हजारो जापनीज लोक जैन धर्माचा स्वीकार करत आहेत.

जपान हा जगातला शांतताप्रिय देश. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचे चटके त्यांना सहन करावे लागले होते, लाखो लोक मारले गेले होते त्यामुळे युद्धाचे दुष्परिणाम त्यांना माहित आहेत. सदैव कामात बुडालेला जपानी माणूस सहसा कमी चिडतो.

म्हणूनच काय तिथे हिंसक दंगली झाल्या आहेत, धर्मावरून भांडणे झाली आहेत अस कधी ऐकायला मिळत नाही.

जपानचा मुख्य धर्म आहे शिंतो. हा पुरातनकाळापासून चालत आलेला धर्म आहे. या धर्माचे मंदिरे जपानच्या जागोजागी आढळतात. जवळपास ५० % जपानी या धर्माचे आहेत मात्र तरीही जापनीज माणूस खूप धार्मिक नाही. त्याच्यात कोणतीही कट्टरता नाही.

जपानमध्ये शिंतोच्या खालोखाल आहे बौद्ध धर्म. साधारण पाचव्या सहाव्या शतकात भारतातून जपान मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला.

स्वातंत्र्य समता शांतता करुणा व प्रेम या मुल्यांवर आधारित असलेला बौद्ध धर्म जपानच्या संस्कृतीत सहज मिसळला गेला. चीन मधून आलेल्या झेन तत्वज्ञानाने जपानमध्ये खूप प्रभाव पाडला. साधारण ३४ % जपानी लोकसंख्या बौद्ध धर्माची पाईक आहे.

हे झाले मुख्य धर्म. याशिवाय ख्रिश्चन, मुस्लीम या धर्माचे ही काही लोक राहतात मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. याशिवाय जपान मध्ये नो रिलीजन म्हणजेच कोणत्याही धर्माचे पाईक नसणाऱ्या लोकांचही प्रमाण लक्षणीय आहे. विज्ञानावर आधारित विचारसरणी हाच धर्म माननारे अनेकजण जपान मध्ये आहेत.

पण अस म्हणतात की जगातल्या प्रत्येक मनुष्याला अध्यात्मिक भूक असतेच. हे जग कोणत्या शक्तीवर चालू आहे याच कारण शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजन करत असतो. याच कारणामुळे परत परत फिरून धर्माकडे याव लागत. असाच काहीसा प्रकार जपान मध्ये पाहायला मिळतोय.

गेल्या काही वर्षांपासून हजारो जापनीज एका भारतीय धर्माचा स्वीकार करत आहे. तो आहे जैन धर्म.

झाल काय साधारण २००५ सालच्या दरम्यान चुरुशी मियाजावा नावाची एक महिला पर्यटक जपान मधून भारतात आली होती. तिची भेट राजस्थानमधील गच्छाधिपती स्वर्गीय जयंतसेन सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्याशी झाली, त्यांच्या भेटीतून मियाजावा या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला.

त्यानंतर त्यांनी सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून जैन तत्वज्ञानाप्रमाणे साधे जीवन जगण्यास सुरवात केली. त्यांनी स्वतःच चुरुशी मियाजावा हे नाव बदलून तुलसी हे नवीन स्वीकारलं आहे. त्यांना जैन साध्वी बनण्याची इच्छा आहे. त्या सांगतात,

“माझ्या गुरुनी माझ्याकडे जपानमध्ये जैन धर्माचा प्रसार करण्याच महत्वाच काम सोपवलं आहे. त्यानुसार दरवर्षी चार ते पाच वेळा जैन धर्माचा स्वीकार करण्यास तयार असलेल्या शेकडो जपानी लोकांसमवेत भारतात जाते, ”

अहिंसेची शिकवण देणारा जैन धर्म हा जपानी लोकांना जवळचा वाटत आहे. आणि म्हणूनच जवळपास पाच हजार जापनीज कुटुंबाने जैन धर्माचा स्वीकार केला आहे.

सातव्या शतकातील गुप्त बुद्ध मूर्ती असणाऱ्या नागनाकेन या गावातील अनेकजन जैन धर्माचे अनुयायी झाले आहेत. त्यांनी शाकाहाराचा स्वीकार केला आहे, तसेच कांदालसून या पदार्थांना आपल्या खाण्यातून वगळले आहे. तसेच जैन तत्वज्ञानाप्रमाणे रोज सूर्यास्तापूर्वी जेवणाकडे त्यांचा कटाक्ष असतो.

जैन धर्मातील शिकवण समजावी यासाठी हे जपानीज लोक हिंदी भाषादेखील शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबरोबरच दरवर्षी गुजरातमधील पालीताना आणि शंकेश्वर या जैन तीर्थक्षेत्राच्या भेटीला येणाऱ्या जपानी लोकांची संख्या वाढत आहे. जपानमध्ये देखील आता तीन जैन मंदिरांचे निर्माण करण्यात आले आहे. तिथे नवकार मंत्राचा मंत्रजाप करत बसलेले पांढऱ्या कपड्यातले जपानी दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

हे ही वाच भिडू.