खरच, भवानी मातेने शिवरायांना भवानी तलवार दिली होती का..?

भवानी तलवार. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रसंगी राजकारणाचा ठरलेला विषय. राजकारणाचा का? तर ज्या भवानी तलवारीच्या साक्षीने स्वराज्य स्थापन झालं ती तलवार इतिहासातून गायब झाली. तिचे मुळ वर्णन ठामपणे सांगता येत नाही. वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मते भवानी तलवार कशी होते ते सांगितल जात पण ठामपणे ती ओळखली जावू शकत नाही. हिच भवानी तलवार इंग्लडला आहे आणि ती आपण परत आणू म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी राजकारण तापवल होतं. त्यासाठी त्यांनी इंग्लडचा दौरा देखील आखला होता. 

भवानी तलवार खरच भवानी मातेने महाराजांना दिली होती का?

तलवार पुढे कुठे गेली? आज तलवार कुठे आहे?

असे अनेक प्रश्न भवानी तलवारीसोबत जोडले गेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बोलभिडू वाचकांसमोर मांडणार आहोत.  

भवानी तलवार भवानी मातेने महाराजांना दिली होती का ? 

भवानी मातेने महाराजांना तलवार दिली का, असा शोध घेत असताना शिवभारत या काव्याचा आधार मिळतो. सर्वात प्रथम या बखरी आणि काव्यामध्ये शिवरायांचे वर्णन करताना भवानी तलवारीचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये असे म्हणण्यात आले आहे की, 

साक्षात तुळजाभवानी मातेने दर्शन दिले आणि म्हणाली, राजा मी तुझी तलवार होवून राहिली आहे. 

या काव्यपंक्तींचा अर्थ भवानी मातेने तलवार दिली असा काढण्यात आला. वास्तविक शिवरायांची स्वराज्य स्थापनेचा संकल्प केलेला. अशा काळात वर्णन करत असताना राजाकडे दैवी शक्ती आहे अस मानण्याची गरज देखील असायची. यामुळे शत्रूला जरब बसेल असं एक गणित होतं. आपल्या क्लुप्तीने औरंगजेबाच्या तावडीतून पेटाऱ्य़ातून सुटका करुन घेतल्यानंतर महाराजांकडे दैवी शक्ती आहे अशा अफवा पसरल्या होत्याच.

पण आजच्या काळात या दैवीगोष्टी मान्य करत असताना आपण शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखतो हे समजून घ्यायला हवं. शिवरायांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वराज्य स्थापन केले. आपण जर शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली. आणि तलवारीमुळेच स्वराज्य आलं अस म्हणत असतो तेव्हा शिवरायांच्या शौर्याला कमी लेखत असतो. थोडक्यात एका काव्यपंक्तीचा आधार घेवून जाणिवपुर्वक भवानी मातेने तलवार दिली अस सांगण्यात येत. या गोष्टीला कोणताही आधार नाही. 

मग भवानी तलवार कुठून आली…? 

भवानी तलवार स्वराज्यात कुठून आली याबद्दल वेगवेगळे दाखले दिले जातात. हि तलवार भारतात बनलेली नव्हती तर ती स्पेन, पोर्तूगाल इथे तयार करण्यात आल्याच सांगण्यात येतं.

तलवार महाराजांकडे कधी आणि कशी आली. 

७ मार्च १६५९ रोजी शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावर होते. या दरम्यान बांदा नावाच्या बंदरानजीक ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचे जहाज अडकले होते. या जहाजावर खेम सावंतांनी हल्ला केला. त्या हल्यामध्ये सावंताना हि तलवार मिळाली. पोर्तुगीज त्या काळात नजराणा अथवा विक्रीसाठी अशी शस्त्रे आणत असत. हि तलवार त्यापैकीच एक असल्याच सांगण्यात येत. अशीही शक्यता सांगितली जाते की जहाजाचा कॅप्टन दि ओक फर्नांडिस यांची ती तलवार होती.

हि तलवार शिवराय सप्टकोटीश्वर मंदिरात मुक्कामी असताना अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांने महाराजांना भेट म्हणून दिली. शिवराय भेट स्वीकारत नसतं आणि भेट स्वीकारलीच तर पुढच्यास देखील भेट देत असत. कृष्णाजी सावंतांनी दिलेली तलवार पाहून महाराजांनी त्यांना ३०० होन अर्थात ६०० तोळे सोने भेट म्हणून दिली. 

