शरद पवार हे ‘प्रतिभा’वान आहेत !!!

शरद गोविंदराव पवार या तरुणाचं प्रतिभा सदू शिंदे या युवतीशी लग्न झालं, त्याला चार दशकांपेक्षा जास्त काळ लोटला. लग्नाचं ‘स्थळ’ म्हणून नवरदेवाचं वर्णन त्याच्याच मोठ्या भावानं केलं होतं, “एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बी.कॉम. झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.”

१९६७ मध्ये हे लग्न जुळलं कसं आणि पार कसं पडलं, याच्या ‘वधू’च्या कनिष्ठ भगिनींनी सांगितलेल्या या हृद्य आठवणी पुण्याचंच नव्हे तर तत्कालीन संस्कृतीचंही दर्शन घडवतात…

किकेटपटू सदू शिंदे हे आमचे वडील. आई निर्मला आणि आम्ही चौघी बहिणी. सगळ्यात मोठी जिजा, म्हणजे प्रतिभा. मी सगळ्यात लहान. आम्हा दोघींमध्ये सात वर्षांचे अंतर आणि मध्ये सुनिता आणि सुलेखा. त्या काळी, म्हणजे साधारणत: १९५० च्या दशकात क्रिकेटपटूंना अर्थार्जनासाठी नोकरी-उद्योग वगैरे करावा लागे. माझे वडील सचिवालयात नोकरी करीत. आम्ही दादरला शिवाजी पार्कवर राहात असू. वडिलांनी कॉलेजमध्ये असताना नाटकांत कामे केली होती आणि त्यांच्या अनेक प्रमुख भूमिका त्यावेळी खूप गाजल्या होत्या, असा उल्लेख डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या ‘लमाण’ या पुस्तकात केला आहे.

त्या काळी क्रिकेट फार कमी खेळले जायचे. वडिलांच्या वाट्याला तर ते फारच कमी आले. ते फक्त सात कसोटी सामने खेळले. परंतु तेवढ्या जोरावर त्यांनी ‘एक उत्कृष्ट गुगली गोलंदाज’ असा नावलौकिक मिळवला आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले.

विजय मर्चंट, रंगा सोहनी, पॉली उम्रीगर, विजय हजारे, खंडू रांगणेकर, दत्तू फडकर हे वडिलांचे सहकारी होते. पण एकंदरित क्रिकेटच काय, वडिलांच्या वाट्याला आयुष्यही फार कमी आले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

त्यानंतर आई आम्हा चौघी बहिणींना घेऊन पुण्याला आली.

लग्नापूर्वीचे आईचे सारे आयुष्य बडोद्याला गेले. तिचे वडील ब्रिगेडियर मोरेश्वर हैबतराव राणे बडोदा संस्थानात मोठ्या हुद्यावर होते. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली आमची आई अत्यंत सुबत्तेत आणि लाडाकोडात वाढली होती. शौक म्हणून लोक कुत्रा किंवा मांजर पाळतात, तसा आमच्या आईने घरी एक चित्ता पाळला होता. बडोद्याच्या संस्कृतीत आणि पुण्याच्या सदाशिव पेठी संस्कृतीत जमीन अस्मानाचा फरक होता.

एव्हाना आमचे आजोबा रिटायर होऊन पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. प्रभात रोडवर तेराव्या गल्लीच्या कोपऱ्याला त्यांनी एक टुमदार बंगला बांधला होता. बंगल्यातल्या एका खोलीत आईने आपला स्वतंत्र संसार सुरू केला. अर्थार्जनासाठी आई एल.आय.सी.चे काम करू लागली. पुढे चार पैसे हाताशी आल्यावर आईने बंगल्याच्या आवारात एक खोलीचेच, पण स्वतंत्र घर बांधले. पुढे एक ओटा होता. हा आमचा हॉल. आत कपाटांचे पाटीर्शन करून स्वयंपाकघर वगैरे केले होते. खिडक्यांना जुन्या साड्यांचे पडदे करून लावलेले असत. नीटनेटके राहण्याबाबत आई फार काटेकोर असे. अस्वच्छ किंवा फाटके कपडे घातलेले तिला अजिबात खपत नसे.

“एक वेळ गरिबीत राहिलात तरी चालेल; पण दरिद्री राहू नका,” असा तिचा आग्रह असे.

