युपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….!!!

प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार सायेब..

पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं..

मग मी प्लॅस्टिक हाय समजा सायेब…

मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग…

कट टू युपीचा निकाल. योगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री. अखिलेश यांचा पराभव. मायावती मैदानात सुद्धा नाहीत. कॉंग्रेस युपीतून हद्दपार..

आणि राजाभैय्या सलग सातव्यांदा विजयी. १९९३ पासून २०२२ पर्यन्त. सलग सात वेळा. ते देखील मोठ्या मताधिक्क्याने. या काळात युपीच्या मुख्यमंत्रीपदाच्या पदावर मुलायम आले, त्यानंतर मायावती आल्या, कल्याणसिंग आले, राजनाथसिंग आले.. पुन्हा मायावती, मुलायम हा खेळ होवून अखिलेश आले. नंतर योगी आदित्यनाथ आले. या सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळात एक गोष्ट कॉमन राहिली ती म्हणजे कुंडा च्या गुंडाचा दरारा..

तर ही गोष्ट आहे उत्तर प्रदेश मधील माजी मंत्री रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैय्याची.

त्यांचा जन्म पूर्व भद्री संस्थानातील राजघराण्यातला आहे. आज जरी राजेशाही मागे पडली असली तरीही आजही राजा भैय्याच्या महालात दरबार भरतो. आजही दरबारात बोललेला त्यांचा शब्द म्हणजे तिथल्या लोकांसाठी कायदाच आहे. राजा भैय्याची त्यांच्या भागात इतकी दहशत आहे कि त्यांच्या विरोधी उमेदवार स्वतःचे पोस्टर्स सुधा निवडणुकीत लावत नाहीत. राजा भैय्याचं आयुष्य म्हणजे सामान्य माणसाला न सुटलेलं एक कोडंच आहे.

तर भाई लोक सुरवातीपासून सर्व सविस्तर सांगतो. राजा भैय्याचा जन्म १९६९ साली झाला. राजा भैय्याने शालेय शिक्षण झाल्यानंतर लखनौ विद्यापीठातून १९८७ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. १९९३ साली त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पहिल्यांदा कुंडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवली. त्यात संपूर्ण राज्यात सर्वात जास्त मते घेऊन ते निवडून आले. तेव्हा पासून सलग सातवेळा ते तेथून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

राजा भैय्या सुरवाती पासूनच अपक्ष जरी राहिले असले तरी ते नेहमी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या छत्रछायेत राहिले आहेत.

राज्यात सरकार कुणाचंही असो कुंडामध्ये मात्र कायदा चालतो तो राजा भैय्याचाच.

पोलिसांच्या रेकॉर्ड्स मध्ये राजा भैय्यावर अनेक आरोप आहेत मग त्यात लुटमार ,खुनाचा प्रयत्न,अपहरण,दंगे घडवणे, खतरनाक हत्यारं बाळगणे आणि फसवणुकीचे असे सर्व मिळुन आठ हून अधिक गंभीर गुन्हे राजा भैय्यावर दाखल आहेत. त्यातच प्रतापगड च्या DSP च्या खुनात ही त्यांचे नाव आहे. राजा भैय्या दोन वर्ष तुरुंगात राहिले ते मायावतीच्याच काळात.

हे सगळं करूनसुद्धा राजा भैय्या नेहमीच कायद्याच्या कचाट्यातून निसटताना दिसतात. त्यामागे त्यांनी वेळोवेळी घेतलेला किंबहुना त्यांना मिळालेला राजकिय आश्रय आहे  १९९० च्या दशकात राजा भैय्या भाजपच्या जवळचे मानले जायचे. भाजपच्या सत्ता काळात आधी मुख्यमंत्री कल्याण सिंग आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री राजनाथ सिंग यांनी राजाभैय्याला आश्रय दिला. या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा राजा भैय्यावर वरदहस्त होता.

