विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते. दोन्हीही मतदारसंघाची मतमोजणी विट्याला होती.

या निवडणुकीत हणमंतराव पाटील विजयी झाले पण भिलवडी वांगीतून कदम यांचा पराभव झाला.

पतंगराव कदम यांच्या पराभवाची बातमी जेव्हा हणमंतराव पाटील यांना समजली तेव्हा ते तातडीने कदम राहत असलेल्या एसटी स्टॅण्डजवळ असलेल्या निवासस्थानी आले. आल्या आल्या ते पतंगराव कदम यांच्या गळ्यात पडून रडायला लागले.

“पतंगराव कदम यांच्या सारख्या कर्तबगार माणसाचा पराभव व्हायला नको होता.”अस ते म्हणाले.

” साहेब, मी विजयी झाल्याचा मला आनंद नाही,तुम्ही पराभूत झाला याच दुःख आहे.तुमच्या पराभवामुळे आपल्या जिल्ह्याचं खुप नुकसान झालंय.”

आज पतंगराव कदम आणि हणमंतराव पाटील हे दोन्हीही नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत.या दोघांचे वारसदार आपआपल्या मतदारसंघात लढत आहेत. डॉ विश्वजित कदम हे काँग्रेस कडून तर सदाशिवराव पाटील अपक्ष लढत आहेत.

पलूस कडेगाव मतदारसंघ जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडल्याने कदम यांच्यासाठी निवडणूक सोपी असल्याची खात्री त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. पलीकडच्या मतदारसंघात सदाशिवराव पाटील यांची लढत शिवसेनेच्या अनिल बाबर यांच्याशी होत आहे. पाटील आणि कदम यांच्या विरोधातील उमेदवार शिवसेनेचेच आहेत हा एक योगायोग आहे.

एका मतदारसंघात विजयी झालेले आमदार हणमंतराव पाटील दुसऱ्या मतदारसंघात पराभूत झालेल्या पतंगराव कदम यांच्यासाठी रडत होते. हा घटनेनंतर डॉ पतंगराव कदम जेव्हा जेव्हा विट्याला कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले तेव्हा हा प्रसंग सांगून गहिवरत असत.

(संपत मोरे यांच्या फेसबुक वरून साभार)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.