देशभरातील पुरुष म्हणतायेत, मी हुंडाच घेतला नाही तर पोटगी का देऊ?

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण कुणाला माहित नसेल तर आश्चर्यच! आणि ज्यांना माहित नव्हती त्यांना या कोरोना काळाने चांगलीचं ओळख करून दिलीये या म्हणीची. बाबा किती लग्न झाले या काळात! सोशल मीडिया लॉग इन केलं नाही की स्टेटसवर लग्नाच्याच बातम्यांचा धुमाकूळ. एकीकडे लग्न होताना दिसताय तर दुसरीकडे तशाच स्पीडने घटस्फोटाच्याही बातम्या ऐकू येताय.

भरीस भर म्हणजे या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मॅरिटल रेपचा कायदा बनवण्याच्या विषयाला हात लावला. लग्नानंतर बायकोच्या परवानगीशिवाय सेक्स केलं तर त्याला रेप म्हणून ग्राह्य धरल्या जाईल, असा कायदा बनवण्यामागचा मुद्दा आहे. पण जर बायकोने तिच्या मर्जीने परपुरुषाशी संबंध प्रस्थापित केले तर त्याला अपराध म्हणता येणार नाही असं, कोर्टाने आधीचं सांगितलं होतं.

बस्स! आठवडा भरात जे काही लग्न, लग्न आणि लग्न वाजवण्यात आलं त्याचा परिणाम म्हणजे सोशल मीडियावर एक हॅशटॅग सध्या चांगलाच वाजवला जातोय. तो म्हणजे #MarriageStrike

आधीच हुंडा, डोमेस्टिक वायलन्स अशा घटनांमध्ये स्त्रिया पुरुषांना त्रास देतात, असं पुरूष म्हणतात. आता त्यात अजून असे कायदे येणं आणि घटस्फोटाची प्रकरणं वाढणं याने ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत नाचत फिरणाऱ्या मंडळींमध्ये अचानक लग्नाचा फोबिया झाल्याचं दिसतंय. मॅरेज स्ट्राईक या हॅशटॅगने हे लगेच जाणवतंय. 

सुप्रीम कोर्टाच्या या कायद्याला घेऊन सोशल मीडियावर खूप मिम्स आल्याचं दिसतंय. त्यात सेलिब्रिटी लोकांच्या घटस्फोटाच्या घटना ऐकू येताय, ज्याचा परिणाम सामान्य माणसांवर होताना दिसतोय. सेलिब्रिटींचं ठीक आहे हो, त्यांच्यात घटस्फोटानंतर ॲलिमनीचं इतकं काही नसतं. आता सामंथा रुथप्रभु या अभिनेत्रीचंच बघा ना. तिने डिवोर्सनंतर एकही रुपया घेतला नाही. कारण तीच म्हणणं आहे की ती इंडिपेन्डन्ट स्त्री आहे. धनुष्य आणि ऐश्वर्याच्या बाबतीतही काही असंच ऐकू येण्याची शक्यताय.

मात्र इथे मुद्दा येतो सामान्यांचा. घटस्फोटाचा निर्णय वाईट असतो की चांगला? हा मुद्दा नंतर केव्हा बोलू. 

पण आता पुरुषांचं दुखणं आहे ते घटस्फोटानंतरच्या पोटगीचं, लिमनीचं. बरं, आधी पोटगी काय ते समजून घ्या…

ॲलिमनी, पोटगीचा खरा अर्थ असा की, हे एकवेळचं सेटलमेंट पेमेंट असतं जे घटस्फोटाच्या वेळी पती आणि पत्नी दोघेही एकमेकांना देऊ शकतात. म्हणजे एकमेकांपासून दूर होताना संपत्तीचा काही वाटा दुसऱ्याला देणं, जेणेकरून त्याच्या पुढच्या आयुष्यात मदत होईल. पण नेहमी हे पुरुषांनाच स्त्रियांना द्यावं लागतं, असं या हॅशटॅग मोहीमेतील पुरूषांचं दुखणंय.