पुढे मात्र सन २००२ ला जेव्हा मायावती मुख्यमंत्री झाल्या तेव्हा मात्र त्यांनी राजा भैय्याची गय केली नाही. मायावतींनी राजा भैय्याला आणि त्यांचे वडील दोघांनाही जेलमध्ये घातले. मायावतींनी तर त्यांच्यावर आतंकवादी विरोधी कायदा POTA लावला. २००३ मध्ये मायावतींच्या आदेशावरून राजा भैय्याच्या घरावर छापे मारण्यात आले. त्यात राजा भैय्याच्या घरातून अनेक बंदुका, शेकडो गोळ्या आणि एक एके ४७ रायफल सापडली.

महालाच्या मागे असलेलेल्या तलावातून पोलिसांना एक माणसाची कवटी सापडली. स्थानिक लोकांमध्ये अशी धारणा आहे कि राजा भैय्या त्यांच्या शत्रुनां मारून महालामागे असलेल्या तलावातील मगरींना खायला टाकतात. असं म्हंटलं जातं पोलिसांना तिथे जी कवटी सापडली होती ती संतोष मिश्र याची होती संतोष मिश्रची स्कूटर राजा भैय्याच्या गाडीला धडकली होती म्हणुन राजा भैय्याच्या लोकांनी त्याला मारून महालामागील तलावात टाकले होते.

मायावतींनी राजा भैय्याला एकवीस महिने जेलमधेच ठेवले. तेवढ्यात सरकार बदलले आणि मुलायमसिंग मुख्यमंत्रीपदी बसले. २००४ साली  मुलायम सिंग यांनी राजा भैय्याला बाहेर काढले. खुद अखिलेश यादव राजा भैय्याला जेल मधून आणण्यास गेले. तेव्हा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या ,

‘जेल के ताले तुट गये राजा भैय्या छुट गये ‘.

मुलायम सिंग इथेच थांबले नाहीत तर त्यांनी राजा भैय्या वर चालू असलेले सर्व खटले मागे घेतले आणि विशेष महणजे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद ही दिले. पुढे अखिलेश सरकार मध्ये पण ते मंत्री राहिले .

राजा भैय्या ला आयुष्यात अनेक शौक आहेत. ते खरोखरच एक “किंग साईज” आयुष्य जगतात. त्यांना त्यांच्या भागातून बुलेट वरून जोरात रपेट मारायला आवडते ,त्याच बरोबर त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे , त्यांना विलायती जातींची कुत्री पळण्याचाही शौक आहे. हे झाले जमिनीवरचे राजा भैय्याला आकाशात उडायला ही प्रचंड आवडते ते त्यांचे micro light विमान स्वतः उडवतात ते कोणत्याही  परवान्या आणि लायसन्स शिवाय.

एकदातर त्यांनी हे विमान एका रस्त्यावर उतरवले, हो रस्त्यावर! या शिवाय राजा भैय्याकडे अनेक प्रकारच्या बंदुका आहेत जेव्हा कि त्यांच्याकडे लायसन्स मात्र दोनच बंदुकांचे आहे.

आजही CBI राजा भैय्याची अनेक केसेसमध्ये आजही चौकशी करत आहे. DSP जिया उल हकचा खुनाचा आरोपही त्यांच्यावर आहे. हे गुन्हेगारीचे आरोप असूनसुद्धा राजा भैय्याची  कुंडा विधानसभा  मतदारसंघात लोकप्रियता काहीच कमी झालेली नाही . आजही ते त्यांचे ‘ राजा’ आहेत.

योगी सरकारने उत्तर प्रदेशातील बाहुबलींचे राज्य संपवण्याची घोषणा केली होती. यात त्यांचा रोख राजा भैय्या यांच्याकडेच होता असं म्हटलं गेलं. एका किरकोळ कारणावरून राजा भैय्या यांच्या वडिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

हाथरस कांड झाल्यावर योगीजींवर सगळीकडे जोरदार टीका होत होती तेव्हा राजा भैय्या यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या मायावतींवर ट्विटर वरून अप्रत्यक्षरीत्या प्रहार केला.

जनसत्ता दल लोकतांत्रिक पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. आत्ता ते सातव्यांदा निवडून आलेत. काहीही केलं तरी ते निवडून येतात हेच खरय..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.