आम्ही चौघी बहिणी पुढे लग्न होऊन याच घरातून बाहेर पडलो. आमची शाळा, शिक्षण, अभ्यास यावर आजोबांची करडी नजर असे. आमचे उठणे, बसणे, वागणे, बोलणे यावर लष्करी शिस्तीची बंधने असत. त्यात चूक झाली की फटके बसत. गल्लीच्या एका टोकाशी कमला नेहरू पार्क होते. तिथे आम्ही संध्याकाळी खेळायला जात असू. पार्कातली ‘जय हनुमान’ची भेळ खायला मिळाली, तर ती आनंदाची परमावधी असे. ‘जय हनुमान’ची भेळ आणि डेक्कन जिमखान्याच्या कँटीनचा आप्पाचा बटाटेवडा या त्या काळी पुण्यातल्या अल्टिमेट गोष्टी होत्या.

Screenshot 2019 12 13 at 8.45.18 AM

पार्कातून संध्याकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी घरी परतण्याचा कायदा होता. तो मोडला तर वेताच्या छडीने स्वागत केले जाई. शिवाय घरापुढच्या ओट्यावर रस्त्याकडे तोंड करून पायाचे अंगठे धरून उभे राहण्याची शिक्षा असे. छडीच्या मारापेक्षा रस्त्याने येणारे जाणारे आजीकडे, “काय शांताबाई, मुली आजही उशिरा आल्या वाटतं पार्कातून?” अशी आपुलकीची चौकशी करीत, त्याची शरम वाटे.

त्यावेळी प्रभात रोडच्या आमच्या १३ व्या गल्लीत बहुतेक घरांतून मुलींची संख्या जास्त होती. राणेंच्या बंगल्यात आम्ही चार बहिणी, समोर संजीवनी मराठेंच्या घरात दोन मुली, शेजारी आनंदीबाई शिर्केंच्या तीन नाती, पलीकडे सबनिसांच्या दोन मुली, वैद्यांची एक, नेरूरकरांच्या दोन… यामुळे असेल कदाचित; पण माझा धाकटा मामा मकरंद याच्या मित्रमंडळींची गल्लीत प्रचंड वर्दळ असे. व्रात्य व हूड तर आम्ही तिघीही होतो.

आमची आपसात दंगामस्ती, वाद, भांडणे सतत चालत. याला कधी वैतागली तर आई भरपूर फटके द्यायची. सुलेखा चपळ होती. वेळीच धोका ओळखून ती धूम ठोकायची. हे अवधान मला नव्हते. त्यामुळे मी भरपूर मार खायची. बाबा गेले, तेव्हा जिजा सात वर्षांची होती आणि मी सहा महिन्यांची. आईवर आणि आपल्यावर काय आपत्ती कोसळली आहे हे कळण्याचे कोणाच च वय नव्हते. पण जिजा जास्त समजूतदार होती. वडिलांचे अंत्यसंस्कार तिने समक्ष पाहिले होते. त्यामुळे असेल कदाचित; पण तिला जबाबदारीची वेगळी जाण आली होती.

आईला एकाच वेळी आईची आणि वडिलांची भूमिका वठवताना आणि तारेवरची कसरत करताना ती पाहात होती. आईचा त्रास कमी करण्यासाठी आमची दंगामस्ती व वाद तिच्यापर्यंत पोहचू नयेत, यासाठी ती प्रयत्न करी. आमची भांडणे थेट आईच्या हायकोर्टात न जाता जिजाच्या कोर्टात तडजोडीने सुटू लागली आणि आमची काळजी घेता घेता ती आमची आई कधी झाली, ते आम्हालाही कळले नाही आणि तिलाही.

आमचे आजोबा ताजमहाल हॉटेलसारख्या वेगवेगळ्या संस्थांच्या डायरेक्टर बोर्डावर काम करीत होते. त्याच्या मासिक बैठकीसाठी ते मुंबईला जात. ते सोबत जिजाला घेऊन जाऊ लागले. एन. डी. ए.च्या पासिंग आऊट परेडसाठीही जिजा आजोबांची सोबत करू लागली.

