दाऊदच्या वादामुळे गडकरींना सेटबॅक बसला नाहीतर आज त्यांचं भाजपवर राज्य असतं

२०१२ सालातल्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट…गोष्ट कसली वादच म्हणा..तोही नितीन गडकरी यांच्याबाबतचा. तसं तर नितीन गडकरी आणि वादग्रस्त राजकारणाचा फारसा असा सबंध येत नाही. मात्र राजकारणी म्हणलं कि कधी काय आणि कोणत्या गोष्टींचा वाद उद्भवू शकतो सांगता येत नाही. तुम्हाला आठवत असेल तर एक असाच वाद निर्माण झालेला गडकरी यांच्या बोलण्यामुळे..बिचारे गडकरी बोलायला एक गेले झालं भलतंच…

भोपाळमध्ये एका एका पुरस्कार सोहळ्यातील भाषणात त्यांनी मी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांची तुलना केलेली.

त्याचं झालं असं या भाषणात गडकरी बोलण्याच्या ओघात बोलून गेले,

 “मानसशास्त्रात, आपण लोकांची बुद्ध्यांक पातळी मोजतो… परंतु ते व्यक्तीनुसार ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर कोणत्या क्षेत्रात करतात यावर अवलंबून असते.”

“जर आपण स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या बुद्ध्यांक पातळीची तुलना करू शकलो असतो, तर ते जवळजवळ समान आहेत. परंतु त्यांच्या जीवनाची दिशा खूप वेगळी आहे. विवेकानंदांनी त्यांच्या बुध्याकांचा उपयोग राष्ट्र उभारणी, बंधुता आणि अध्यात्मवादासाठी केला तर दाऊदने त्याच्या बुध्याकांचा विध्वंसक हेतू, गुन्हेगारी जगतात उत्कृष्ट कामगिरी करणे,हिंसा घडविण्यासाठी केला” असंही ते म्हणाले..

पण मुद्दा असा झाला कि, गडकरींच्या या स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम तुलनेच्या थेअरीला लोकांनी विरोध केला. मग काय यावर राजकीय टीका-टिप्पण्या चालू झाल्या. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह रि ट्वीट करत “भोपाळमधील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की “स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमचा बुद्ध्यांक समान होता” मोदी आणि त्यांच्या भक्तांकडून काही टिप्पणी? असा उपरोधिक टोला त्यांनी या मुद्द्याला लगावला होता. याशिवाय इतर राजकीय नेत्यांचा याला विरोध होत होता.

पण हा वाद टीका-टिप्पणीवर थांबला नाही.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तुलना करून स्वामी विवेकानंदांच्या लाखो अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल नितीन गडकरी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करणारी एक तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते असलेले वकील हर्षद भट्ट यांनी स्थानिक न्यायालयात दाखल केली होती.  जामनगर जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते असलेले वकील हर्षद भट्ट यांनी दाखल केलेल्या तक्रारीत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांच्यावर योग्य फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती कारण सीतारामन यांनी गडकरींनी केलेल्या टिप्पण्यांचे समर्थन केले होते म्हणून त्यांचा देखील या तक्रारीत उल्लेख केला होता.

भट्ट यांनी आयपीसीच्या कलम 295 (जाणीवपूर्वक  आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये, धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने) आणि 298 (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावनांना जाणीवपूर्वक दुखापत करण्याच्या हेतूने उच्चारणे, शब्द इ.) अंतर्गत दंडात्मक कारवाईची मागणी केली.

वाढता विरोध पाहता गडकरी यांनी सावध भूमिका घेत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या एका कार्यक्रमात गडकरींनी,

 “मी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्यात कोणतीही तुलना केली नाही… मी म्हणालो की जर एखाद्याच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर माणूस विवेकानंद बनू शकतो नाही तर त्याउलट बनू शकतो. मी बोललो त्याचा उलट अर्थ काढला गेला” खरं तर स्वामी विवेकानंद हे माझे नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत,” असंही गडकरी म्हणाले होते. 

त्यावर भाजप नेते गडकरी यांची बाजू मांडत होते कि, “गडकरींनी  विवेकानंदांची तुलना दाऊदशी केली नाही, त्यांनी फक्त फरक मांडला होता, गडकरी फक्त एक तथ्य सांगत होते”” भाजप नेते बलबीर पुंज यांची अशी भूमिका घेतली होती. .

असं वक्तव्य करून गडकरींनी स्वत:च आपल्यावरील संकट ओढवून घेतलं होतं. तशी तर त्यांनी अनेक संकटांना निमंत्रणे दिलीत. पण स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम या दोघांचा बुद्ध्यांक सारखाच असल्याचे सांगून त्यांनी देशातील स्वामींच्या भक्तांना दुखावले होतं त्यामुळे त्यांनी संघाकडे आपल्याला वाचवण्याची अपेक्षा ठेवली..पण संघाने ने वेगळीच काहीतरी भूमिका मांडलेली.

“आम्ही गडकरींचे ‘गॉडफादर’ नाही” असं भैय्याजी देशमुख या संघाच्या सरकार्यवाहांनी वक्तव्य केलेलं.

दरम्यान मनोहर पर्रीकरांनीही गडकरींना त्यांच्यावरील आरोपांना विश्वसनीय उत्तर देण्याचे आवाहन केले होते. तर माझ्यावर आरोप झाले म्हणून मला मुख्यमंत्रिपद सोडायला लावले. आता गडकरींवर आरोप झाले तरी त्यांना का काढले जात नाही असा प्रश्न कर्नाटकच्या येदियुरप्पांनी संघाला आणि भाजपाला विचारला होता.

यावर ‘गडकरींचे अध्यक्षपदी राहणे वा न राहणे हा भाजपाचा प्रश्न आहे, आमचा नाही’ असे सांगून संघाने हात वर केला होता. 

याच काळात गडकरींनी राज्यसभेचे तिकीट दिलेले अजय संचेती हे त्यांचे निकटवर्ती स्नेही झारखंड, छत्तीसगड आणि कर्नाटकातील खाण घोटाळ्यांत अडकले होते. त्यांची रीतसर चौकशी सुरू झाली होती. गोसीखुर्द या राष्ट्रीय महत्त्वाच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात झालेल्या प्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या भांगडिया या इसमाला गडकरींनी याच काळात महाराष्ट्र विधान परिषदेचे तिकीट देऊन निवडून आणले होते. ही दोन माणसे राज्याच्या व विशेषतः भाजपाच्या राजकारणात कधी आघाडीवर नव्हती. त्यांतल्या भांगडियाचे तर नावदेखील राजकारणाला तोवर ठाऊक नव्हते.

पक्षातील जुन्या व अनुभवी कार्यकर्त्यांना मागे ठेवून नव्याने श्रीमंत झालेली माणसे अशी पुढे करण्याचे गडकरींचे राजकारण भाजपातील कार्यकर्त्यांएवढेच संघालाही अस्वस्थ करणारे ठरले. 

संघाचीही नाराजी झाल्याचा परिणाम झाला. नितीन गडकरी यांची भाजप अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. क्षमता असुनही गडकरी भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातून काहीसे बाजूला फेकले गेले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.