आठवणी पतंगरावांच्या

 

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री 

२६ ऑक्टोबर २०१७
वेळ सकाळी आठची.माझा मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलला,”हॅलो…
“अरे,संपत मी बोलतोय.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुला आशीर्वाद आहेत. खूप अभ्यास कर. गावाकडं आल्यावर गाठ घे.तुला पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटू.”
फोन बंद झाला. आणि मला गहिवरून आलं. कारण तो फोन होता. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा. एवढ्या आभाळाएवढ्या उंचीच्या माणसाने माझ्यासारख्या सामान्य पोराला फोन केला होता. आशीर्वाद दिले होते. सकाळी सकाळीच मला उर्जा मिळाली. वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला होता.
पतंगराव कदम साहेब यांच्याबद्दल खूप सांगता येईल. कडेगाव तालुक्यात पाडळी नावाचं एक गाव आहे. जुन्या खानापूर तालुक्याच्या पश्चिमेला. या गावावर साहेबांचा विशेष लोभ. साहेब एस टी महामंडळाचे संचालक झाले तेव्हा त्यानी या गावातील अनेक पोर चालक,वाहक म्हणून नोकरीस लावली. नंतर भारती विद्यापीठ,सोनहिरा कारखाना या संस्थेत नोकरीची संधी दिली. पतंगराव कदम यांच्यासारखा माणूस जर या भागात झाला तर पाडळीसारख्या छोट्या गावाचं काय झालं असत?ते गाव विकासाच्या प्रवाहात आलं असत का?असा प्रश्न पडतो. पण छोटी गाव आणि छोटी माणसं विकासापासून दूर राहिली नाही पाहिजेत हा साहेबांचा विचार होता.सर्वच ठिकाणी मोठी माणसं आणि मोठी गाव यांची एक दंडेली असते पण कदम साहेब हा छोटी गावं, छोटी माणसं यांचा आवाज ऐकणारा एक मोठा माणूस होता.गरिबांचा,दुबळ्याचा आधार होता.
मी एकदा सांगलीला निघालो होतो.पाऊस पडत होता. लक्ष्मीच्या टेकाला एक म्हातारा उभा होता.पाऊस आहे म्हणून त्या म्हाताऱ्याजवळ गेलो. त्यांनी मला छत्रीत घेतलं. त्यांच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत होता जेवणाचा डबा. त्यानां विचारले,”कोणाचा डबा घेऊन थांबलाय.”
“पतंगराव साहेबांचा.”
पुन्हा त्यांच्याकड पाहून घेतलं. वाटलं साहेबांना हे कशाला डबा घेऊन येतील? काही काळ गेला आणि सायरन वाजवत गाड्यांचा ताफा आला. साहेबांची गाडी जवळ येऊन थांबली. मग त्यांनी ती पिशवी आत दिली. साहेब म्हणाले,”तात्या,बरं हाय न्हवं का?”(अगदी गावाकडची भाषा)
“हो.साहेब.”मग साहेब तात्याशी अगदी पाऊस पाण्यापासून सगळ्या गप्पा मारू लागले.गतीनं आलेला ताफा रेंगाळला. साहेब गेले आणि तात्याही चालत त्यांच्या गावाकडे निघाले. पाऊस कमी झालेला. मीही त्या तात्या नावाच्या माणसाचा आणि त्यांचं साधं जेवण खाणाऱ्या कदम साहेबांचा विचार करत निघालो. एक मंत्री आणि एक कार्यकर्ता यांचं नातं यावेळी मला पडणाऱ्या पावसामुळं बघायला मिळालं होतं.

