ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान चक्क एका मॅचमध्ये वॉटरबॉय बनून आले होते…

क्रिकेटचा नाद लै बाद असं म्हणतात ते उगाच नाही. कित्येक पिढ्या क्रिकेट हा खेळ आवडीने खेळला जातो, पाहिला जातो. इंग्लंडमधून सुरु झालेल्या या खेळाने हळूहळू इतकी लोकप्रियता मिळवली कि ज्या देशांचे मूळ खेळ होते त्यालासुद्धा क्रिकेटने मागे टाकलं. अगदी लहानशा खेड्यापासून ते भव्यदिव्य ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळण्याची स्वप्ने लोकं पाहू लागली.

तर आजचा किस्सा आहे क्रिकेट प्रेमाचा. कुठल्या साध्यासुध्या माणसाचा नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा. आता पंतप्रधान म्हणल्यावर किती व्हीआयपी काम असतं हे तर आपण जाणतोच. म्हणजे पंतप्रधान या पदाचा मान राखणे, ज्याला लोकांनी निवडून सर्वोच पदावर बसवलं अशा माणसाने पदाची मर्यादा राखून काही गोष्टी केल्या पाहिजे. पण ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने केलेली गोष्ट बघून सगळं जग म्हणत होतं पंतप्रधान हवा तर तो असा. 

पंतप्रधान पदावर जरी एखादा नेता असला तरी त्याची स्वतःची आवड वेगळी असते, ती जोपासण्यासाठी तो वेळ काढू शकतो याचं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एका टी-ट्वेन्टी प्रॅक्टिस मॅचमध्ये स्कॉट मॉरिसन स्पोर्ट विश्वात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी मॅच बघण्यासाठी आले होते.

मनुका ओव्हल मैदानावर हा सामना सुरु होता. या सामन्यासाठी उपस्थित पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जसा ब्रेक झाला तसे ते ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पाणी पाजण्याचं अर्थात वॉटर बॉयचं काम करू लागले. थोड्या वेळासाठी का होईना त्यांनी वॉटर बॉयची भूमिका पार पडली होती.

हातात बऱ्याच पाण्याच्या बाटल्या घेऊन ते मैदानात आले तेव्हा उपस्थित जेमतेम प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला होता. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला होता. पंतप्रधानांचा हा अंदाज लोकांना चांगलाच आवडला होता. पंतप्रधान स्वतः आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतोय आणि पाणी पाजतोय हि घटना खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांच्याही चांगलीच लक्षात राहिली.

जेव्हा ब्रेक झाला तेव्हा पाण्याच्या बाटल्या घेऊन आणि वॉटर बॉय म्हणून मैदानात आलेले स्कॉट मॉरिसन यांचं स्वागत खेळाडूंनी टाळ्या वाजवून केलं होतं. वेळोवेळी खेळाडूंची विचारपूस करणे आणि आपली आवड जोपासणे, दररोजच्या राजकीय फंदातून बाहेर पडून वेगळी गोष्ट करणे याबद्दल स्कॉट मॉरिसन यांना बरेच कौतुकाचे शेरे मिळाले होते. 

कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांनी वॉटरबॉय बनून खेळाडूंना मैदानात जाऊन पाणी पोहचवणे हि पहिलीच घटना होती. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी या घटनेला चांगलंच व्हायरल केलं. राजकारणी लोकं सहसा खेळाकडे वळत नाही किंवा त्यात जास्त लक्ष घालत नाही अशी बोंब असते पण या परंपरेला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी छेद देत नवीन ट्रेंड आणला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.