त्या दिवशी गुरुशरण सिंगने जे काही केलं त्यासाठी सचिन आयुष्यात उपकार विसरणार नाही

सचिन रमेश तेंडुलकर. फक्त भारतीयच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटला पडलेलं सुंदर स्वप्न. टीकाकार टीका करत राहतील , तो जगातला आजवरचा भारी बॅटर होता कि नव्हता यावरून वाद होत राहतील. पण त्याच्यामुळे क्रिकेट बदललं हे मात्र नक्की. आपल्या कारकिर्दीत संपूर्ण खेळाचं नशीब बदलणारे जे काही मोजके खेळाडू होऊन गेलेत त्यामध्ये सचिनचं स्थान आढळ राहेल.

तो आला तेच एक वंडर बॉय म्हणून. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्याची चर्चा क्रिकेट जगात होत होती.  क्रिकेटमध्ये त्याने आणि विनोद कांबळीने केलेली विश्वविक्रमी पार्टनरशिप झाली तेव्हाच हा पुढे जाऊन मोठा पराक्रम करणार असं बोललं जात होतं. 

वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची खडूस समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली. त्याला पहिली संधी पुढच्या वर्षी मिळाली पण आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं. पुढे हाच सिलसिला त्याने देवधर करंडक,दुलीप ट्रॉफीमध्ये पुढे चालवला. पदार्पणाच्या प्रत्येक सामन्यात त्याने शतक ठोकले. सुनील गावस्कर यांच्यापासून ते कपिल देव पर्यंत प्रत्येकजण त्याला भारताचं भविष्य समजू लागले होते.

राजसिंग डुंगरपूर या व्यक्तीने या भविष्याला वर्तमानात बदलायचं ठरवलं. त्याची निवड भारताच्या राष्ट्रीय संघात करण्याचा विचार त्यांनी बीसीसीआय पुढे मांडला.

खरं तर सचिनचा इंटरनॅशनल डेब्यू १९८९ सालच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातच झाला असता पण बीसीसीआयला तेव्हा वाटलं कि लहानग्या सचिनला वेस्ट इंडिजच्या तोफखान्यापुढे एक्स्पोज करायला नको. म्हणून ऐन वेळी त्याची निवड केली गेली नाही. पण डुंगरपूर यांच्या जोरदार प्रयत्नामुळे सचिनला पाकिस्तान दौऱ्याला निवडलं गेलं.

 वेस्ट इंडिज प्रमाणेच त्याकाळची पाकिस्तानची टीम देखील डेंजर होती. इम्रान खान, वसीम अक्रम आणि नव्यानेच निवडला गेलेला वकार युनूस यांची आग ओकणारी गोलंदाजी खेळायला भलेभले दिग्गज थरथर कापायचे. पण सचिन यांना कसा सामोरा जाणार हा प्रश्नच होता.

पाकिस्तानला जाण्या पूर्वी सचिनची निवड इराणी ट्रॉफी साठी झाली. रणजी जिंकणारी दिल्ली विरुद्ध उर्वरित भारत असा सामना रंगणार होता.

दिल्लीची टीम मोठी तगडी होती. मदनलाल, कीर्ती आझाद, मणिंदर सिंग असे दिग्गज खेळाडू होते. तर रेस्ट ऑफ इंडियाची टीम संजय मांजरेकर सोडला तर तशी अननुभवी होती.

घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती त्यामुळे सचिन निर्धास्त होता. पण पहिल्या इनिंगमध्ये त्याला विशेष चमक दाखवता आली नाही. मणिंदर सिंगने त्याला ३९ धावांवर बोल्ड काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र सचिनला वरच्या नंबर वर पाठवण्यात आलं. तेव्हा त्याला सूर गवसला.

लालचंद राजपूत, सुरेंद्र भावे, संजय मांजरेकर वगैरे मंडळी स्वस्तात परतली. पण सचिनने एक बाजू लावून धरली.  पत्त्याचा डाव कोसळावा तशी टीम गडगडली. पण सचिनचा तुफान कोणालाही आवरत नव्हता. त्याला काहीही करून या सामन्यात देखील सेंच्युरी करायची होती. बाकीचे आउट होत आहेत वगैरे कडे लक्ष द्यायला त्याला वेळच नव्हता.

आठवी विकेट राजीव सेठची गेली. नवव्या विकेटसाठी वेंकटपथी राजू बॅट घेऊन मैदानात आला. सचिन साठी हि शेवटची आशा होती. कारण गुरुशरण सिंग हे जखमी झाल्यामुळे पहिल्या इनिंगनंतर मैदानात उतरले नव्हते. 