काल रात्री कदम साहेब काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांच्यावर प्रेम करणारी हजारो माणसं शोकात बुडाली आहेत. लोकांना झोप नाही. रात्रभर लोक जागत आहेत, साहेबांच्या आठवणी जागवत आहेत. अशीच एक आठवण ऐकायला मिळाली.१९८० साली साहेब भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते, त्याचवेळी खानापूर आटपाडी मधून हणमंतराव पाटील यांची उमेदवारी होती. दोन्हीही मतदारसंघाची मोजणी विट्याला होती. या निवडणुकीत हणमंतराव पाटील साहेबांचा विजय झाला पण भिलवडी वांगीतून कदम साहेबांचा पराभव झाला.तेंव्हास त्याना भेटायला हणमंतराव साहेब आले आणि कदम साहेबांच्या गळ्यात पडून रडायला लागले. ते म्हणाले,” साहेब, मी विजयी झाल्याचा मला आनंद नाही,तुम्ही पराभूत झाला याच दुःख आहे.तुमच्या पराभवामुळे आपल्या जिल्ह्याचं खुप नुकसान झालंय.”एका मतदारसंघात विजयी झालेले आमदार हणमंतराव पाटील दुसऱ्या मतदारसंघात पराभूत झालेल्या पतंगराव कदम यांच्यासाठी रडत होते. आज ही दोन्ही मोठ्या मनाची माणसं आपल्यात नाहीत. हणमंतराव साहेब काही वर्षापुर्वी गेले. साहेब काल गेले. पण हा प्रसंग कधीही विसरता न येण्यासारखा आहे.
कदम साहेब मुख्यमंत्री झाले नाहीत, या पदानं त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. साहेब मुख्यमंत्री झाले नाहीत पण ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मात्र राहिले. त्यांचा रुबाब तोच राहिला,सत्ता असो अथवा नसो साहेब आणि गर्दी ,साहेब आणि गाड्याचा ताफा कायमच राहिला. आता ते सत्तेत नव्हते पण त्यांच्या दौऱ्याचा तोच थाट राहिला जो ते मंत्री असताना होता.साहेब आजारी आहेत अशा बातम्या येत होत्या तेव्हा लोक म्हणायची”काय होत न्हाय सायेबाला. बघ बघ येतील.पैल्यासारखं फिरतील.”लोकांना हा विश्वास होता. पण या भाबड्या लोकांना माहिती नव्हतं की साहेबांचा आजार खूपच गंभीर आहे.त्यामुळं अगदी काल रात्रीपर्यंत लोक तसाच विचार करत होते.”साहेब येणार.”पण अखेर साहेब आलेच नाहीत. आली ती साहेबांच्याबद्दलची वाईट बातमी.
आता लक्ष्मीच्या टेकावर साहेबाना डबा घेऊन येणारा पांडू तात्या कोणाची वाट बघेल ?गाड्या येतील ,गाड्या जातील.पण आता गाडीतून साहेब येणार नाहीत. कारण साहेब न येण्याच्या प्रवासाला गेले आहेत.
पांडू तात्या आणि साहेब यांची एक भेट मी पाहिली. पण ज्या लक्ष्मीच्या टेकान साहेब आणि तात्या यांच्या अनेक भेटी पाहिल्या ते निर्जीव टेकही साहेबांची बातमी ऐकून गहिवरले असेल.

-संपत लक्ष्मण मोरे.

 

 

