मायानगरी मुंबईत वासनेचे डोह शांत करणारं ठिकाण म्हणजे कामाठीपुरा.

गोड किंवा खारट
विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं  रांगा.
कामाठीपुरा
सर्व मौसमांना बगलेत मारून
तू फतकलास चिखलात
या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन
मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची….

कामाठीपुरा या शब्दाची ओळख झाली ती महाकवी नामदेव साळूबाई ढसाळ यांच्या कवितेतून. रेड लाईट एरिया म्हणून गोलपिठा आणि कामाठीपुरा जवळपास सगळ्या जगाला माहिती झाला. मुंबईत कितीही चमक धमक दिसली तरी प्रत्येक हौशी व्यक्तीच्या डोक्यात कामाठीपुरा हिंदळत असतो,डोकावत असतो की बाबा काय असेल तिथं ?

मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला फिरू वाटणाऱ्या जागांपैकी एक म्हणजे हा कामाठीपुरा. या महानगरी, मायानगरी मुंबईत वासनेचे डोह शांत करणारं ठिकाण म्हणजे कामाठीपुरा. मुंबईवर लिहिणाऱ्या लोकांनी मुंबईच्या वर्णनाबरोबरच हे जालीम सत्य लपवायचं टाळलं नाही.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या मुंबईवरच्या लावणीत लिहितात
फोरास रोड, तीन बत्ती | गोलपिठा नाक्यावरती |
शरीर विकून कितीएक पोट भरती ||

हे भयाण वास्तव आजही काळजाला बोचणार आहे. कामाठीपुरा हा सगळ्या भारतभरात प्रसिद्ध रेड लाईट एरिया मानला जातो. इथ पडद्याच्या मागे राजरोसपणे वासना शमवली जाते. इथल्या प्रत्येक महिलेला काही ना काही कारणांमुळे हा वेश्याव्यवसाय पत्करावा लागला. कोणी आईबापाच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून घरातून पळून आलं आणि या कामाठीपुऱ्यात अडकले, कोणाच्या बापाला फसवून पोरीला चांगल काम मिळवून देऊ ही लालसा दाखवुन पोरीला या एरियात विकून टाकलं…अश्या हजार गोष्टी हजार कारणं.

कामाठीपुरा हा वेश्याव्यवसाय म्हणूनच ओळख बनला, प्रत्येकाच्या मनात एक ग्लॅमर असतं की शहरांमध्ये सुमडीत वेश्याव्यवसाय चालतो पण मुंबई मध्ये हे सगळं खुलेआम कसं चालत असेल, राजरोसपणे शरीराचा भाव ठरवला जातो, हट्ट करून तिथल्या वेश्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांना खेचून खोल्यांमध्ये न्यावं लागतं, एकवेळ मॉल मध्ये गर्दी कमी भरेल इतकी वासनेची गर्दी कामाठीपुरा सहन करत असतो. या कामाठीपुऱ्याने कैक वर्षे हा वासनेचा डोंब बघितला पण कामाठीपुऱ्यात वेश्याव्यवसाय सुरू कसा झाला ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला माहिती असलं पाहिजे.

शाहीर पठ्ठे बापूराव यांना मुंबई कशी दिसली तर

मुंबई गं नगरी बडी बांका | जशी रावणाची दुसरी लंका |

वाजतो गं डंका | डंका चहुमुलखी |
राहण्याला गुलाबाची फुलकी | पाहिली मुंबई ||

पण याच मुंबापुरीत बदनाम गल्ल्या सुरू झाल्या आणि शरीराचा भाव ठरवला जाऊ लागला. तसं पाहिलं तर वेश्याव्यवसाय म्हणा किंवा देहव्यापार म्हणा हा जगभरात जून्यातला जुना प्रकार आहे. जगात वेश्याव्यवसाय कधी आणि कसा सुरु झाला याबद्दल तर काही सांगता यायचं नाही पण जगभरात मोठ्या शहरांमध्ये हा व्यवसाय खुलेआम चालतो आणि लपून छपूनसुद्धा चालतो. आपल्या देशात कामभावना, संभोगाची शिल्पचीत्रे सगळयात जास्त आहे पण आपल्याच देशात लैंगिक शिक्षणाचे वांदे आहेत, अशा गोष्टी समजून सांगण्याच लोकं टाळतात. वेश्याव्यवसाय हा काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून केला जातो काही ठिकाणी असं काही मानलं जात नाही.

