शिवसमाधीमध्ये शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का?

चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपतींनी याच गडावर अखेरचा श्वास घेतला.

शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजेनी केला.

यावेळी शिवरक्षा व अस्थी जगदीश्वर देवळाच्या जवळ पुरण्यात आल्या व तिथे दगडी चौथरा उभारण्यात आला. रक्षेचा काही भाग काशी, रामेश्वर अशा तीर्थक्षेत्रामध्ये विसर्जित करण्यात आला तर काही भाग सिंधुदुर्ग येथील राजराजेश्वर मंदिरात ठेवण्यात आला.

शिवरायांच्या पावन अंश असलेल्या या समाधीवर आपला माथा टेकला की हा जन्म सार्थकी लागला अशी भावना प्रत्येक शिवभक्ताची असते. दरवर्षी लाखो वारकरी या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर येतात.

ज्या स्थळी परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे.

मुघल राजवट, पेशवाईच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे बरेच वर्ष समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती. कुणी लोभी दुष्टाने द्रव्यलाभाच्या आशेने तिचे धोंडे उखडलेले होते.

१८१८ सालानंतर ब्रिटीश काळात रायगडावर जाण्यास बंदी घालण्यात आली.

गडावर जाणाऱ्या वाटा बंद करण्यात आल्या. शंभरभर वर्षे गडावरच्या भोळ्या भाबड्या गुराखी सोडले तर हे पवित्र स्थान विस्मरणात गेले.

अठराशे सत्तरच्या दशकात  महात्मा जोतीबा फुलें नी पायी वाटा शोधल्या आणि ते रायगडावर पोहचण्यात यशस्वी ठरले. तिथे त्यांना शिवरायांची समाधी दिसून आली. त्यांनी हे पवित्र स्थान जगाच्या पुनः प्रकाशात आणले.

मध्यंतरी इतिहासाचा अभ्यास असल्याचा दावा करणाऱ्या काही संशोधकांनी अशी आवई उठवली की आज आपण जिला शिवसमाधी म्हणतो ती समाधी नसून एका मनोऱ्याचा पाया आहे.

असे वक्तव्य करून मुद्दामहून शिव-इतिहासावर शंका निर्माण करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न होता.

शिवसमाधीमध्ये खरोखर शिवरायांच्या पवित्र रक्षा आढळून आल्या होत्या का? हा प्रश्न विचारण्यात आला.

याचं सविस्तर खंडण इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी केलय.

महात्मा फुलेंना ही समाधी सापडल्यावर रायगडावर अनेकांचा वावर सुरु झाला. यात विशेषतः ब्रिटीश अधिकाऱ्यांचा समावेश होता. १८८३ साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स डग्लस ह्यांच्या ‘A Book of Bombay’ ह्या पुस्तकात पान ४३३ वर समाधीच्या पडझडीचे वर्णन केले आहे आणि छत्रपती घराण्याचे वंशज, पेशवाईचा कारभार ह्या सर्वांना समाधिस्थानाला अशा दुरवस्थेस आणल्याबद्दल दोष दिला .

याच काळात महात्मा फुलेंनी शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी जनजागृती सुरु केली. निधी गोळा केला. १८९५ साली लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची चळवळ निर्माण करून शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला वेग दिला.

त्याकाळात कोल्हापूर संस्थानने जीर्णोद्धाराची जबाबदारी उचलली. त्यासाठी रायगडावर पाहणीसाठी इंजिनियरदेखील पाठवला. मात्र लोकमान्य टिळकांनी आग्रह धरला की छत्रपती शिवराय हे फक्त आपल्या वारसांचे नसून त्यांच्यावर पूर्ण समाजाचा अधिकार आहे यामुळेच जीर्णोद्धार लोक वर्गणीतूनचं केला जावा. तेव्हा कोल्हापूर संस्थानने माघार घेतली.

लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या शिवाजी रायगड स्मारक समिती आणि ब्रिटीश सरकार यांच्या माध्यमातून जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी रायगड हा कुलाबा जिल्ह्यामध्ये येत होता. या जिल्ह्याच्या चीफ इंजिनियरच्या देखरेखी खाली जीर्णोध्दाराचे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराकडे देण्यात आले.

नेमके काम सुरु झाले तो पर्यंत १९२६ साल उजाडलेले होते. जीर्णोद्धारासाठी शिवरायांच्या समाधीच्या अष्टकोनी चौथऱ्याची खुदाई करण्यात आली. यावेळी तिथे काम करणाऱ्या गवंड्यांना सहा फुट खोल खोदल्यावर एका दगडी काचेच्या पेटीमध्ये श्री शिवछत्रपतींच्या अस्थी आणि रक्षा मिळून आल्या.

तिथे हजर असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याने कुलाब्याला आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारे पत्र पाठवले.

पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडणारी ही घटना होती.

याचवेळी या समाधीमध्ये एका कुत्र्याची कवटी देखील आढळून आली. याचवेळी शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची कथा पसरवण्यात आली. पुढे ती कवटी कलकत्त्याला फोरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवल्यावर कळाले की ती कवटी कुत्र्याची नसून एका उदमांजराची आहे.

शिवकाळानंतर जेव्हा समाधी भग्नावस्थेत गेली त्यावेळी एखाद्या छिद्रातून हे उदमांजर तिथे गेले असणार व अडकून मेले असण्याची शक्यता आहे. पुढे या काल्पनिक कुत्र्याचा पुतळा शिवसमाधी जवळ उभारण्यात आला.

अखंड भारतवर्षाचे कल्याण करणारा शिवछत्रपती राजाच्या या सापडलेल्या पवित्र अशा शिवरक्षा आपल्या घरी असाव्यात व आपल्या पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण या रक्षेच्या कृपेने व्हावे ही अपेक्षा अनेकांची होती आणि ते सहाजिक होते.

mahadev wadke

कंत्राटदार सुळेंनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली . शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या महादेव वडके यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे ठेवून घेतली. दुर्गमित्र जेष्ठ लेखक गो.नी.दांडेकर  यांच्या जवळही रक्षेचा काही भाग होता.

कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही अंश पाठवून देण्यात आला. याबद्दलचं कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेलं पत्र सुद्धा उपलब्ध आहे.

काही वर्षातच शिवछत्रपतींच्या जीर्णोद्धाराचे काम सिद्धीस पोहचले. मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला चौथर्यावर जाळीदार कठडे बसवले होते. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत.

या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.

अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग !!

एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर, या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.