Screen Shot 2018 03 10 at 11.53.09 AM

बाळंतपणात सून मेली आणि जन्माला आलेल्या नातवाला म्हातारीनं स्वताच्या थानाला लावलं. पोरगं नुसतच थानं वडायचं. पण दूध काय याचं नाय. घरात प्रचंड दारिद्य. दूध विकत घेऊन पाजायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्या म्हातारीने दुसऱ्याच्या बांधला हाडं घासून नातू मोठा केला. ग्रॅज्युयटपर्यंत शिकवला. घरात खायापियाचे वांदे. आता नातवाला कुठेतरी नोकरी मिळेल आणि घराला चांगले दिवस येतील या आशेवर म्हातारीनं इथपर्यंत रोजगार करून कसंतरी रेटलं. पण जगाच्या बाजारात नातवाला नोकरी देणार कोण? नातवानं नोकरीसाठी हजार उंबरे झिजवले. पण काही उपयोग झाला नाही. मग एका बाजारी म्हातारीने घरातली पितळेची भांडी नेऊन मोडली. आलेल्या पैशातून पुण्याला जायचा तिने निर्णय घेतला.
खेडेगाव सोडून उभ्या आयुष्यात शहर कधीच न पाहिलेली म्हातारी सांगली जिल्ह्यातल्या एका खेडेगावातून नातवाला घेऊन स्वारगेटला दिवस मावळायला उतरली. हातात एक कापडी पिशवी. त्यात वाळलेल्या भाकरी आणि चटणीची भुकटी. ती ज्या व्यक्तीला भेटायला आली होती त्या व्यक्तीच्या घराचा पत्ता विचारत विचारत सदाशिव पेठेतून पुढे लकडी पूल ओलांडून म्हातारी नातवासोबत डेक्कन कॉर्नरला आली. पण कोण म्हणायचं ती व्यक्ती कात्रजला राहती तर कोण म्हणायचं याच परिसरात राहती.
रात्रीच्या अकरा वाजता म्हातारी बी.एम.सी.सी कॉलेजच्या समोर एका छोट्याशा एकमजली बंगल्यासमोर पोहचली. रात्र झाल्याने बंगल्यात सामसूम. गेटवर असलेल्या वॉचमेनला म्हातारीनं हात जोडलं आणि म्हणाली,”लई लांबचा प्रवास करून आलीय बाबा! तेवढी सायबाची भेट घालून दे!तुज्या पाया पडती!” पण तुम्हाला आता भेटता येणार नाही. साहेब कधीच झोपलेत. तुम्ही सकाळी साहेबांच्या ऑफिसला जाऊन भेटा. असं त्या वॉचमेननं सांगितलं. पण काही झालं तरी येथून हलायचं नाही असं ठरवून आलेली म्हातारी तिथंच रस्त्याच्या कडेला नातवाला घेऊन बसून राहिली.
मध्यरात्री दोनची वेळ. सारं पुणे गाढ झोपेत गेलेलं. रस्त्याच्या कडेला अंधारात नातवासोबत डोळे लुकलुकत बसलेली म्हातारी. अशातच बंगल्यातील ती व्यक्ती जागी झाली. खिडकीतील नजरेने रस्त्यावर वडाच्या झाडाखाली बसलेली गावाकडची म्हातारी त्या नजरांनी बरोबर टिपली. एका क्षणात त्या बंगल्याच्या लाईटा पेटल्या. रात्रीच्या दोन वाजता त्या व्यक्तीने बंगल्याच्या खिडकीतून त्या म्हातारीला हाळी मारली. आणि पेंगाळून गेलेली म्हातारी क्षणात जागी झाली. अंगात गावाकडची बंडी आणि पट्ट्या पट्ट्याची साधी विजार घातलेली ती व्यक्ती खाली आली. मध्यरात्री वॉचमेनला चार शिव्या टाकून त्या म्हातारीला त्या व्यक्तीने स्वतः रस्त्यावर येऊन घरात नेली. ज्या व्यक्तीने त्या म्हातारीला घरात घेतली त्या व्यक्तीचं नाव होतं डॉ.पतंगराव कदम…
प्रचंड दारिद्र्यात आणि दुष्काळी पट्ट्यातल्या मातीत जन्माला येऊन आपल्या खेडवळ मातीतल्या माणसांना ओळखणारी ती व्यक्ती पतंगराव कदम होती. रात्रीच्या अडीच वाजता फुलागत जपलेल्या त्या म्हातारीच्या नातवाला त्याच्या राहण्या खाण्यासहित, स्वतःच्या शिक्षण संस्थेत फुकट नोकरी देणारा नेता या आधीही कधी महाराष्ट्रात जन्माला आला नाही आणि पुढेही येणार नाही. अशा हजारो नाही तर लाखो गरीब कुटुंबाना भाकरी मिळवून देणारा राजकारण आणि समाजकारणातला हा भक्कम वृक्ष आता कायमचा उन्मळून पडला…
भावपूर्ण श्रद्धांजली

– ज्ञानदेव पोळ

 

 