बडोद्याचे महाराज, त्या काळचे नावाजलेले साहित्यिक, मंत्री, उद्योगपती आजोबांना भेटायला घरी येत असत. या मुळे उच्चपदस्थांमध्ये मोकळेपणाने वावरण्याची जिजाला सवय लागली. इकडे आजीचे ट्रेनिंगही सुरू होतेच. काय खरेदी करावी, कुठे करावी, डावे-उजवे कसे निवडावे… आजीच्या स्वयंपाकघरात जिजाने बडोद्याच्या सगळ्या रेसिपीज घटवल्या. बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसचा संस्कार जिजावर मोठा होता. थोडक्यात, जिजा चांगली गृहकृत्यदक्ष वगैरे बनून गेली.

आमचा मोठा मामा अरविंद राणे हा एक हुषार व कल्पक इंजिनीयर होता. कुणाच्याही मदतीला धाऊन जाणे हा त्याचा स्थायीभाव. अतिशय बडबड्या. त्यामुळे जगन्मित्र. इंग्लंडमध्ये शिकून आल्यामुळे युरोपियन शिष्टाचारांची त्याच्यावर जबरदस्त छाप होती. पुणेकर त्याला ‘इंग्लिश राणे’ म्हणूनच ओळखीत. या मामांची माधवराव ‘बापूसाहेब’ पवार या कारखानदारांशी चांगली मैत्री होती.

मामांनी जिजासाठी बापूसाहेबांकडे चौकशी केली, “माझी भाची लग्नाची आहे. चांगले स्थळ असेल, तर सुचवा”.

बापूसाहेब चटकन म्हणाले, “एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बी.कॉम. झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.” असले ‘बिन कामाचे स्थळ’ आजोबांना पसंत पडणे शक्यच नव्हते. पण हे ‘स्थळ’ म्हणजे साक्षात बापूसाहेबांचा धाकटा भाऊ शरद आहे, हे कळल्यावर प्रश्नच मिटला.

दाजी जिजाला ‘पाहायला’ घरी आले, तो प्रसंग मला स्पष्ट आठवतो. आम्ही बहिणी दिवाणखान्या शेजारच्या पॅसेजमध्ये चोरून उभ्या होतो नि दार किलकिले करून बाहेरचा अदमास घेत होतो. दाजी आले, ते आजोबांच्या शेजारच्या कोचावर बसले. या मुलीनेच आपल्याला नकार द्यावा, या उद्देशाने स्वारी खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट घालून आली होती. शेजारचे वर्तमानपत्र उघडून त्यांनी त्यात जे डोके घातले, ते शेवटपर्यंत वर काढले नाही. परंतु नजर आणि समज तेज असल्यामुळे जे काही टिपायचे, ते नेमके टिपले होते.

दि. १ ऑगस्ट १९६७ या दिवशी बारामती येथे जिजा-दाजींचे लग्न झाले.

बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, एवढेच आज आठवते. लग्नाला अलोट गर्दी झाली होती. सगळ्या पंचक्रोशीतील माणसं आपल्या आमदाराच्या लग्नाला उत्साहाने आली होती. स्वत: मुख्यमंत्री जातीने लग्नाला हजर राहणार होते. भटजींनी मुहुर्तावर मंगलाष्टका सुरू केल्या खऱ्या; पण जसजसा मुख्यमंत्र्यांना यायला उशीर होऊ लागला, तसतसे भटजींनी आपले गानकौशल्य दाखवायला सुरुवात केली.

भटजी चढाओढीने एकामागून एक मंगलाष्टके काढू लागले आणि ताना पलटे घेत गाऊ लागले. हा प्रकार किती वेळ चालला कुणास ठाऊक. अंतरपाटापलीकडे वरमाला घेऊन उभी असलेली नववधू भोवळ येऊन पडते की काय, अशी अवस्था झाली. आजूबाजूच्या बायकांनी जिजाला टेकू देऊन कशीबशी उभी केली होती. शेवटी एकदाची मुख्यमंत्र्यांची गाडी लग्नमंडपात शिरली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

बारामतीतील पवारांचे घर आणि पुण्यातील राणेंचे घर यात जमीन-अस्मानाचा फरक होता. राणेंचे घर लष्करी शिस्तीत घड्याळाच्या तालावर चालणारे. ठरलेल्या वेळी उठायचे, ठरलेल्या वेळी जेवायचे, कामाला जायचे वगैरे. बारामतीचे घर म्हणजे शेतकरी कुटुंब. बारदाना खूप मोठा. माणसांची ये-जाही प्रचंड. जिजाच्या सासूबाई या मोठ्या कर्तबगार आणि करारी स्त्री होत्या. जिजावर त्यांची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची खूप छाप आहे.

