अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले.

सहा वेळा विजयी मिळवलेल्या पतंगराव कदम यांचा 1980 साली अवघ्या 86 मतांनी पराभव झाला, त्यांचा हा पराभव झाला नसता तर ते, 1990 साली मंत्री झाले असते. असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात.

1980 साली विद्यमान आमदार संपतराव चव्हाण यांच्या विरोधात पतंगराव कदम निवडणूक लढवत होते.

चव्हाण काँग्रेसचे उमेदवार तर कदम अपक्ष. 1978 साली पहिल्यांदा आमदार झालेल्या चव्हाण यांच्याविरोधात एक सुप्त लाट असतानाच लोकांना पतंगराव कदम नावाच्या तरुणांची भुरळ पडली होती. त्यांच्या धडाकेबाज काम करण्याच्या पद्धतीमुळे माणसं जुन्या साहेबापेक्षा(चव्हाण साहेब) नव्या साहेबाच्या(कदम साहेबांच्या) प्रेमात पडली होती.

मग काँग्रेसच्या विरोधात बंड केलेल्या पतंगराव कदम यांच्या बाजूनं जनमत बनायला लागलं होतं.

त्यात या मतदारसंघात शक्तिशाली असलेल्या कुंडलच्या जी डी बापूनीही आपली ताकद काँग्रेस बंडखोर असलेल्या कदम यांच्या विरोधात उभी केली.त्यांचा 1978 साली चव्हाण यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यानी नव्या उमेदवाराला ताकद द्यायचं ठरवलं होतं.

निवडणूक अटीतटीची झाली. मतमोजणीच्या दिवशी दोन्ही उमेदवार बरोबरीत चालले.

शेवटच्या फेरीतही बरोबरी झाली. कदम अवघ्या काही मतांनी पुढे होते. सगळ्या पेट्या मोजून झाल्यावर पोस्टाची मत मोजायला घेतली. आता ही पोस्टाची मत काय भानगड कदम यांच्या कार्यकर्त्यांना माहिती नव्हते. आणि तिथपर्यँत त्यांची प्रचारयंत्रणा पोहोचली नव्हती.

त्या मतातील काही अपवाद सोडता सगळी मत चव्हाण यांच्या पारड्यात पडली आणि अवघ्या ८६ मतांनी चव्हाण विजयी झाले.

या निवडणुकीच्या दिवशी पोस्टाच्या मतासोबत अजून एक कारण कदम यांचा पराभव करायला कारणीभूत ठरल्याचे लोक सांगतात,

प्रतिसरकारच्या चळवळीत प्रचारमंत्री म्हणून कामगिरी केलेल्या शाहिर शंकरराव निकम यांनीही समाजवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात उमेदवारी केली होती.त्याना  4836 मते मिळाली. त्यानी घाटावरची म्हणजे कदम यांच्या जास्त लोकप्रियता असलेल्या भागात मते मिळवली. ते जर उमेदवार नसते तर घाटावरची मते कदम यांना मिळून 1980 सालीच पतंगराव कदम आमदार आणि 1990 साली मंत्री झाले असते असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात.

(संपत मोरे यांच्या फेसबुकवरून साभार)

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.