चंद्रकांत दादा कुणाचे…? 

मध्यंतरी एक मॅसेज व्हायरल झाला. कोल्हापूरकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. कोथरुडकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. जैन म्हणतात, दादा आमचे नाहीत. ब्राह्मण म्हणतात, दादा आमचे नाहीत. मराठा म्हणतात, दादा आमचे नाहीत. असा नेता पुन्हा होणे नाही.

अनेकांनी चंद्रकांत दादांवरचा विनोद म्हणून मोठ्या प्रमाणात हा मॅसेज व्हायरल केला. 

पण विचार करायचं झालं तर कुठेच कुठल्याही चौकटीत न बसणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा क्रमांक दोनचा नेता होतो. ज्या नेत्याला स्वत:चा फॅनबेस नाही, मास लिडर ही संकल्पना त्यांना कधीच शिवली नाही. लोकांच्यातून निवडून जाण्याचा त्यांना अनुभव नाही. इतकच काय तर तुम्हाला-आम्हाला चिकटलेली गावाची, जातीची ओळख त्या व्यक्तिकडे नाही,

असा नेता महाराष्ट्राचा नेता कसा काय होवू शकतो हा प्रश्न पडतो. 

चंद्रकांत पाटील कुणाचे या प्रश्नाच उत्तर मिळतं? चंद्रकांत पाटील संघाचे. संघाचे स्वयंसेवक ही एकमेव ओळख त्यांना चिटकलेली आहे, त्याशिवाय दूसरी कोणती ओळख त्यांना देता येत नाही.

चंद्रकांत पाटलांना संघटनेत बिनपत्त्याच पाकीट म्हणून ओळखलं जातं. बिनपत्त्याच पाकीट म्हणजे ज्यावर आपल्या सोयीनुसार कोणताही पत्ता टाकता येतो.

पक्षाने आज या पाकीटावर कोथरूडचा पत्ता टाकला आहे. चंद्रकांत पाटलांना पक्षाने सांगितलं की चंद्रयानातून अंतराळात जायला लागेल तरिही चंद्रकांत दादा पक्षाच काम म्हणून एकही प्रश्न न विचारला तयारीला लागतील. अशक्यकोटीतली गोष्ट असली तरी ते अंतराळात जावूनच थांबतील हे देखील खरं. 

कारण चंद्रकांत दादा कुणाचे तर चंद्रकांत दादा संघाचे..

चंद्रकांत दादांचा प्रवास सुरू होतो तो मुंबईतल्या रे रोड रेल्वे स्टेशनच्या जवळील नारवाडीपासून. चंद्रकांत दादांचे आई वडिल दोघेही मजूर. मजूर म्हणजे गिरणी कामगार जे काम करतात त्याहूनही अधिक खालच्या दर्जाची कामे त्यांना करावी लागतं. घरात अठराविश्व दारिद्र असल्याचं दादा आपल्या भाषणात सांगतात.

सहज कोल्हापूरच्या जिल्ह्याचा घाटमाथा व तिथे असणारे अल्पभूधारक शेतकरी पाहिले तर चंद्रकांत पाटलांच्याकडे असणारी वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे मुंबईत जावून काहीतरी काम करून पोट भरणाऱ्यातलीच होती हे कळतं.

पश्चिम महाराष्ट्र त्यात “मराठा” अशा चौकटीत दादा अडकले नाहीत त्याला कारण म्हणजे ते श्रीमंत, जमिनदार अशा गटाचे नेतृत्त्व करणारे कधीच झाले नाहीत. मुंबईत गरिबीवर मजूर म्हणून काम करणाऱ्या आपल्या आईवडिलांकडे पाहून ते घडत गेल्याने टिपीकल मराठा असणं त्यांना शिवत नाही. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून मात्तब्बर मराठा नेते त्यांच्या “मराठा” असण्यावर शंका घेत असतात. 

मुंबईत शाळा महाविद्यालयात गेल्यानंतर ते ABVP अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले. संघसंस्कार आणि संघाचे स्वयंसेवक म्हणून ते घडत होतेच. १९७७ ते ८० च्या दरम्यान ते अखिल भारतीय विद्यार्थी  परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते तर ८० नंतर ते अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. 

चंद्रकांत पाटील सक्रिय कार्यकर्ते होते तेव्हा ABVP चं आजच्या सारखं स्वरुप नव्हतं. कॉंग्रेस पक्षासारखे मातब्बर पक्ष सत्तेत असायचे आणि दूरदूरर्यन्त भाजपची सत्ता येण्याची चिन्हं नव्हती. अशा काळात चंद्रकांत पाटलांनी ABVP सोबत काम करण्यास सुरवात केली. १९८० नंतर ते अभाविपचे पुर्णवेळ कार्यकर्ता झालेले. १९८० ते १९८२ च्या दरम्यान त्यांना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा मंत्री म्हणून काम करण्याची संधी संघटनेने दिली.

चंद्रकांत पाटलांच्या बिनपत्त्याच्या पाकीटावर टाकलेला हा पहिला पत्ता होता.

त्यानंतर पुढच्या दोनच वर्षात म्हणजे १९८२ साली ते अभाविपचे प्रदेशमंत्री झाले. पुढच्या काळात त्यांच्याकडे क्षेत्रीय संघटन मंत्र्याची जबाबदारी टाकण्यात आली. 

