ते पण बाहेरून आले आणि पुण्याचे लाडके झाले..

सध्या पुण्यात एकच चर्चा आहे, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना कोथरूड मधून तिकीट दिले हे योग्य की अयोग्य.

काहीजण म्हणतात की,

पुण्यामध्ये आम्हाला स्थानिक उमेदवार हवा. आता स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हे कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही, या वादाला संविधानिक आधार आहे का असंही नाही.

पुण्याचा इतिहास पाहिला तर पुण्याच राजकारण गाजवलं आहे ज्यांचा जन्म पुण्यात झाला नाही अशा व्यक्तिंनीच.

पुण्याला वैभवाचे दिवस आणणारे पेशवे म्हणजे मुळचे कोकणातल्या श्रीवर्धनचे भट. बाळाजी विश्वनाथ भट यांना शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली तेव्हा ते सासवडमध्ये बसून प्रधानकीचा कारभार पहात होते. त्यांच्या चिरंजीवानी म्हणजेच थोरल्या बाजीरावांनी पुण्यात शनिवारवाडा बांधला व पेशव्यांचा फड सासवडहून पुण्याला हलवला. 

पेशवाईच्या काळात कोकणातून अनेक कुटुंबे देशावर आली. काही जणांना पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची व्यवस्था संभाळण्यासाठी, काहींना दरबारातल्या लिखापढीच्या कामासाठी नोकऱ्या दिल्या. त्यातील अनेकांनी पराक्रम गाजवून स्वतःची प्रगती केली. बरेचजण सरदार झाले. पुण्यातल्या पेठांमध्ये त्यांनी आपआपले वाडे उभा केले.

पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी पुण्याचं राजकारण सांभाळलं असे नाना फडणवीस याचं घराण सुद्धा असच श्रीवर्धनहून सातारला मग त्यानंतर पुण्याला आले होते.

पेशवाई बुडाली, इंग्रजांच राज्य आलं. त्यानंतरही पुण्याचा राजकारणावर वर्चस्व केलं असे अनेक नेते पुण्याबाहेरचे. महात्मा फुलेंच मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण. पुण्यात बसून ज्यांनी काँग्रेसवर अगदी सुरवातीपासून पकड ठेवली असे नेमस्तांचे नेते गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले जन्मले कोकणात गुहागर जवळच्या खेडे गावात.

इतकच काय पुण्याचा सम्राट अशी ज्यांची ओळख होती असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा कोकणातलेच. त्यांचे परम मित्र गो.ग. आगरकर सातारचे. या दोघांनी पुण्यात स्थापन केलेळे फर्ग्युसन विद्यालय हे राष्ट्रवादी विचारांचे प्रमुख केंद्र बनले. संपूर्ण देशभरात ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढ्याला दिशा देण्याचे काम तेव्हा पुण्याहून चालायचे.

लोकमान्य टिळकांचे शिष्य म्हणवल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वदेशी कपड्यांची होळी पेटवून पुण्यात आपल्या राजकीय लढ्याला सुरवात केली. ते सुद्धा नाशिकच्या भगूर या गावचे. म्हणजे मुळचे पुणेकर नव्हेत. पुण्यामध्ये शिकायला आलेल्या अनेकांनी राजकारणाची धुळाक्षरे इथेच गिरवली. 

सावरकरांची हिंदूमहासभा, नागपूरमध्ये स्थापन झालेले आरएसएस, सत्यशोधक समाज, ब्राम्हण-ब्राह्मणेतर चळवळ, समाजवादी विचारसरणी, काँग्रेस अशा वेगवेगळ्या विचारांची चळवळ पुण्यात जन्मली जरी नसली तरी पुण्यात वाढली.

स्वातंत्र्य मिळाल्यावरही पुण्याच राजकारण ज्यांच्या भोवती फिरलं असे नेतेसुद्धा मुळचे पुण्याचे नव्हते.

ज्या आचार्य अत्रेंनी आपलं राजकारण पुण्याच्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सुरु केलं तेही जन्मले सासवडजवळच्या एका खेड्यात. त्यांच्या मुलुखमैदान तोफेची गर्जना नेहरूंच्या खुर्चीला देखील हलवायची. संयुक्त महाराष्ट्र साकारण्यात आचार्य अत्रेंच्या सोबत ज्यांनी ज्यांनी जोरदार लढा दिला असे अनेक नेते पुण्याचे नव्हते पण पुणेकरांनी त्यांना साथ दिली, प्रेम दिलं.

यातच होते एस.एम.जोशी. ते मुळचे जुन्नरचे. त्यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन समाजवादी विचारसरणी टिकवली. पुण्याहून ते खासदार म्हणूनही निवडून गेले. पुढे राज्याचं मुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे चालून आले होते. 