सचिनने राजू आउट होण्याच्या आधी आपलं शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावला. पण दुर्दैव तो ८६ धावांवर असताना राजू देखील आउट झाला. सचिनच्या टीमची इनिंग संपुष्टात आली. पण तेव्हा राजसिंग डुंगरपूर सोमर आले. 

पंजाबचा धडाकेबाज फलंदाज गुरुशरण सिंग जो अंगठा तुटल्यामुळे त्या इनिंगला खेळायला उतरला नव्हता त्याच्या जवळ गेले आणि रिक्वेस्ट केली. 

“लडका अच्छा खेल रहा है.  मुझे उसकी सेंच्युरी चाहिये. क्या तुम उसकी मदत करोगे ?”

इकडे निराश झालेला सचिन तेंडुलकर नाबाद ८६ या स्कोरवर पॅव्हेलियनच्या दिशेने परत निघू लागला इतक्यात त्याला दिसलं, गुरुशरण सिंग आपले हेल्मेट पॅड अडकवून मैदानात येत आहे. सचिनला धक्काच बसला. अंगठा तुटल्यामुळे होणाऱ्या वेदना त्याला ठाऊक होत्या. अशा जखमी अवस्थेत गुरुशरण सिंग कसे काय खेळतील त्याला प्रश्नच पडला होता.

गुरुशरण सिंग हसत हसत त्याच्या जवळ आले आणि म्हणाले,

“चल तुम्हारी सेंच्युरी पुरी करते है.”

आता सचिनच्या डोक्यात प्रकाश पडला. एवढा मोठा प्लेअर फक्त आपल्या सारख्या १६ वर्षाच्या मुलाची सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी जखमी अवस्थेत मैदानात उतरतो म्हणजे किती मोठी गोष्ट होती. त्याने गुरुशरण सिंग यांच्या जिद्दीला व त्यांच्या धाडसाला सलाम केला. त्यांना बॉल फेस करायची वेळ येणार नाही याची घेतली. समोरच्या बॉलरची पिसे काढत त्याने शतक पूर्ण केलं.

शतक झाल्या झाल्या तो धावत गुरुशरण सिंग यांच्या जवळ आला आणि त्यांना घट्ट मिठी मारत थँक्यू असं म्हटलं.

हा सामना दिल्लीने जिंकला पण सचिन तेंडुलकर या जादूची नशा सगळ्या भारताने अनुभवली. त्याची पाकिस्तान सीरिजसाठी झालेली निवड हि सार्थ असल्याचं राजसिंग डुंगरपूर यांनी टीकाकारांना दाखवून दिलं.

पुढं सचिनने इतिहास घडवला. तो जितके दिवस खेळला तितके दिवस त्याने विक्रम मोडले. पहिल्या सिरीजपासून शेवटच्या सीरिजपर्यंत जगभरात त्याची प्रसिद्धी कायम राहिली. 

इकडे गुरुशरण सिंग हे रिटायर झाल्यावर क्रिकेट कोच बनले. त्यांनी स्वतःची अकॅडमी सुरु केली. जेव्हा त्याच्या उदघाटनाची वेळ आली तेव्हा त्यांनी थोडंसं दबकतच सचिनशी संपर्क केला. पण सचिन त्यांना विसरला नव्हता. तो विसरणे शक्यच नव्हतं. सचिनने त्यांना सांगितलं,

 तुम्ही मला फक्त तारीख कळवा. मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी या कार्यक्रमाला येईन.”

नेमका उदघाटनाची दिवशी पाऊस पडला. गुरुशरण सिंग यांनी सचिनला तस कळवलं. कार्यक्रम रद्द होण्याची भीती होती. पण तो म्हणाला,

“आज गिले पीच पर खेल लेंगे. मगर मै आऊंगा जरूर.आपने मेरे लिए इतना किया है. ये उसके सामने कुछ भी नही.” 

सचिन बोलल्याप्रमाणे आला व त्याने गुरुशरण सिंग यांच्या छोट्याशा अकॅडमीच उदघाटन केलं. खेळाडू महान फक्त आपल्या खेळामुळे होत नाही तर अशा छोट्या छोट्या प्रसंगामुळे त्याच महानत्व सिद्ध होतं. गुरुशरण सिंग आणि सचिन ची हि स्टोरी देखील त्याचंच उत्तम उदाहरण आहे.

 हे ही वाच भिडू.

           

 

Leave A Reply

Your email address will not be published.