Screenshot 2019 12 13 at 8.45.30 AM

आजही जिजाच्या बोलण्यात बाईंचा विषय निघाला, तर तिचे देहभान हरपते, इतकं ती भरभरून बोलू लागते. एवढे मोठे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचे कसब बाईंच्या ठायी होते. जिजाने ते अचूक उचलले. पवारांच्या घरातील व्यवहारचातुर्य आणि राणेंच्या घरातील शिस्त. पवारांचे आदरातिथ्य आणि राणेंची स्वच्छता व टापटीप. जिजाने सासर आणि माहेर या दोन्ही घरातल्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उचलल्या आणि त्यांची सांगड घालून एक वेगळीच घडी बसवली.

जिजा आणि दाजी हे एक पूर्णपणे एकरूप झालेले जोडपे आहे. एकाच्या मनात जे स्टेशन लागते, तेच स्टेशन दुसऱ्याच्या मनात लागलेले असते. एकाने नुसता हात पुढे केला, तर त्याला काय हवे आहे ते दुसऱ्याला न सांगता समजते. ज्याप्रमाणे छान जुळलेल्या सतारीवर पडद्याच्या तारा छेडल्या की त्याच्या रेझोनन्सने तरफेच्या ताराही कंप पावू लागतात आणि तीच सुरावट आपोआप खाली उमटते. तसे काहीसे जिजा आणि दाजींचे झाले आहे. ‘शरद पवारांच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता त्यांच्या बायकोलाही लागणार नाही’, असे जे कोणी म्हणतात त्यांना जिजाची ओळख पटलेली नाही असेच म्हणावे लागेल.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे एक सुभाषित आहे. त्याचे अनेक विनोदी अवतारही प्रसिद्ध आहेत. ‘गृहिणी सचिव:’ हे तर आपल्याकडे सर्वमान्य भाषीत आहे. परंतु सचिव किंवा कसलीही बिरुदावली न मिरवता जिजा शांतपणे घरची आघाडी सांभाळत असते. न बोलता दाजींच्या बरोबरीने एक एक जबाबदारी उचलत असते आणि बिनबोभाट पार पाडत असते.

निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको. कामे कित्येक पटीने वाढलेली असतात. कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते. क्षणाक्षणाला फोन घणघणत असतात. दाजी प्रचार-दौऱ्यावर रोज दहा-बारा प्रचारसभा घेत वणावणा फिरत असतात. अशावेळी भोज्याजवळ नांगर टाकून कुणीतरी जबाबदारीने बसावे लागते. जिजा हे सारं हसत खेळत न कंटाळता सांभाळते.

शरद पवारांची पत्नी असणे हे पाहणाऱ्याला राजमुकुट मिरवल्यासारखे वाटेल. पण हा मुकुट किती काटेरी आहे, ते धारण करणाऱ्यालाच ठाऊक. हे येऱ्यागबाळ्याचे कामच नव्हे. ती उत्तम गृहिणी तर हवीच; पण त्याचबरोबर तिला राजकारण आणि समाजकारणाचे भान हवे.

समाजाच्या सर्व थरांतून न अवघडता वावरण्याची सहजता हवी. प्रसंगावधान तर हवेच हवे; पण हजरजबाबीपणा व निर्णयक्षमताही हवी. आदरातिथ्य हवे, तसाच सोशिकपणाही हवा. मुख्य म्हणजे वेळेचे उत्तम नियोजन हवे.

या साऱ्या अवधानांसह जिजाने जाणूनबुजून जो ‘लो प्रोफाइल’ स्वीकारला आहे, तो भल्याभल्यांची विकेट उडवणारा ‘गुगली’ आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून तिने स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. ‘मला यातलं काही कळत नाही,’ हे जिजाने मुद्दाम पांघरलेले वेड आहे.