अनेक वर्ष पुण्याचे खासदार असलेले मोहन धारिया मुळचे गुजराती कुटुंबातले. त्यांचा जन्म झाला रायगड जिल्ह्यातील नाते या गावी. पण शिक्षणासाठी पुण्यात आलेले धारिया गांधींजीच्या स्वातंत्र्यलढ्यात पडले. पुढे पुणे नगरपालिकेचे नगरसेवक, पीएमटीचे चेअरमन बनले. पुढे इंदिरा गांधीच्या काळात केंद्रात मंत्री देखील बनले.

आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधीवर टीका करून काँग्रेस सोडली पण पुणेकरांनी त्यांची साठ सोडली नाही. धारीयाना त्यांनी निवडून आणलं इतकच नव्हे तर जनता पक्षाच्या मंत्रीमंडळातही ते मंत्री बनले.

यशवंतराव चव्हाणांनानी राजकारणात आणलं असे पुण्याचे एकेकाळचे आयुक्त, पानशेतफुटीनंतर पुणे उभा करणारे स.गो.बर्वे हे तासगावचे. पण ते पुण्यातून शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार झाले, राज्याचे अर्थमंत्री बनले. त्यांनाही कधी कोणी तुम्ही पुण्याचे स्थानिक नाही हा प्रश्न विचारला नाही.

पुण्याचा कारभार बारामतीहून सांभाळणारे शरद पवार, अजित पवार यांना हा प्रश्न विचारला नाही. अनेकदा खासदार झालेल्या भारताच्या ऑलिम्पिक संघटनेच अध्यक्षपद भूषवणाऱ्या मुळच्या कर्नाटकच्या कलमाडीनां हा प्रश्न कधी विचारला नाही. भाजपच्या खासदारपदी राहिलेल्या प्रदीप रावत यांना कधी हा प्रश्न विचारला गेला नाही.

पुण्याची आर्थिक प्रगती करणाऱ्या बजाज, किर्लोस्कर, फिरोदिया अशा कंपन्यांना हा प्रश्न विचारला गेला नाही. ज्यांच्या दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवल्याचे कौतुक आजही पुणेकरांना आहे ते चितळे बंधू मिठाईवाले, ज्यांच्या गुणवत्तेची खात्री डोळे झाकून दिली जाते ते पुना गाडगीळ सराफ असे अनेक जण सांगली जिल्ह्यातून पुण्यात आलेत. त्यांना कधी हा प्रश्न विचारला गेला नाही.

पुण्याच्या राजकारणात आजवर स्थानिकतेचा, जातीचा प्रश्न येत नव्हता.

मोहनसिंग राजपाल यांच्यासारखा अल्पसंख्यांक शीख समाजातून आलेला व्यक्ती गावच्या महापौरपदी बसला आहे, ही खरी पुणेरी परंपरा आहे.

मग आता चंद्रकांत दादा पाटलांच्या निवडणुकी वेळी हा प्रश्न का?

चंद्रकांत दादा पाटील २००८ सालापासून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुक लढवत आहेत आणि जिंकूनही येत आहेत. फडणवीस सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एक वरिष्ठ मंत्री, सहकार खात्याचा अभ्यासू नेता म्हणून त्यांचा उदय झाला त्यानिमित्ताने पुण्याच्या राजकारणाशी त्यांचा संबंध आहेच. गेल्या काही महिन्यांपासून ते पुण्याचे पालक मंत्री देखील आहेत. राजकारणात येण्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संघ याच्या माध्यमातून ते पुण्याशी त्यांचा संबंध होता.

आयटीच्या उद्योगानिमित्त फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अख्ख्या देशभरातून बहुभाषिक लोक पुण्यात येत आहेत. पुण्याची ही परंपरा फार पुर्वीपासूनची आहे.

वास्तविक पुणे हे एखाद्या नदीच्या प्रवासारखं आहे. पुण्यात जे येतात त्यांना पुणे प्रेमाने जवळ करत आलेले आहे. आणि अस्सल पुणेकर ही ओळख ते अगदी प्रेमाने जोपासत आलेले आहेत. पण आज चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवरून राजकारण करु पाहणाऱ्या लोकांकडे पाहीलं की खेदाने म्हणून वाटतं,

जूनं पुणं राहिलं नाही आता.

आपलं पुणे जसं होतं तसच ठेवण्याची जबाबादारी आपण सर्वांची असेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

4 Comments
  1. Jayesh jadhav says

    Aho saheb punyt khi tri vishes ahe mhnunch avde nete punyt tunch yaun netrutva krushi vatla.ani baramati,junner,saswad he pune dist madhech ala te baher che nahit

Leave A Reply

Your email address will not be published.