मुंबई देशाची औद्योगिक राजधानी आहे, इथ सगळं काही आहे, गर्दी आहे, दर्दी आहे,वर्दी आहे. बंदर आहे,समुद्र किनारा आहे, व्यापार आहे, विमान, घोडे गाडी सगळं आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला कामाठीपुरा हा विषय काळजाच्या सुप्त आकर्षणाचा वाटतो. प्रत्येक व्यक्तीला वासना शमवण्याची गरज म्हणा किंवा खाज असते तेव्हा त्यांची पावले वळतात ती कामाठीपुरा परिसरात.

1795 साली कामाठीपुरा अस्तित्वात आला असं सांगण्यात येतं. कामाठीपुरा हे नाव नंतर पडल अगोदर या एरियाच नाव होतं लाल बाजार. या लाल बाजाराने कित्येक पिढ्या पाहिल्या. विविध लोकं पाहिली,काळ पाहिला, लोकांचा वासनेचा लाळघोटेपणा बघितला. सगळं काही या परिसराने बघितलं. रेड लाईट एरिया म्हणून कामाठीपुरा मुंबईत उभा राहिला आणि या गुदमरलेल्या श्वासाने अजूनही तग धरून आहे.

पण कामाठी हे नाव कसं पडलं ?

लाल बाजार म्हणुन फेमस असलेला कामाठीपुरा रेड लाईट एरिया झाला याला कारणीभुत होते राज्याबाहेरील मजूर. तेलंगणा मधून मुंबईत लोकं काम करण्यासाठी यायचे ,हे सगळे मजूर होते. या मजुरांना कमाठी म्हणुन ओळखलं जायचं.. याचं परिसरात हे मजूर राहत आणि मग इथचं वसल कामाठीपुरा. 90 च्या दशकात कामाठीपुरा हा त्या एरियांपैकी एक होता जिथं सगळ्यात जास्त वेश्या राहत होत्या. त्याकाळचे जाणकार लोकं सांगतात की कामाठीपुऱ्यात त्यावेळी जवळपास 50 हजार वेश्या आणि त्यांचं कुटुंब होतं. नंतरच्या काळात वाढणारे भाव,महागाई आणि पोलिसांच्या रेड त्यामुळे कामाठीपुऱ्यातून वेश्या फरार झाल्या आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपला व्यवसाय करू लागल्या.

कामाठीपुऱ्याच्या जवळचं कॅनेडी ब्रीज आणि ग्रँट रोड सारखे भाग आहेत. ब्रिटिश काळातच इथ जोमाने वेश्याव्यवसाय बहरला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि वासना शमविण्यासाठी इथ वेश्या आणि नाचणाऱ्या बायकांचा मेळा भरायचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेश्या व्यवसाय हा मुंबईत अजूनच बळकट झाला आणि तो सगळा भागच वेश्यांचा झाला. आजही प्रत्येक रात्री इथ देहाचा सौदा होतो. दिवसाढवळ्या वेश्या आणि दलाल यांचे पैशावरून होणारे वाद आणि बायका भोगायला आलेले शौकीन दिसून येतात.

याच कामाठीपुऱ्यात वेश्याव्यवसायाने बरेच काळे धंदेसुद्धा आणले आणि अपराधसुद्धा. माफिया, अंडरवर्ल्ड, अपहरण, कोवळ्या वयातील निरागस मुली, दलाल, बलात्कार, खून, धोका आणि ड्रग असे सगळे व्यापार कामाठीपुऱ्यात नांदले. इथ येणाऱ्या बऱ्याच मुली या काही ना काही कारणामुळे मजबूर होऊन नाईलाजाने इथ आलेल्या असतात आणि दलाल लोकं या निरागस मुलींच्या कातडीचा सौदा करून त्यांची या वेश्याव्यवसायाच्या दलदलीत रवानगी करातात. या धंद्यात एकदा गेलं की इथून बाहेर पडू शकत नाही इतकं ते नरक बनलं आहे.

पिंजऱ्यासारख्या रंग उडालेल्या भिंती, नाकातले केस जळतील इतका घाण वास, मरगळलेली तोंड , चेहऱ्यावर दिसणारी मजबुरी सारं काही दिसतं पण नाईलाज असतो. वारं येतं की नाही इथवर शंका वाटावी अशा काडेपेटीसमान खोल्या आणि या कामाठीपुऱ्यात जिवंत प्रेत म्हणून चालणारा वेश्याव्यवसाय.

एखादीच गंगुबाई काठीयावाडी या दलदलीला भेदून बाहेर येते आणि खंबीरपणे आपले प्रश्न मांडून सरकारला जागं करते हेच काय ते कामाठीपुऱ्याने पाहिलेलं शेवटचं जिवंतपणाचं लक्षण…!

• भिडू दुर्गेश काळे

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.