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा तर जिजा आणि दाजी यांचा स्वभाव आहे. जिजाला झगमगीत साड्यांचा शौक नाही किंवा दागिन्यांनी मढण्याची हौस नाही. पण वागण्या-बोलण्यातल्या खानदानी एलिगन्समुळे ती गदीर्तही चांगली उठून दिसते. सेक्युरिटीचा बडेजाव नाही आणि पोलिस एस्कॉर्टचा लवाजमा नाही. त्यामुळे बाजारात असो, देवळात असो की नातेवाईक वा स्नेह्यांकडे जाणे असो; जिजा कधी आली नि कधी गेली, हे कळतदेखील नाही.

‘नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये,’ असं म्हणतात. मला ही दोन्ही बिरुदं मिळाली. कितीही वय वाढलं, तरी धाकटं भावंडं मोठ्यांच्या हिशेबात कायम धाकटंच राहतं. त्याला कशातलंही काहीही कळत नाही, या समजुतीवर त्यांचा ठाम विश्वास असतो.

आजही कधी जिजाला फोन केला नि विचारलं, “रात्री दहा लोक जेवायला येणार आहेत. नारळाच्या दुधातली कोंबडी …” की जिजा लगेच ओरडते, “काय बावळट आहेस गं! सारखं कसं विसरतेस! बरं आता असं कर… दहा लोक़ म्हणजे एक कोंबडी पुरायची नाही…” मग सगळ्या लहान-मोठ्या बारकाव्यांसह रेसिपीची चर्चा करेल. पुढे दर अर्ध्या तासाने स्वयंपाकघरातील प्रगती योग्य दिशेने सुरू आहे की नाही, याची चौकशी करेल. टेबल मांडायचे की बुफे लावायचा, याच्या सूचना करेल.

आता कोल्हापूरला माझ्या घरी दहा माणसं जेवायला येणार आहेत, ही दिल्लीमध्ये जिजाची जबाबदारी बनून जाते. आता हिचे कसे होणार, या काळजीने जिजा दिल्लीत हवालदिल. रात्री उशिरा पाहुणे गेल्यावर प्रोग्रॅम छान पार पडला, मंडळी अगदी खुश होऊन परत गेली हे समजले की मग जिजा शांत होणार.

पण एकंदरीतच या जगाचे कल्याण झाले पाहिजे, या जगात सगळेजण सुखी झाले पाहिजेत, या विचाराने जिजा कायम अस्वस्थ असते. कुणालाही कसलाही प्रॉब्लेम येता कामा नये आणि जर का आलाच, तर ती जिजाची जबाबदारी बनते. मग ती सगळ्या तऱ्हेचे सल्ले देईल. न मागता मदतीचा हात देईल. मदत घेणाऱ्याला अवघड वाटू नये अशा पद्धतीने समस्येची उकल करेल आणि मगच स्वस्थ बसेल.

तो नारायण ठोसर म्हणाला नव्हता का : ‘चिंता करितो विश्वाची’! हे बीज त्या रामदासाने जिजाच्या मनात कधी रुजवलं कुणास ठाऊक. कुणाच्याही अडचणीला मदतीसाठी धावून जाणं हा जिजा व दाजींचा स्थायीभाव आहे. याबाबत कसलीही चर्चा नसते किंवा गाजावाजा नसतो. यांचे मदतकार्य बिनबोभाट सुरू असते. नुसत्या कर्तव्यभावनेने नव्हे, तर प्रेमाने, आपुलकीने.

Screenshot 2019 12 13 at 8.46.06 AM

मध्यंतरी दाजींना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. अवघड ऑपरेशन आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ. याचा जिजा आणि दाजी यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. पाणी प्यायचे झाले तरी तोंडाची आग व्हायची. समरप्रसंगच उभा राही. पण डॉक्टरांचे कौशल्य, दाजींची सहनशक्ती, मनोधैर्य व दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिजाची अथक २४ तास शुश्रुषा याच्या जोरावर त्यांनी या संकटावर मात केली. जिजा तर डॉ. रवी बापटांशी एकंदर आरोग्यविषयक गोष्टींवर एवढी चर्चा करत असते की ते तिला ‘अधीर् डॉक्टर’ असेच म्हणतात.

कुणी दवाखान्यात आजारी असेल, तर काही विचारू नका. जिजा आणि दाजी अगदी हवालदिल होऊन जातात.