Screen Shot 2018 03 10 at 11.52.53 AM

पतंगराव कदम राज्यमंत्री असताना फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समित्यांचे उपाध्यक्ष होते. मी सदस्य सचिव असल्यानं नियमित भेटीगाठी व्हायच्या.
ते बोलायचे अगदी मोकळं ढाकळं. राजशिष्टाचाराचं कोणतंही ओझं न बाळगता अगदी हसतहसत सांगलीकडच्या लहेजात अधिकार्‍यांशीही ते बोलत असत. थेट मुद्द्यावर य्रेत.
एकदा माझं भाषण त्यांना आवडलं तर म्हणले, ” आ लगा लईच जंक्शान बोल्लासकी मर्दा.”
आमच्या एक प्रधान सचिव फारच तुसड्या होत्या. एका बैठकीत पतंगराव त्यांना म्हणाले, “तुमचं बिट्या कायमच तिरकं चालणार्‍या औताच्या बैलासारखं असतंया. वाईच सरळ बी चालावं माण्सानं.”
एका फाईलवर त्या सही करीत नव्हत्या. पतंगराव त्यांना म्हणाले,”अवो मॅडम, वाईच इचार करा जावा. सावित्राबाईच्या कामाला नायी म्हणतासा, ती माय जाली नस्ती तर तुम्ही आज मंत्रालयाऎवजी ढोरामागं फिरत बसला असता. करा जावा सई.”
ते पहिल्यांदा राज्य मंत्री झाले तेव्हा सर्वप्रथम एका नेत्याला भेटायला गेले.
पाच किलो पेढे, एक हजार रूपयांचा भलामोठा पुष्पगुच्छ आणि काश्मीरी शाल घेऊन.
नमस्कार झाला. हारतुरे झाले.
पतंगराव चुळबूळ करायला लागले, त्यांना एका कार्यक्रमाला जायची घाई होती.
शेवटी न राहवून ते म्हणाले, “सायेब, इथलं झालं असलं तर आम्ही निघावं का म्हणतो मी?”
साहेब म्हणाले, “मग निघा की, का थांबला आहात? तुमचं काम तर दहा मिनिटांपुर्वीच झालेले आहे. तरीही तुम्ही का थांबला आहात मला माहित नाही.”
पतंगरावांचा हिरमोड झाला. त्यांना वाटलं होतं, साहेब निदान सरकारी खर्चाचा चहा तरी देतील.
पण साहेब होते, विधान परिषदेचे सभापती, अगदी अस्सल पुणेरी !

– प्रा.हरी नरके

पतंगराव कदम प्राथमिक शाळेत शिक्षक होते तेव्हा ते मुलांना सांगत असत की एके दिवशी मी राज्याचा मुख्यमंत्री होईन. मुलांना त्यातलं फारसं काही कळत नसे. पण पतंगरावांची महत्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
सांगलीमध्ये त्यावेळी दोन प्रमुख गट होते. राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. पतंगराव दादांच्या आश्रयाला गेले. दादांनी त्यांना एस. टी. महामंडळावर संचालक नेमलं.
पतंगरावांना कार मिळाली. या कारने ते खूप हिंडले. ड्रायव्हरला ओव्हरटाइम मिळाला. त्या पैशातून त्याने घर बांधलं. घराचं नाव ठेवलं– रंग-पतंग (हे मी सांगलीमध्ये ऐकलं). 
पुढे पतंगरावांनी आमदारकीची निवडणूक लढवली. माझ्या आठवणीप्रमाणे पहिली निवडणूक ते हरले. त्याचं कारण होतं पोस्टल बॅलट. सातारा, सांगली जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्यात भरती होतात. त्यांची मत पोस्टाने येतात. या मतदारांपर्यंत पतंगराव पोचले नव्हते. म्हणजे पहिल्या निवडणुकीत. त्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. 
मात्र पतंगरांवाची आकांक्षा त्यामुळे कोमेजली नाही. विनाअनुदानित महाविद्यालयांचं धोरण दादांनी अमलांत आणलं. त्याचा पुरेपुर फायदा पतंगरावांनी घेतला. पुढे सहकारी साखर कारखानाही काढला. 
त्यानंतर त्यांनी आपला मतदारसंघ पद्धतशीरपणे बांधला. 
मंत्रिमंडळातील ते वरिष्ठ मंत्री होते. 
सांगली जिल्ह्याचा दराराच असा होता. पतंगराव, आर. आर. आबा, जयंत पाटील एका जिल्ह्यातले तीन-चार मंत्री. 
पतंगरावांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण ती आकांक्षा पूर्ण झाली नाही. 
त्यांना विनम्र आदरांजली.

– सुनिल तांबे. 

 

 