ABVP प्रभावीपणे उतरली ती चंद्रकांत दादांमुळे.

१९८४ साली विद्यापीठांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यांचा चेहरामोहरा बदलण्याच काम दादांनी केलं. आपण जिंकू शकतो हे सांगून ABVP च काम सुरू करण्यात आलं. त्याचा मोठ्या प्रमाणात विद्यापीठात ABVP घेवून जाण्याच श्रेय आजही संघटनेत चंद्रकात पाटलांना दिलं जातं. 

१९९० नंतरच्या काळात ABVP ने जोर धरला. बाबरी मशिद, रथयात्रा यांसारखे मुद्दे महाविद्यालयात चर्चेले जावू लागले.  दादांना भारतीय महामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. दादांचे दौरे वेगवेगळ्या राज्यात देखील होवू लागले. 

एकीकडे अभाविपचं काम चालू होत पण दादांसारख्या माणसाला मुंबई परवडणारी नव्हती. विचारांच काम चालूच ठेवायचं हे ठरवून चंद्रकांत दादांनी १९९३ साली आपलं मुळ गाव अर्थात कोल्हापूर जिल्ह्यातलं गारगोटी तालुक्यातं खानापूर गाठलं. 

गावात जावून काय करायचं हा प्रश्न होता.

संघाचे ते स्वयंसेवक होतेच, आत्ता ABVP च्या कामातून ते मोकळे झाले होते. पुन्हा ते संघाच्या कामांमध्ये व्यस्त झाले. गावात जावून काहीतरी करायचं हे उत्तर होतं पण त्यासाठी पैसे नव्हते. मुंबईत असणारी छोटी खोली त्यांच्या वडिलांना विकली व मुंबई सोडून चंद्रकांत पाटील कायमचे कोल्हापूरात आले. 

गारगोटीत काजू प्रक्रिया केंद्र, कोल्हापूरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी विद्या प्रबोधिनी क्लासेस अशा वेगवेगळ्या गोष्टी ते करु लागले. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात संघाचे विचार पोहचवणं ही कठिण गोष्ट होती मात्र चंद्रकांत पाटलांनी ९५ ते ९९ या काळात कोल्हापूर विभागाचे कार्यवाहक म्हणू काम करण्यास सुरवात केली.

ज्या ठिकाणी संघाची शाखा निघू शकणार नाही अशा ठिकाणी दादांनी संघ पोहचवल्याने त्यांच्या पाकीटावर तिसऱ्यांदा पत्ता टाकण्यात आला. 

तो पत्ता होता सक्रिय राजकारणात काम करणं. 

नितिन गडकरी, प्रमोद महाजन हे नेते अचूक माणसं हेरण्यासाठी ओळखले जातात. त्यांची नजर चंद्रकांत पाटलांवर पडली. त्यांना पक्षाच  काम करण्यास सांगण्यात आलं. दिलेली जबाबदारी पार करतात म्हणून २००४ साली त्यांना भाजपने महाराष्ट्र प्रदेश चिटणीस केलं. 

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याचा असायचा. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीच वर्चस्व असलं तरी पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असायचे. मात्र नारायण वैद्य यांच्यापासून असणारी विजयाची घौडदौड प्रकाश जावडेकरांच्या पराभवानंतर मोडली गेली.   

२००८ साली पाकिटावर नवा पत्ता लिहून त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उभा राहण्यास सांगितलं.

पक्षाचा आदेश म्हणून दादांनी अर्ज भरला आणि कामाला लागले. निवडणुक लढवण्याची ही पहिलीच वेळ. त्यात भाजपला हक्काच्या ठिकाणी पराभव पहायला लागला होता. पण चंद्रकांत पाटलांनी या निवडणुकीत शरद पाटलांचा पराभव केला. २००८ साली चंद्रकांत पाटील ९ हजार मतांनी विजयी झाले. शरद पाटलांचा त्यांनी पराभव केला. योगायोगाने त्यांनी निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यांच नाव “शरद” होतं.

आमदार झाल्यानंतर २००९ साली त्यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. २०१३ साली त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आलं. जून २०१४ साली ते पुन्हा विधानपरिषदेवर निवडून गेले. केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतर राज्यात देखील भाजपची सत्ता आली आणि दादांना थेट दोन नंबरच खातं देण्यात आलं. 

इतकी मोठ्ठी जबाबदारी टाकल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतं पण चंद्रकांत दादा आपले नेहमीच स्मितहास्य घेवून नडू लागले. 

लोकसभेला ते बारामतीत भाड्याच घर घेवून “बारामतीकरांना” अडचणीत आणू लागले तर यंदा संघाने कोथरूडचा पत्ता टाकून त्यांना कोथरूडमध्ये पाठवल्यावर तिथून लढू लागले.

काहीही असलं तरी नाही न म्हणता संघाने टाकलेल्या पत्यावर जाणे आणि काम चोख करणे हा चंद्रकांत पाटलांचा स्वभाव असल्यामुळेच ठामपणे सांगता येतं गाव, जात हे सांगता येत नसलं तरी हा माणूस संघाचा खास आहे हे मात्र नक्की. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.