स्वत:च्या आजाराबाबत खंबीरपणे त्याचा मुकाबला करणारे हे दोघे; दुसऱ्याच्या आजारपणात मात्र फार हळवे होतात. मग ते दवाखान्यात जाऊन पेशंटला भेटून धीर देतील. डॉक्टरकडून आजाराबाबत माहिती घेतील. डॉ. रवी बापटांकडून ट्रीटमेंट बरोबर आहे की नाही, याची खात्री करतील. आपल्या घरून दवाखान्यात सकाळ-संध्याकाळ जेवणाचे डबे पाठवतील. त्यात पुन्हा ‘किती लोकांसाठी डबा पाठवू? अधीर् पोळी खाणार की दीड?’ असले पुणेरी प्रश्न न विचारता आठ-दहा लोकांना पुरेल असा डबा पाठवतात. एवढ्यावर हे दाम्पत्य थांबत नाही. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते पेशंटला आपल्या घरी घेऊन जातील. आठ-दहा दिवस त्याची व्यवस्थित विश्रांती झाली की मगच घरी पोचवतील. मला वाटतं, जिजाच्या कोणत्या ना कोणत्या घरी असा बरा झालेला कोणी पेशंट हवापालटासाठी राहात असतोच.

आपल्या घरी असो की नात्यात असो किंवा स्नेह्या-सोबत्यांच्या घरी असो; लग्न उभे राहिले की जिजा-दाजींचा उत्साह अगदी उतू जाऊ लागतो. मग जेवणाचा मेन्यू ठरवण्यापर्यंत सर्व बारीकसारीक गोष्टींच्या प्लॅनिंगमध्ये जिजा उत्साहाने भाग घेते. घरातल्या सर्वांवर कुवतीनुसार जबाबदारी सोपवून त्यांना या शुभकार्यात सहभागी करून घेतले जाते. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असतोच; पण लग्नकार्याचा हा गोवर्धन सगळ्यांच्या करंगळ्यांवर उचलला गेला, तरच त्याची गोडी वाढते. यात कृष्णाची करंगळी मात्र जिजा-दाजींची असते.

जिजा-दाजींचे एक ज्येष्ठ सहकारी भगीरथ अप्पा परवा सहज बोलता बोलता म्हणाले,

“सायबाचं कर्तृत्व फार मोठं. अगदी आभाळाएवढं मोठं. पण वहिनीसुद्धा काही कमी नाही बरं”.

आजूबाजूच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी ती आपल्या पोटात ठेवते. त्याचा सायबाला त्रास होऊ देत नाही. म्हणूनच सायेब बाहेर मैदान मारायला मोकळा असतो!” जिजाचं असं काही कौतुक ऐकलं की माझ्या अंगावर मूठभर मांस चढतं. म्हणजे एका परीने आमच्या वाढत्या वजनाला जिजाच अप्रत्यक्ष जबाबदार असते म्हणायची !!

पण अशा प्रकारचे जिजाच्या कौतुकाचे बोल मी साक्षात दाजींच्या तोंडूनही ऐकले आहेत. सुप्रियाच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले आणि मध्यरात्र उलटून गेल्यावर दाजी आणि आम्ही सर्व बहिणी रिसेप्शनबद्दल बोलत बसलो होतो. लाडक्या लेकीचे लग्न आणि रिसेप्शनसोहळाही छान पार पडल्यामुळे दाजी आणि जिजा अगदी भावविवश झाले होते. अचानक दाजी म्हणाले,

”प्रतिभाने सुप्रियाला फार छान वाढवलं. तिच्यावर चांगले संस्कार केले. या बाबतीत तिला माझी काहीही मदत झाली नाही. ते तिनं एकटीनं केलं. शिवाय घरच्या, दारच्या कुठल्याही कटकटींचा मला त्रास होऊ दिला नाही.”

जिजाला याहीपेक्षा मोठे सटिर्फिकेट दिले, ते साक्षात तिच्या सासऱ्यांनी. आजी-आजोबांना भेटायला ते घरी आले होते. बोलता बोलता त्यांनी आजोबांचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, ”राणेसाहेब, तुमच्या घरातला हिरा तुम्ही मला दिला आहे.” आजी-आजोबांच्या स्निग्ध डोळ्यांत टचकन पाणी आले. त्यांच्या चेहऱ्यावर अतीव समाधानाने जोे आनंद पसरलेला मी पाहिला, तो विसरणे कदापि शक्य नाही.