Screen Shot 2018 03 10 at 11.53.43 AM 1

साहेब मी नेहमी मिस करत राहीन तुम्हाला..!
दिवसभर काम करून थकलेलो, अंथरूणावर पाठ टेकली होती, झोपणार तेवढ्यात बातमी कळली पतंगराव कदम साहेब गेले, वाईट वाटलं, अगदी खूप… आणि माझ्या छोट्याशा काळातील पत्रकारितेच्या काही आठवणी जाग्या झाल्या. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना भोरला आले होते, मी पत्रकारितेत नवखा, मला तो दौरा कव्हर करण्यासाठी दैनिक प्रभातने पाठवलेलं… भोर मध्ये दोन कार्यक्रम, एक शासकीय आणि एक काँग्रेसचा मेळावा, शासकीय कार्यक्रमाला काँग्रेस नेते आणि मंत्र्यांबरोबर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. भोरला काँग्रेसचा आमदार असणं हे यांना पटणारं नव्हतं त्यामुळे राजकीय कुरघोडी होणार हे निश्चित होतं. अजित पवार भाषणाला उठले आणि त्यांनी भोरचा विकास कसा खुंटलाय याचा पाढाच वाचायला सुरुवात केली, तो पाढा काही संपेना, लोकांना असं वाटायला लागलं की काँग्रेसचा आमदार संग्राम थोपटे काहीच काम करत नाही… सगळा टांगा पलटी व्हायची वेळ, ही खेळी पतंगराव कदमांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ अजित पवारांच्या भर भाषणात, “अहो दादा अर्थ खाते तुमच्याकडे आहे, तुम्ही पैसे सोडा की, बघा आम्ही विकास करतो ते ” अस बसल्या जागेवरून म्हणाले आणि अजित पवारांची बोलतीच बंद झाली, भर सभेत हास्य पिकला… तो पाहून अजित पवारांना आपलं भाषणच आटोपत घ्यावं लागलं इतके पतंगराव कदम हा चाणाक्ष आणि धाडशी माणूस
2014 ची लोकसभा निवडणूक… मी तेंव्हा पुण्यात ‘मी मराठी’ला वृत्तवाहिनीला कार्यरत होतो, विश्वजित कदम काँग्रेसचे उमेदवार होते, तेंव्हा मी एक भरती विद्यापीठाचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्यांच्या थेट विरोधातली बातमी, त्याची चर्चाही विश्वजित कदम आणि पतंगराव साहेबांपर्यंत पोचली होती. यथावकाश निवडणूक पार पडली आणि विश्वजित कदम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला, (अर्थात त्याला मोदी लाट कारणीभूत होती) माणूस पराभूत झाल्यानंतर आपल्याकडे राजकारणातले सगळे बदले घेतले जातात आणि हिशोबही चुकते केले जातात, तसा मलाही निकालानंतर काही दिवसातच भारती विद्यापीठातून फोन आला की साहेबांना तुम्हाला भेटायचंय, मला थोडी धडकी भरली, सुरुवातीला वाटलं टाळावं जायचं, पण म्हटलं पाहुतरी काय होतंय, जाण्यापूर्वी फोन करणाऱ्याला परत एकदा विचारलं सुद्धा काही प्रॉब्लेम नाही ना म्हणून, तो म्हणाला येऊन भेटा फक्त, मी गेलो भरती विद्यापीठ भवन मध्ये, मला पतंगराव कदम साहेबांच्या केबिनमध्ये बसवण्यात आलं, साहेब अँटी चेंबरला होते, निरोप पोचल्यानंतर ते तडक केबिनला आले आणि सरळ सुरवात केली, “काय दत्ता कसा आहेस, काय चालू आहे तुझं सध्या, मस्त करतोस बातम्या लेका” साहेबांनी अशी काही बोलायला सुरुवात केली की बस्स, किमान गेल्या दहा वर्षांपासून त्यांची माझी घनिष्ठ मैत्री आहे… मी थोडा खजील झालो, मनात धाकधूक वेगळी आणि इकडं रिस्पॉन्स वेगळा, थोडा हलका झालो, तेवढ्यात एक पुष्पगुच्छ आणि शाल आली साहेबांनी शाल उचलली आणि सेवकाला म्हणाले “अर काय लेका मोठा पत्रकार आलाय आणि साधी शाल आणतो होय, जरा चांगली शाल आण की”, झालं सेवकांनी ठेवणीतली व्हीआयपी शाल आणली कदम साहेबांनी अगदी अदबीने अंगावर टाकली गुच्छ दिला मस्त चहा पाजला, गप्पा मारल्या… मला खरंच कौतुक आणि कमाल वाटली कदम साहेबांची माझ्यासारखा लहान पत्रकार विरोधात बातमी काय करतो, आणि हा माणूस बोलवून सत्कार करतो, अगदी आपुलकीने गप्पा मारतो, काय असेल मनात, इतक्या मोठ्या संस्था निर्माण करायचं त्या टिकवायचं राजकारणात मोठी उंची निर्माण करायची कैक दिवस ती स्थिर ठेवायची किती अवघड असतं हे सगळं, असे माझ्यासारखे किती माणसं जोडली असतील ना पतंगराव कदम साहेबांनी, माझा सत्कार केला म्हणून मी नंतरही कधी पतंगराव कदम साहेबांचा झालो नाही, पण मला आपलंसं करून घेण्याची त्यांची वृत्ती मात्र सलाम ठोकण्यासारखीच होती, ‘साहेब तुम्ही दिलेली ती शाल मी आजही नियमित पांघरायला वापरतो, पण आज पांघरूण घालणारच हरवला, “साहेब मी नेहमी मिस करत राहीन तुम्हाला”
दत्ता कानवटे, औरंगाबाद.

