नव्वदच्या दशकाचा एकच आवाज होता ‘कुमार सानु’ आणि धमाकेदार सुरवात होती आशिकी.

आशिकीच्या पाट्या पडत असतात. पडद्यावर अंधार. स्टुलवर गिटार घेऊन बसलेल्या हिरोची दिसणारी प्रोफाईल. मागून प्रकाश. हळूहळू नदीम श्रवणचं सुरु होणारं संगीत आणि कुमार सानुचा मधुर आवाज कानात घुमतो, 

 “सासोंकी जरुरत है जैसे जिंदगी के लिए बस इक सनम चाहिये आशिकी की लिए.”

कुमार सानू तेव्हा टी-सिरीजसाठी गायचा. गुलशन कुमार तेव्हा जुनी गाणी सेम आवाजातल्या नवीन सिंगरकडून गावून घ्यायचे आणि त्याचे कॅसेट विकायचे. यातून रग्गड पैसा कमावलेला. एकदा त्यांनी ठरवलं एक रोमांटिक गाण्यांचा अल्बम बनवू. सगळी गाणी कुमार सानू आणि अनुराधा पौडवालच्या आवाजात रेकॉर्ड करायची.

संगीतासाठी नदीमश्रवण ना बोलावण्यात आलं.

नदीम सैफी आणि श्रवण कुमार राठोड. त्यांचे यापूर्वी काही सिनेमे येऊन गेले होते पण त्याकाळात त्यांना विशेष कोणी ओळखत नव्हत. कुमार सानू चं पण असचं काही होत. त्याने बच्चन साठी जादूगर मेरा नाम गोगा वगैरे गाणी गायली होती पण गाजला मात्र काही नव्हता. नदीम श्रवणनी शोधून शोधून  पाकिस्तानी गाणी इंग्लिश गाणी यातून ट्युन्स गोळा केले .

रेकोर्डिंगच्या वेळी कुमार सानू उभा राहीला. पहिलंच गाण होत “नजर के सामने जिगर के पास.” कुमार सानूने माईकवर त्या गाण्याची पहिलीच ओळ गायली असेल पण त्याचा तो सूर ऐकून नदीम उद्गारला,

“शाब्बास तू टायगर है बेटा टायगर. “

पुर्ण गाणं जेव्हा रेकॉर्ड करून कुमार सानू रेकॉर्डरूम मधून बाहेर आला तेव्हा नदीम त्याच्यावर पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल उधळत होता. आपण आता जे ऐकलं त्याच्यावर त्याचाच विश्वास बसत नव्हता. त्यानंतर अशी जवळपास दहा गाणी रेकॉर्ड झाली. या सगळ्या गाण्याच्या रेकोर्डिंगच्यावेळी स्टुडीओमध्ये काम करणारे सगळे वर्कर खुश होते कारण रोज तिथे नदीम श्रवण कुमार सानूवर पैशांची बरसात करत होते.

सगळी गाणी रेकॉर्ड होऊन तयार झाली. जाने जिगर जानेमन असो किंवा नजर के सामने जिगर के पास सगळीच गाणी भारी झाली होती. गुलशन कुमार यांना ही ती ऐकवण्यात आली. बिझनेसचं डोकं असंलेल्या गुलशन कुमारना लक्षात आलं आपल्या हातात खजिना लागला आहे. हा काही साधा अल्बम नाही. 

 त्या दिवशी योगायोगाने टीसिरीज च्या ऑफिस मध्ये जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट आले होते. गुलशन कुमारनी त्यांना ही गाणी ऐकवली. संगीताची नेमकी जान असणाऱ्या महेश भट्टना वेड लागायची पाळी आली होती. त्यांनी गुलशनकुमारना विचारले,

“क्या आप मुझे ये गाने दोगे? इसपर मै फिल्म बनाउंगा. “

असं जगात पहिल्यांदा घडत होत की तयार गाण्यांना रिलीज करण्यासाठी सिनेमा बनणार. महेश भट्टनी नेहमीप्रमाणे आपल्या आयुष्याला रिलेट होणारी जबरदस्त स्टोरी लिहिली. यात कलाकार सुद्धा सगळे नवीन घेतले. राहुल रॉय आणि अनु अगरवाल. राहुल रॉयचा आवाज सूट न झाल्यामुळे त्याचा आवाज आदित्य पांचोली कडून डब करवून घेण्यात आला.

१७ ऑगस्ट १९९० रोजी सिनेमा रिलीज झाला. गाण्यांनी इतिहास घडवला होता. आता पर्यन्तचा भारतातल्या सर्वात गाजलेला हा सिनेमा गीतांचा अल्बम होता. टेपरेकॉर्डर, छायागीत, रेडीओ , लग्न सगळीकडे फक्त आशिकीची गाणी ऐकू येत होती.

आज जवळपास एकोणतीस वर्षे होत आली आहेत पण आशिकीच्या संगीताची जादू आजही तशीच ताजीतवाणी आहे.

‘कुमार सानु’ या त्यावेळच्या नव्या सिंगरला आशिकीने बेस्ट सिंगरचा पहिला ‘फिल्मफेअर’ अॅवार्ड मिळवून दिला. पुढे लागोपाठ ५ वर्ष फिल्मफेअर मिळवण्याचा विक्रम देखील ‘सानु’ने केला. याच काळात अनेक सिंगर्स नावारुपाला आले विनोद राठोड, उदित नारायण, अभिजीत…

पण नव्वदच्या दशकाचा एकच आवाज होता ‘कुमार सानु’ आणि धमाकेदार सुरवात होती आशिकी.

खास भिडू लोकांसाठी आशिकी मधली काही गाणी

१. बस एक सन्म चाहिये आशिकी के लिये.

“जाम की जरुरत है जैसे बेखुदी के लिए बस एक सनम चाहिये आशिकी के लिए.” वातावरण पण जमलय. समीरचे शब्द बरोबर घायाळ करत आहेत. आवाजाची नशा चढणे म्हणजे काय प्रकार तो या गाण्यात अनुभवावा. फक्त ते राहुल रॉयने तोंड उघडू नये. नुसता बसून गिटार वाज्व्ल्याची अक्टिंग करावी.

 

२.धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना.

नव प्रेम आहे. आग दोनो तरफ लगी है. पण गडबड कोणतीच नाही. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरेधीरेसे दिल कॉ चुराना.

३. तू मेरी जिंदगी है .

https://www.youtube.com/watch?v=SmMSSzoJ-LE

हे गाण खर तर मूळ पाकिस्तानी गाण्यावरून उचललं आहे. तरी सानूने जे काही गायलंय त्याला तोड नाही. यातलं फक्त “तू” एवढ जरी ऐकलं तरी सानूच्या आवाजाची ताकद कळते.

४.नजर के सामने जिगर के पास

का कुमार सानूला नदीम टायगर म्हणतो? का त्याने त्याच्या गाण्यानंतर पैसे उडवले सगळ अनुभवायचं असेल तर नक्की ऐका.

५. मै दुनिया भुला दुंगा तेरी चाहत मै.

दर्द दर्द आणि सिर्फ दर्द. एका पिढीच ब्रेक अपचं हे अँथम आहे. व्हलेटाइन फेल गेल्यावर बार मध्ये खूप जण ही गाणी ऐकतात अशी वदंता आहे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.