याबद्दलचा दूसरा प्रवाद असा देखील आहे की तलवार महाराजांना पोर्तुगिजांकडून थेट मिळाली होती. खेम सावंतांनी ती भेट दिली असले अशी शक्यता काही इतिहासकार नकारतात. कारण खेम सावंत स्वराज्याचे हितचिंतक नव्हते. ते आदिलशाहीचे सेवक होते. शरणागती पत्करल्यानंतर महाराजांना त्यांनी तलवार पेश केली असे मानले तरी इतिहासकार म्हणतात रोमन अंक तसेच ठेवून महाराजांनी तलवार वापरली नसती. 

महाराजांकडे एकूण तीन तलवारी होत्या. अशा तलवारी मुळात शाही तलवारी असत. त्या युद्धात वापरल्या जात नसत. जगदंबा, तुळजा आणि भवानी अशा तीन तलवारींची नावे. पैकी शहाजीराजांनी दिलेल्या तलवारीचे नाव महाराजांनी तुळजा असे ठेवले होते. 

पैकी भवानी तलवार कशी होती? हे आज कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. इतिहासातून भवानी तलवार गायबच झाली. १८७५ साली इंग्लडचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड भारतात आले होते. तेव्हा कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना तुळजा आणि जगदंबा तलवारी भेट दिल्या होत्या. त्या तलवारी आजही इंग्लडच्या बंकिंगहम राजवाड्यात असल्याचं सांगण्यात येत. काही काळ  याच ठिकाणी भवानी तलवार आहे अस सांगून भ्रम पसरवण्यात आले, पण भारतीय इतिहासकारांनी स्वत: जावून पुष्टी केली की तिथे असणाऱ्या तलवारींमध्ये भवानी तलवार नाही. इंग्लडच्या ब्रिटीश म्युझियमच्या डग्लस बॅरेट यांनी देखील इथे भवानी तलवार नसल्याचे लेखी कळवले. 

मग भवानी तलवार गेली कुठे..? 

इतिहासकार म्हणतात, रायगडच्या पाडाव्यानंतर औरंगजेबाच्या हाती हि तलवार लागली. स्वराज्याच्या मौल्यवान संपत्तीची लूट औरंगजेबाने केली. शाहू महाराजांची सुटका केल्यानंतर त्यांच्या विवाहप्रसंगी औरंगजेबाने काही वस्तू परत केल्या भवानी तलवार त्यापैकीच एक होती. शाहू महाराजांकडे हि तलवार आली. हे खरे असले तर आज ती तलवार छत्रपती उदयनमहाराज यांच्याकडे असायला हवी होती. 1974 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी भरवून त्यात भवानी तलवार ठेवल्याचे सांगितले होते. ती सातारा संस्थाकडूनच मिळवण्यात आली होती. मात्र त्या तलवारीवर सरकार राजा शाहू छत्रपती कदिम असा उल्लेख होता. त्यावरून ती भवानी तलवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

इतिहासातून भवानी तलवार गायब झाली पण भवानी तलवार आपल्याकडे आहे असे सांगणारे अनेकजण उगवले. कॅप्टन मोदी देखील त्यापैकीच एक होते.  

२० व्या शतकाच्या सुरवातील कॅप्टन मोदी नामक व्यक्तीने भवानी तलवार आपल्याकडे आहे असा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी एक पुस्तिका देखील काढली होती. ज्यामध्ये त्यांच्याकडे असणारी तलवार हि भवानी तलवारच असल्याचे दाखले देण्यात आले होते. खान बहादुर पद्मजी यांनी कुर्तकोटी या डॉक्टरांनी भवानी तलवार दिली व त्यांनी कॅप्टन मोदींना हि तलवार दिली असे सांगण्यात आले.  पुरावा म्हणून तलवारीवर छत्रपती शिवाजी असे कोरण्यात आलेली अक्षरे देखील दाखवण्यात आली मात्र चौकशी केल्यावर कळालं की पद्मजी यांनी ती अक्षरे कोरली होती. 

भवानी तलवार उत्तरेतील राजांकडे गेली असा एक दावा केला गेला. इंदूर महू येथे असणारी तलवार भवानी तलवार आहे. छात्रसाल बुंदेल याला महाराजांनीच हि तलवार दिली होती असा दावा इतिहाससंशोधक सेतु माधव पगडी यांनी केला होता. पण या तलवारीचे संशोधन केल्यानंतर त्यावर छत्रसाल सेनापतीचे नाव आढळून आले. 

आजपर्यन्त अनेक दावे प्रतिदावे झाले. भवानी तलवार आपणाकडे आहे असे सांगणारे देखील आले आणि तलवारीचा शोध घेणारे देखील आले. आज एखाद्या व्यक्तीकडे भवानी तलवार असेलच तर ठामपणे कोणीच तीच खरी भवानी तलवार हे सिद्ध करु शकणार नाही हे देखील खर.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.