 

Screen Shot 2018 03 10 at 12.03.24 PM

 

भाषा आणि गावोगावच्या जाणिवा पुण्यात स्वारगेटला राहणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला समजावणारे आणि बिबट्या हा प्राणी कसा सुंदर असून धोक्यात आहे हे मला दोन तासाच्या भेटीत सांगणारे माननीय पतंगराव कदम यांना भावनांजली.
बोलभाषा या प्रकल्पासाठी माझी प्रेरणा जर कोणी असेल तर ते मा. पतंगराव कदम.
भाषा याविषयी आंध्र प्रदेशातील सन्माननीय राजे कृष्णदेवराय यांच्या विचारांची महाराष्ट्रात भाषा विषयी वर्ग सुरू करून मुहूर्तमेढ रोवणारे पतंगराव कदम हे शेता-मातीतले माय-बाप, शेतमालक, शेतमजूर यांच्या घराणे व कुटुंबियांना फार आपुलकीने जगवण्याचा स्रोत उभारण्यात गडगंज श्रीमंत असणारे राजकारणी होत.
ते वर्ष होतं 2013. एकदा सहज पत्रकारिता शिकताना मी साहेबांना भेटले. आपुलकीने बोलले. त्यांच्या भाषेत उतरवायला मी कमी पडेन. ऐकायला फार गोड वाटणारी पण रांगडी सांगलीच्या उच्चारांवरील पकड तशीच ठेवून ते बोलत होते. मी पहिल्यांदाच सांगलीची बोली ऐकत होते. “हं पोरी बोल. कुठच्या गावची?”
“मूळ सावंतवाडी”
सोनसळी माहितेय?
तुमच्याबद्दल दोन ज्येष्ठ पत्रकारांना विचारून आले. त्यांनी सांगितले होते. तेवढंच माहीत.
बरं. झ्याक आहे गाव. याल.
हो साहेब. एक दोन विषयावर बोलायचंय.. – मी
इचारलंय? टक्कूर कायम मारून ठेव. धाडकन इचारायचं.
मग मी सुरुवात केली.. बिबट्या कोल्हे वगैरे तुमच्याकडे खूप येतात. लोक घाबरतात. त्यांना मारतात. मला वाईट वाटत आलंय अशा बातम्या वाचताना. पत्रकार सांगतात की, बिबटे माणसाला शोधून खातात..
पोरी.. जीवाचा प्रश्न हाय. सांगतो. ऐक. पाहिजे ते लक्षात ठेवा. लिहून घेऊ नका. लिहिलं की इसरलं. आता मराठी बोलायचा प्रयत्न करतो. तुझी भाषा इथलीच दिस्तोय. तो भाषा पेठेपल्ल्याडची नाय. नसतील कोणी सांगली मिरजकडचे बाजूला कुठं.. तुमच्या. हात जवळपास जोडून ऐकताय म्हून बोलतोय.. ‘बिबट असो नाय का साप जनावर.. लय गुणी. असंच येतंय झोडपतंय पळतंय असं हुत नाय. (तुझ्यागत भाषा जमना. करतोय प्रयत्न.) येऊ येऊन बिबट जागा बघून जातोय. भरल्या पोटी चक्कर मारत अस्तोय वाटायचंय. फॉरेस्टाच्या आॅफिसात पोरं सांगतात झ्याक. बिबट लय संवेदनशील. जग इस्कटलं. मंत्रीय. जमेल तेवढेच लिव्ह पुढं काय लिवल्यास…. (गाळतेय इथे बोलले ते. ते ज्ञान माझ्यासाठी राखीव होतं).. तर भाषा बिबटशी जोडलीय. मातीत काम करणारे गडी त्यांच्या बाया, पोट्टी पोरी आणि नकलाकार (याला खास शब्द त्यांनी वापरला. लयच वंगाळ. म्हणून मी पर्याय वापरलाय. सांगलीकरांना माहीत असेल.) लोक अशे लय लय वेगळे असतेत लोक गावात. फटकूर, फटकूरं, कापड, कपडा, चिंधी, लंगोटी, कास्तरा, कासरा, कासवटा, काच, पटका, पागोटा, झंपली (ही कशी असते ते साहेब