तिसरा पार्ट येतोय खरा, पण प्रियदर्शनने बनवलेल्या हेराफेरीला अजूनही तोड नाहीये…

हेरा फेरी ३ च्या प्रोमोचं शूट सुरू झालंय. काल ही बातमी आली आणि हेरा फेरीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या फिल्ममध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन असेल अशा बातम्या काही दिवसांपुर्वी फिरत होत्या. आता या फिल्ममध्ये सुनील शेट्टी, अक्षय किंवा परेश रावल कुणाच्याही ऐवजी भलताच अभिनेता बघणं प्रेक्षकांना अजिबात पटणारं नाही.

कालच्या बातम्यांमध्ये मात्र जुनी तिकडी म्हणजे सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल हे तिघंच असणार आहेत. या बातमीनं प्रेक्षक खऱ्या अर्थानं सुखावले.

पण या सिनेमाचे दिग्दर्शक बदललेत. काही दिवसांपासून भूल भूलैया-२ चे दिग्दर्शक अनीस बजमी हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अशा बातम्या होत्या. पण कालच्या वृत्तांनुसार बच्चन पांडे, हाऊसफूल-४ चं दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक फरहाद सामजी हा दिग्दर्शन करणार आहे.
बोललं असंही जातंय की, अक्षयची सिनेमातली वापसी हेच दिग्दर्शक बदलण्याचं कारण आहे.

कारण काहीही असो, जुनी तिकडी सिनेमात परत दिसणार म्हणून प्रेक्षकांना आनंद झालाय. खरंतर या तिकडी इतकाच या हेरा फेरीच्या यशात मोठा वाटा होता तो मूळ सिनेमाचा दिग्दर्शक प्रियदर्शन.

बॉलीवूडचा इतिहास जरी चाळला तरी हेराफेरी सारखी फिल्म शोधून सापडणार नाही. किती कॉमेडी सिनेमे आले पण हेराफेरीची सर इतर कुठल्या सिनेमाला आली नाही. अक्षय कुमारचा राजू आणि त्याची उभा राहण्याची युनिक स्टाईल, नोकरीच्या शोधात सुनील शेट्टी म्हणजे श्याम त्याचं दिवसभर वणवण फिरणं, आणि हा पिक्चर सगळ्यात जास्त हिट होण्याचे मेन कारण म्हणजे बाबुराव गणपतराव आपटे म्हणजे परेश रावल.

बिलांची नागिन निघाली म्हणणारा जॉनी लिव्हर कसा विसरू शकतो, ‘अभी मजा आयेगा ना भिडू’ हा त्याचा डायलॉग तुफान गाजला होता.

या सिनेमाचा पुढचा पार्ट म्हणजे फिर हेरा फेरी सुद्धा जबरदस्त गाजला होता. म्हणजे हेराफेरी टीव्हीवर चालू असताना तुम्ही कुठलाही सीन पाहा, तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. आजही सिच्युएशनल कॉमेडी म्हटल्यावर हेराफेरीच आठवतो.

आता तुम्ही म्हणाल की काय हेराफेरी पुराण लावलंय तर, हा सिनेमा दिग्दर्शित केला होता प्रियदर्शन यांनी. प्रियदर्शन हे नाव आपल्याकडे लिमिटेड सिनेमापुरतं राहिलं पण हे प्रियदर्शन म्हणजे मल्याळम सिनेमाचे बाहुबली मानले जातात.

आज पर्यंत बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कॉमेडी सिनेमा देण्याचा विक्रम हा प्रियदर्शन यांच्या नावावर आहे. १९९८ मध्ये मल्याळम सिनेमातून प्रियदर्शन बॉलिवुडमध्ये आले त्यावेळी निर्मात्यांनी सिच्युएशनल कॉमेडी, कलरफुल पात्र आणि डायलॉग मधून चांगली कॉमेडी अशी त्रिसूत्री जमवली आणि सिनेमे हिट केले.

दोन-अडीच दशकं लोटली पण हेराफेरी सर अजूनही कुठल्या सिनेमाला आलेली नाही. पण प्रियदर्शन यांनी फक्त कॉमेडी सिनेमे केले असं नाही तर मल्याळम सिनेमात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

प्रियदर्शन यांनी बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीला बरेच चांगले सिनेमे दिले. १९८६ मध्ये आलेला तलवत्तम या प्रियदर्शनच्या सिनेमामुळे मोहनलाल साउथमध्ये हिट झाला. आणि याच सिनेमाचा रिमेक क्यूकी हा सलमान खान आणि करीना कपूर यांना स्टार बनवून गेला. १९९१ मध्ये किलूकम हा प्रियदर्शन चा सिनेमा हिंदीमध्ये मुस्कुराहट म्हणून रिमेक बनवला गेला. याच सालचा अभिमन्यू हा मुंबईचा डॉन वरदराजन मुदलियार यांच्या जीवनावर आधारित होता तो पुढे नायकन तमिळ मध्ये बनवला गेला.

त्यानंतर कालापाणी, गर्दिश, विरासत, डोली सजा के रखना, कांचीवरम, बम बम भोले, आक्रोश, ओप्पंम यासाठी प्रियदर्शन ओळखले जातात.

प्रियदर्शन यांनी बरेच चांगले सिनेमे केले पण ते मुख्यत्वे ओळखले गेले ते म्हणजे हेराफेरी या सिरिजसाठी. प्रियदर्शन यांच्याकडून वारंवार त्याच जॉनरच्याच सिनेमांची मागणी होत गेली. ३० जानेवारी १९५७ ला प्रियदर्शन यांचा जन्म झाला एका सामान्य कुटुंबातून आलेला हा पोरगा इंडस्ट्रीला ९५विविधरंगी सिनेमे बहाल करतो ही खूप मोठी गोष्ट मानली गेली.

हिंदीमध्ये म्हणजे बॉलीवूड मध्ये २७ पेक्षा जास्त सिनेमे प्रियदर्शन यांच्या नावावर आहे. डेव्हिड धवन नंतर सगळ्यात जास्त सिनेमा देण्याचा विक्रम प्रियदर्शन यांच्या नावावर आहे. मल्याळम सिनेमात कॉमेडी, हॉरर, थ्रिलर अशा सगळ्या जॉनरचे सिनेमे प्रियदर्शन यांनी केले आहे.

आजही जर हेराफेरीमधली स्टारकास्ट बदलली, तरी हा पिक्चर हिट होऊ शकतो याचं एकमेव कारण म्हणजे ‘प्रियदर्शन.’

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.