जिजा आणि दाजी यांना सूक्ष्म विनोदाची छान देणगी मिळाली आहे. शिवाय महाराष्ट्रातल्या बहुतेक ठिकाणच्या बोलीभाषा, म्हणी, वाक्प्रचार त्यांना ठाऊक आहेत. मिश्किलपणा तर पुरेपूर भरलेला. त्यामुळे निवांत क्षणीच्या दोघांच्या गप्पा फार खुमासदार असतात. आपल्याला नुसते ऐकतानाही खूप गम्मत येते. फक्त स्थानिक संदर्भ सगळ्या बारकाव्यानिशी आपल्याला ठाऊक मात्र हवेत. या गप्पांत कधी कुणाची निंदा-नालस्ती नसते. उठाठेवी नसतात. कारण एखाद्याला यांनी आपले मानले की मग त्याच्या गुण-दोषांसकट त्याला सामावून घेतलेले असते.

Screenshot 2019 12 13 at 8.45.30 AM

दाजींच्या दृष्टीची झेप मला नेहमीच थक्क करणारी वाटते. ते खूप दूरचे पाहतात आणि त्याचवेळी ठेच लागू नये म्हणून पायाखालचे पाहण्याचे अवधान त्यांना आहे. २०-२५ वर्षांनंतरचा अभ्यासपूर्ण बनवलेला एक आराखडा सतत त्यांच्या नजरेसमोर असतो आणि २० वर्षांनंतर आपण त्यात कुठे असायला हवे, हे त्यांनी मनोमन पक्के ठरवलेले असते. शांतपणे, पण निश्चितपणे त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू असते. या वाटचालीत अचानक एखादा दगड आडवा आला, तर त्याच्याशी वाद न घालता, त्याला धडका न मारता, ते शांतपणे वळसा घालून पुढे निघून जातील. ही त्यांची कामाची पद्धत पाहिली की मला राहून राहून एक प्रश्न पडतो, दाजी जर राजकारणात आले नसते तर ते काय झाले असते? कारखानदार झाले असते की शेतकरी? संशोधक की सनदी अधिकारी? की उद्योजक? मला सांगता यायचे नाही. पण एक मात्र नक्की. ते कुठल्याही क्षेत्रात गेले असते, तरी तिथे त्यांनी आपल्या नावाचे तोरण बांधले असते.

मला पडणारा आणखी एक प्रश्न म्हणजे, मराठी भाषेतले कुठले विशेषण दाजींना समर्पकपणे लागू पडेल? हुषार, कुशाग्र बुद्धीचे, समंजस, अष्टपैलू, समजूतदार, दूरदृष्टीचे, संवेदनशील, सव्यसाची, अष्टावधानी… मला वाटते एकावेळी ही सगळी विशेषणे जरी वापरली, तरी हा गृहस्थ दोन अंगुळे शिल्लक उरतोच.

एकच विशेषण असे आहे की जे दाजींना आणि फक्त दाजींनाच चपखल लागू होते. ते म्हणजे शरद पवार हे ‘प्रतिभा’वान आहेत.

जिजा दाजींचे लग्न झाले, तेव्हा मी १२ वर्षांची होते. माझे आणि दाजींचे नाते अगदी अनोखे आणि वेधक आहे. त्या नात्याला अनेक पदर आहेत. एक मिष्किल मेहुणा, एक समजूतदार मित्र, एक खट्याळ चेष्टेखोर मोठा भाऊ, एक धीरगंभीर-आश्वासक पिता यांचे हे अजब मिश्रण आहे. वेगवेगळ्या रंगांचे पट्टे असलेली तबकडी वेगाने फिरू लागली की सगळे रंग एकमेकात मिसळून नाहीसे होतात आणि एक वेगळाच रंग वर दिसू लागतो आणि मूळ रंग नेमकेपणाने सांगणे अवघड होऊन बसते. तसा आमच्या नात्याला एक अनोखा रंग आहे.

जिजा आणि दाजींच्या लग्नाला चार दशके उलटत असताना त्यांचे अभिष्टचिंतन करताना एक विचार माझ्या मनात प्रकर्षाने येतो : माझे भाग्य मोठे; शरद पवार या माणसाची मी मेहुणी झाले.

  • गीता रणजित जाधव
Leave A Reply

Your email address will not be published.