण करता आल नाही. आपल्या चरित्रात त्यांनी तिची माफी मागितली,

“अम्मा, मी अपयशी ठरलो . मी चार ऑलम्पिक खेळलो पण मला एक पदकही जिंकता आल नाही. अम्मा, मला माफ कर.”

Leave A Reply

Your email address will not be published.