भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या तयारीला लागलं आहे..

आजपासून २ आणि ३ जुलैला हैद्रबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ३५० सदस्यांसह, भाजपच्या देशभरातील ३५ हजारहुन अधिक कार्यालयातील कार्यकर्ते आणि लाखो लोकांची उपस्थिती असणार आहे.

तसेच याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३ तारखेला हैद्राबाद शहरात मोठी रॅली काढण्यात येईल. या रॅलीत नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी होणार आहेत. ही रॅली राज्याची संस्कृती, तेलंगणाचा मुक्ती संग्राम, तेलंगणा राज्याचा लढा या सगळ्यावर आधारित असणार आहे. 

२००४ नंतर थेट १८ वर्षांनी ही बैठक होत आहे.  

तब्बल १८ वर्षांनी भाजपाची अशी राष्ट्रीय बैठक हैद्राबाद शहरात होत आहे. याआधी २००४ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात हैद्राबाद शहरात अशी बैठक झाली होती. परंतु एवढ्या दीर्घ काळानंतर बैठक घेतली जात असल्यामुळे भाजप २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दक्षिण भारतात पक्षविस्तार करण्यासाठी ‘मिशन साऊथ’ राबवत आहे अशी चर्चा केली जात आहे. 

शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या या बैठकीपूर्वी भाजपने तेलंगणा राज्यातील सर्व ११९ मतदारसंघात आपल्या नेत्यांना पाठवले आहे. यात नेत्यांना मतदारसंघाची माहिती आणि समस्या जाणून घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

यासाठी भाजप नेत्यांनी अख्खा तेलंगणा पिंजून काढलाय. यावरून भाजप २०२३ मध्ये होणाऱ्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलाय असं बोललं जातंय.  

निव्वळ पिंजून काढलेला तेलंगणाच नाही तर बाकी राज्यांवरसुद्धा भाजपचे लक्ष आहे. 

ही बैठक हैद्राबादमध्ये होत असली तरी बाकी चार दक्षिण भारतीय राज्यांवर सुद्धा भाजपचे लक्ष असल्याचे सांगितले जाते. कारण शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील सत्ता सोडली तर इतर दक्षिण भारतीय राज्यात भाजपला आजपर्यंत यश मिळालेले नाही. असे आजपर्यंतच्या निवडणुकांच्या आकडेवरीवरून दिसते. 

साऊथमध्ये कर्नाटक सोडून इतर राज्यात भाजपचा मोठा प्रभाव नाही.

सध्याच्या घडीला दक्षिण भारतातील राज्यात भाजपचे केवळ २९ खासदार निवडून आलेले आहेत. यातील सर्वाधिक कर्नाटक मधील २५ तर तेलंगणातील ४ खासदार आहेत. परंतु आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये मात्र भाजपचा एकही खासदार नाही. 

तसेच तमिळनाडूत सहकारी एआयकेडीएमकेचा सुद्धा एकच खासदार आहे. यामुळे पक्षविस्तारासाठी भाजप मिशन साऊथ राबवत असल्याचे सांगितले जाते. 

निव्वळ लोकसभाच नाही तर विधानसभांमध्ये सुद्धा भाजपचे संख्याबळ नाही.

कर्नाटकमध्ये १२१ आमदारांसह भाजप सत्ताधारी पक्ष असला तरी शेजारी तेलंगणामध्ये केवळ ३ आणि तामिळनाडू राज्यात चारच जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे. कर्नाटक वगळता चारही दक्षिण भारतीय राज्यातील विधानसभांमध्ये भाजपचे संख्याबळ नगण्य किंवा शून्य आहे. यामुळे भाजप हैद्राबाद बैठकीच्या माध्यमातून यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे विश्लेषक सांगतात.

पण मग भाजपने बैठकीसाठी हैद्राबादचीच निवड का बरं केली असावी ?

२०२० मध्ये झालेल्या हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपली बरीच ताकद लावली होती. या निवडणुकीत भाजपला १५० जागांपैकी ४३ जागा मिळवण्यात यश आलं होतं. तसेच हुजुराबाद आणि दुब्बाका या मतदारसंघांबरोबरच आणखी काही निवडणुकांमध्ये भाजपने चांगले प्रदर्शन केले होते यामुळे बैठकीसाठी हैद्राबाद शहराची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.

यासोबतच आरएसएसचा प्रभाव असलेल्या भागात भाजप पक्षविस्तार करण्याकडे लक्ष देत असल्याचे विश्लेषकांकडून सांगितले जाते. 

हैद्राबादनंतर नरेंद्र मोदी भीमवरमकडे रवाना होतील  

हैद्राबादची बैठक आटोपल्यानंतर चार जुलैला नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे जातील. भीमावरम येथे जाऊन नरेंद्र मोदी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजुच्या शतकोत्तर रौप्यमोत्सवी जयंती कार्यक्रमाचे उदघाटन करतील. यामुळे तेलंगाणासोबतच भाजपचे आंध्र प्रदेशावरही लक्ष असल्याचे दिसते.

तेलंगणात प्रशांत किशोर तर आंध्र प्रदेशात सुनील देवधर असे रणनीतीकार असणार आहेत…. 

२०२३ च्या निवडणुकीत असलेले विरोधकांचे आव्हान लक्षात घेता, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवली आहे. तर भाजपने डाव्यांचा एकछत्री गड त्रिपुरा जिंकणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील देवधर यांना जगन मोहन रेड्डींच्या आंध्र प्रदेशात उतरवले आहे. 

यावरून भाजप निव्वळ तेलंगाणापुरती रणनीती आखत नसून ती दक्षिणेतील राज्यांसाठी सुद्धा असल्याचे विश्लेषक सांगतात.  

तेलंगणा पाठोपाठ भाजपने आंध्र प्रदेशातील निवडणुकीचे सुद्धा नियोजन सुरु केल्याने, भाजप नेहमी निवडणुकीच्या मूडमध्ये असतो याचा प्रत्यय येतो. यासोबतच भाजप केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवतो अशीही चर्चा केली जाते.  परंतु याचा परिणाम कसा असेल हे मात्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या आगामी निवडणुक निकालांवरूनच कळेल. 

आणखी एक म्हणजे भाजपच्या निवडणूक रणनीती बद्दल आणि मिशन साऊथची ताकद देखील सर्वांच्या लक्षात येईल.

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.