माजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून आले…
सालं होतं 1982.
हरियाणामध्ये 90 जागेसाठी विधानसभा निवडणुक झाली होती. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस पक्षाला 35 जागा, लोकदल पक्षाला 31 आणि लोकदलासोबत युती केलेल्या भाजप पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती. सगळा निर्णय राज्यपालांच्या हाती होता.
त्यावेळी हरियाणाचे राज्यपाल होते महाराष्ट्राचे जेष्ठ कॉंग्रेस नेते गणपतराव तपासे.
हरियाणा कोण बहुमत सिद्ध करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं. राज्यात आमदार फोडाफोडीचं सत्र सुरू झालं. दोन्ही पक्षांनी आपले आमदार नजरकैदेत ठेवले होते.
लोकदलाचे नेते होते देवीलाल. ते हरयाणाचे मुख्यमंत्री राहिलेले. त्यामुळे राज्यात त्याचं वजन होतं.
राजकारणातला त्यांचा अनुभव दांडगा होता.
तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते होते भजनलाल बिश्नोई. राजकारणात त्याचंही वजन होतं. फोडाफोडीच्या राजकाणात ते पटाईत होते. 1979 साली मुख्यमंत्री असलेल्या देवीलाल यांचे 40 आमदार फोडून ते स्वत: मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे ही लढाई अटीतटीची बनली होती.
देवीलाल आणि भजनलाल यांनी दोघांनीही राज्यपालाची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आपल्याकडं बहुमताचा आकडा असून सिद्ध करण्यासाठी बोलवण्यात य़ावं, अशी शिफारश राज्यपालांना केली.
राज्यपाल आता काय निर्णय घेतात आणि कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलवताय हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं. मात्र राज्यपालांनी भजनलाल यांना बोलवलं. लगेच भजनलाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याचवेळी त्याच्यासोबतच्या काही आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
ही बातमी देवीलाल यांना समजताच त्यांचा पारा चढला.
त्यांनी आपल्यासोबतच्या सगळ्या आमदारांना सोबत घेतलं. अन् राजभवनावर पोहचले. त्याच्यासोबत आलेले आमदारही रागात होते. आल्याबरोबर त्यांनी राज्यपालांना सगळे आमदार मोजून दाखवले आणि आपल्याकडं बहुमताचा आकडा असल्याचं सिद्ध केलं.
देवीलालनी राज्यपालांना भजनलाल यांचं स्थापन केलेलं सरकार ताबडतोब बरखास्त करून टाका असं सुनावलं.
मात्र, राज्यपाल तपासे यांनी देवीलाल यांचं ऐकलं नाही.
देवीलाल आणि राज्यपाल यांच्यात बाचाबाची आणखीनच वाढत गेली. आमदारांचाही राग अनावर झाला. एकएकाला गोळ्या घालू, हे हरियाणा आहे, तुम्हाला माहित नाही, अशी भाषा आमदार बोलायला लागले. राजभवनात नुस्ता गदारोळ माजला होता, आरडाओरड सुरू होती. सगळे राज्यपालावर तुटून पडले होते.
मात्र, केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. तसंच राज्यपाल गणपतराव तपासे अगोदर काँग्रेसचे पक्षाचे नेते होते. त्यामुळे केंद्र सरकार आणि भजनलाल यांच्यामध्ये राज्यपाल बळीचा बकरा बनले होते.
त्यामुळे राज्यपाल देवीलाल यांचं ऐकून घेत नव्हते, मात्र त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द देखील नव्हते. देवीलाल यांचा पारा आणखी चढला. त्यांनी राज्यपालाची यांची काॅलर पकडली आणि ओरडून म्हणाले,
तुम्ही इंदिरा गांधीचे चमचे आहात, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही या देशाच्या लोकशाहीचं काय केलं आहे ते!
तेवढ्यात राज्यपालांनी कॉलरवरचा देवीलाल यांचा हात झटकला, हात झटकताच देवीलाल यांनी राज्यपालांच्या जोरदार कानफडात वाजवली. अन् ते तिथून रागारागात निघून गेले.
मात्र, त्यानंतर हे प्रकरण दिल्लीपर्यंत गेलं. त्याचे पडसाद हरियाणामध्ये उमटले. मात्र देवीलाल यांनी माघार घेतली नाही. त्यांनी राज्यपालाविरोधात आंदोलने केली. भजनलाल यांना बहुमत सिद्ध करता येवू नये म्हणून आमदार लपवले. मात्र तरीही भजनलाल यांनी देवीलाल यांचे आमदार फोडून बहुमत सिद्ध करून दाखवलं आणि पुन्हा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले.
हे ही वाच भिडू.
- सुप्रीम कोर्टाने बंडखोरी घटनाबाह्य ठरवली, राज्यपालांना राजीनामा द्यावा लागला होता.
- बंदुकीच्या धाकात नजरकैदेत असणारे आमदार फोडून हा नेता मुख्यमंत्री बनला होता!
- जावयाचं मंत्रीपद टिकावं म्हणून दिल्लीला गेले, तिथ कळालं तो मुख्यमंत्री झालाय.
I want to join ur community
हा वाद त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, राज्यपाल गणपतराव तपासे यांनी कायद्याचा कोणताही भंग केलेला नाही.