स्पष्ट करू शकले नाहीत. त्यांच्या आईची शेजारीन कसलं वेगळं कापड वापरायची म्हणे पोरांना पुसायला) झबली, फर्राक, पेटिकोट फर्राक, आंगली, टोपडी, टकूरली अश्शी लय कापड आपल्याकडं हायती. पण इंग्लिश बोलणारं वंगाळ बोलंल, हिंदी चाकराला शबुद बोला येईल नाय यील. पण मी बोल्तोय तस्साच आवाज पोरग पण नाय काढू शकत. यश्टीत कामाला हुतो. म्हंजी नेमणूक साहेबांनी दिलेली. चाकरी नाय गाडी शान देऊन दिली. मी पळीवलीच लय. अमीर झालं ते पळीवणारं (ड्रायव्हर)..
तर ते पळीवणारं आणि गाडी मारणारी दोन चार टाईप असतैत. एक कोण पैका आल्याव शिक्तय. कोण पैक नाय म्हूण. कमवतेत दोन्नी. पण फरक अस्तोय. जीपीत बसल्या का कधी.
मी – नाही.
घेशील जीप कार पुढं.
तितक्यात फोन खणखणला. बोलले. माझे कानावर हात. (पत्रकारितेतला पहिला धडा)
मग पुन्हा.. भाषा कशी किसन राजासारखी शिकवाय यायला पाहिजे. आंध्रात मोट्टा राजा तो. लय काम केलेला. एक्कार अधिक भाषांच इद्यापीठ काढलेलं त्याने तवा..
अलीकडेच भाषा तज्ज्ञ डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली सरांचे निधन झाले. त्यांनी राजा कृष्णदेवराय यांविषयी सविस्तर चरित्र लिहिले आहे. त्यात साहेबांनी सांगितलेल्या विद्यापीठाचा उल्लेख आहे. मी तेव्हा जरा हलक्यात ऐकून सोडलेलं. बिबट्या महत्त्वाचा वाटलेला तेव्हा.
नंतर अजून चिक्कार बोलले. जाताना म्हणाले.. अशेच कान तयार करा. ह्या ऐकायची सवय चांगली. मी कधीनाही ते माझे विचार मागे टाकून त्यांच्या पाया पडायला वाकत होते.
म्हणाले.. वाकू नै. मराठी आणि गावच्या भाषा ताठ मानेने जगव.
आशीर्वाद होते तेच त्यांचे.
परत कधी भेटीचा योग आला नाही. फोनवर दोनदा बोललो पण तुटक. पण तो दिवस कानात साठवून ठेवला. बिबट, गावची माती आणि भाषा दोन तासात लळा लागलेला असा राजकारणी विरळाच.
वर्ष 2018 मला सतत जाणीव करून देतंय. नम्रता धाव. वेळ काळाशी संगनमत करून महाराष्ट्रातील ढाण्या वाघांना आपल्यासोबत घेऊन जातोय. तू आज संथ चाललीस तर भाषा आज कशी आहे ते कळेल पुढच्या पिढीला. पण बापजाद्यांची जमिनीत राबताना झालेली भाषेची वीण मात्र उसवलेली असेल,उधेडलेली असेल.
माननीय पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ बोलभाषा प्रकल्प त्यांच्या मातीत सुरू करून तिथून काम पुढे न्यावा असा विचार समोर येतो आहे. हाच विचार त्यांच्यातील शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या महत्त्वाकांक्षेला मी दिलेली स्मरणांजली असेल.
आजपासून एक वर्षांच्या कालावधीत बोलभाषा जे काम करेल ते पहिल्या स्मृती दिनादिवशी माननीय पतंगराव कदम यांना अर्पण करेन.
नम्रता!
काका, तुम्ही आणखी काही वर्षे रहायला हवे होता.

– नम्रता देसाई 

 

Leave A Reply

Your email address will not be published.