सोपं करून सांगताना आमच्या एका भिडूच्या मामाचं ताजं उदाहरण देतोय. आमच्या भिडूच्या मामाच्या लग्नाला सहा महिने झालेत आणि एका महिन्याच्या आत मामी घरातून गेल्यायेत. नांदायचं नाही म्हणताय. कारण काहीही असो पण आता विषय आलाय घटस्फोटावर आणि मामा फुल्ल टेन्शनमध्ये हाय. मामी ॲलिमनी म्हणून ७ लाख मागताय. मामाचं म्हणणंय एक महिनाही नीट सोबत चालू न शकलेल्या व्यक्तीला अर्धांगिनी कसं म्हणू आणि ७ लाख काय म्हणून देऊ? आयुष्याची कमाई जातेय आणि त्यातही हुंडा पण मिळाला नव्हता. तो विषय असता तर किमान ते परत घेण्याचा हक्क होता भो तिला.

हाच मुद्दा हॅशटॅग मोहीमेतील सगळ्या पुरुषांचा बनलाय भिडू. त्याचमुळे #MarriageStrike ट्रेंडिंगवर आलंय. हुंडा नाही तर पोटगी का? असाच प्रश्न आहे. ज्यावरून कळतंय की, पुरुषांमध्ये भीती निर्माण झालीये पोटगीबद्दल. यातून एक प्रश्न आमच्या डोक्यात आला. खरंच डिवोर्सनंतर पोटगी मिळणं इतकं सोपं आहे का? आणि त्याचं उत्तर घेऊन तुमच्या समोर मांडतोय..

तर महिलांनी मागितलं आणि त्यांना भेटलं इतकं सोपं हे नसतं. तुमची सिच्युएशन, डॉक्युमेंट, पगार असं सगळं कोर्ट बघतं. दोन्हीं पक्षांना फेअर चान्स दिला जातो आपला मुद्दा मांडण्याचा. त्यातही जो जास्त आर्थिक रूपाने सक्षम असेल त्यानेच वीक घटकाला पोटगी द्यायची असते. मग तो कुणीही असो, स्त्री किंवा पुरुष. आणि ॲलिमनी किती द्यावी याचाही क्रायटेरिया असतो. पण त्यासाठीसुद्धा पोटगी ज्याला दिली जाणारे तो खरंच एलिजिबल आहे का नाही, हे ठरवण्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं.

आता पोटगीची तुलना होतेय ती हुंड्याशी. तेव्हा हुंड्याचा कायदा काय, हेही बघा… 

हुंड्याबद्दल बघितलं तर तो देणं गुन्हा आहे मात्र जर मुलीकडच्यांनी स्वखुशीने काही दिलं असेल तर ते हुंड्यात गणल्या जात नाही. यात कोणतीच कायद्याची प्रक्रिया नाही, फेअरनेस नाही. पण पोटगी ही खूप मोठी आणि सविस्तर कायदेशीर प्रक्रिया आहे.

मॅरेज स्ट्राईक हॅशटॅगमुळे एक मात्र स्पष्ट दिसतंय की, सोशल मीडियावर पोरगीला व्हिलनचं रूप आलंय. तसंच हा मुद्दा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याचा मुद्दा याने स्त्रियांना गन पॉइंटवर आल्याचं दिसतंय.

 कुणाच्या पॉइंटवर? तर या हॅशटॅग मोहिमेतील पुरुषांच्या. पण नेमकं काय होतंय आणि कायदा काय हे तुमच्यासमोर मांडण्यात आलंय. तेव्हा आता हुंडा आणि पोटगी या दोन्ही गोष्टींना एकत्र ठेवणं आणि तुलना करणं कितपत योग्य आहे, हे ज्याने त्याने नीट विचार करून ठरवावं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.