फ्रेंडझोनमधून बाहेर कसं पडावं हे शिकवणारा तुषार कपूरचा सिनेमा…

२००० साल जसं जवळ आलं तेव्हा कोणत्या कोणत्या स्टारची मुले इंडस्ट्रीमध्ये येणार याची चर्चा सुरु झाली होती. घराणेशाहीला नावं ठेवायची आणि तैमुरची चड्डी वाळली की नाही याची बातमी टाकायची असा दुटप्पीपणा तेव्हा मिडियामध्ये नव्हता. तेव्हा खुले आम स्टारपुत्रांच्या आगमनाची वाट पहिली जात होती.

चर्चेतलं सगळ्यात मुख्य नावं होत,

शहेनशहा अमिताभचे चिरंजीव अभिषेक बच्चनचं .

याशिवाय जितेंद्रचा मुलगा तुषार, विनोद खन्नाचा मुलगा राहुल खन्ना, निर्माते दिग्दर्शक यश चोप्राचा मुलगा उदय, राकेश रोशनचा मुलगा ह्रितिक, सुरेश ओबेरॉयचा मुलगा विवेक, आमीरचा भाऊ फैझल, राज कपूरची नात आणि करिश्मा कपूरची बहिण करीना हे सुद्धा रांगेत उभे होते.

देखण्या करीनाला करिश्मा बरोबर अनेक पार्टीमध्ये खूप जणांनी पाहिलं होत. तिला साईन करायला लोक तडफडत होते. तसंही तिने पहिला पिक्चर साईन केला होता, कहो ना प्यार है. त्याचं थोडंफार शुटींगही झालेलं. तेवढ्यात तिला अभिषेक बच्चनचा डेब्यू असणाऱ्या रिफ्युजीची ऑफर आली.

राकेश रोशनच्या ह्रितिकपेक्षा अमिताभच्या अभिषेकसोबतच्या सिनेमामधून इंडस्ट्रीमध्ये पाय टाकलं तर आपला फायदा आहे असं गणित मांडून,

करीनाने कहो ना प्यार है सोडला.

अभिषेकचा रिफ्युजी आला. थोडासा गंभीर धाटणीचा हा पिक्चर बॉक्स ऑफिस वर चालला नाही. “अभिषेक बिलकुल अमिताभ सारखा दिसतो नै?” अशा चर्चा सोडल्या तर बाकी या सिनेमाच्या हाती काही लागलं नाही. कहो ना सोडल्यामुळे करीनाचा तर खूप मोठा पोपट झाला होता. नाच गाणी असलेला मसाला पिक्चर सोडून रिफ्युजी मधली नॉन ग्लॅमरस भूमिका केल्याचा फटका बसला असा निष्कर्ष तिने काढला.

खूप विचार केल्यावर तिने पुढचा सिनेमा साईन केला जितेंद्र यांच्या मुलाचा तुषार कपूरच्या आगमनाचा पिक्चर,

मुझे कुछ कहना है “.

जितेंद्रचा मुलगा म्हणून हिरो कडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. दिसायला तर तो देखणा असणार शिवाय डान्स सुद्धा भारी करत असणार. पिक्चर आल्यावर कळालं जितेंद्रचं पोरग वडिलांच्या वळणावर गेलं नाही. चारचौघात झाकलं तर उठून पण दिसणार नाही असं रूप, अभिनयाच्या बाबतीत राम राम, डान्स जरा बरा करतो इतकंच. तरी हा पिक्चर गाजला. करीनाची डूबती नय्या पार झाली.

असं काय होत या पिक्चर मध्ये?

तरुणाईला जवळची स्टोरी होती. विषय होता फ्रेंडझोन.

सामान्य रूपाच्या, कॉन्फिडन्स नसलेल्या मुलाच्या भूमिकेत तुषार अगदीच फिट बसला. त्याच्या एकदमच आउट ऑफ लीग असलेली रुपगर्विता करीना. या पिक्चरसाठी करीश्माचा लाडका स्टाईलीस्ट मनिष मल्होत्राने करीनासाठी खास मेहनत घेतली होती. रिफ्युजीमधली तिची इमेज मोडून सेक्सी करीनाचा जन्म झाला होता.

रस्त्यावर तिला तुषार कपूर बघतो काय , तिच्या प्रेमात पडतो काय, तिच्या फ्रेंडझोन मध्ये जाऊन तिला प्यार का इजहार करायला घाबरतो काय आणि,

शेवटी तीच त्याला “आय लव्ह यु” म्हणते काय. अशी हि परीकथा.

परीकथाच म्हटलं पाहिजे कारण असे खऱ्या आयुष्यात फ्रेंडझोन मोडून करीनासारखी मुलगी पटवणारे अगदीच दुर्मीळ. त्यात तुषार कपूरसाठी करीनाच्या फ्रेंडझोन पर्यंत मजल मारणे हीच मोठी अचिव्हमेंट होती. पब्लिकने या स्टोरी मध्ये स्वतःला पाहिलं.

अनेक भिडू आपल्या क्रश ला मन की बात सांगू न शकल्या मुळे मुझे कुछ कहना है गाताना दिसत होते. अनु मलिकच्या संगीताने सुद्धा पिक्चरला चांगलाच हात दिला होता. मुझे कुछ कहना है गाजल्याचा करीनाच्या करीयरला भरपूर फायदा झाला. सोलो हिरो असणारा पिक्चर हिट करन अभिषेक बच्चनला जमलं नाही ते तुषार कपुरने करून दाखवलं.

पण परत ही कामगिरी तो रिपीट करू शकला नाही.  त्याच्या अभिनय क्षमतेमुळे त्याला कधी “गायब” तर कधी गोलमालचा “मुका ” असे रोल मिळत राहिले.

किती जरी पिक्चर पडले तरी तुषार कपूरने हार मानलेली नाही. कुठल्या न कुठल्या छोट्या मोठ्या पिक्चर मध्ये छोटा मोठा रोलच्या रूपात फिल्म इंडस्ट्रीशी त्याचा फ्रेंडझोन टिकून आहे. त्याच्यासोबत आलेले त्याच्या पेक्षा मोठे नाव असलेले, त्याच्या पेक्षा देखणे, चांगला अभिनय करणारे स्टारपुत्र कधीच बाहेर फेकले गेले. पण मुझे कुछ कहना है ची चिकाटी आणि लहान बहिणीच बोट धरून तुषार कपूर आजही लढतो आहे.

काय जाणो सक्सेस नावाची करीना एक दिवस येऊन त्याला आय लव्ह यु म्हणून जाईल पण.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.